Skip to main content
x

चौधरी, बहिणाबाई नथूजी

       ळगाव जिल्ह्यातील आसोदा या गावी नागपंचमीच्या दिवशी बहिणाबाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील उखाजी महाजन आणि आई भीमाई. बहिणाबाईंना तीन भाऊ आणि तीन बहिणी होत्या. संपन्न अशा लेवापाटीदार एकत्र कुटुंबात त्यांचे बालपण गेले. जळगाव येथील वतनदार चौधरी ह्यांच्या वाड्यात खंडेराव चौधरी ह्यांची सून म्हणून बहिणाबाई आल्या. त्या वेळी त्याचे वय १३ वर्षे होते. नथूजी चौधरी हे बहिणाबाईंचे पती. सासरीदेखील मोठे एकत्र कुटुंब होते. माहेरी व सासरी घरकाम आणि शेतीची कामे यांनीच त्यांचे जीवन व्यापलेले होते. वयाची तिशी उलटण्याच्या आतच बहिणाबाईंच्या पतीचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या आयुष्याचा आधार तुटला. पदरी तीन लहान मुले- ॐकार, सोपान आणि काशी. त्या काळच्या रितीप्रमाणे काशीबाईंचे लहान वयातच लग्न झाले होते. मोठा मुलगा ॐकार प्लेगमुळे अपंग झाला. त्यातच पूर्वीचे कर्जही डोक्यावर होते. कुटुंबप्रमुख म्हणून आर्थिक बाबींसह सगळ्या गोष्टींची घडी व्यवस्थित बसविण्याची जबाबदारी आता बहिणाबाईंचीच होती. हे आव्हान त्यांनी धैर्याने पेलले.

     कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा म्हणून शेतात राबणे, हे बहिणाबाईंनी आपल्या जीवनाचे सूत्र मानले. दुष्काळाच्या काळात तर खडी फोडण्याचे काम करण्याची वेळही त्यांच्यावर आली. कष्टकरी ग्रामीण स्त्रीचे सामान्य जीवन त्यांच्या वाट्यास आले. त्या अशिक्षित होत्या. औपचारिक शिक्षणाचा त्यांच्या जीवनाला अजिबात स्पर्श झालेला नव्हता. असोदा, जळगाव याच परिसरात त्यांचे बहुतांश जीवन गेले. शेती, शेतकरी जीवन, गावगाडा, ग्रामसंस्कृती अशा परिसरात बहिणाबाई वावरल्या, जगल्या.

     बहिणाबाईंचे कर्तृत्व आहे ते मराठी कवितेच्या क्षेत्रात. त्यांचे चिरंजीव सोपानदेव यांनी आपल्या आईच्या निधनानंतर आचार्य अत्रे यांच्या पुढाकाराने आईच्या कविता ‘बहिणाईची गाणी’ (डिसेंबर १९५२) या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केल्या. खानदेशातील एका शेतकर्‍याच्या कुटुंबातील कवयित्रीने निर्माण केलेले हे काव्य आहे. कृषिजीवनकेंद्री, स्त्रीसुलभ भावनेतून समकालीन वास्तवाला अभिव्यक्त करणारी, जीवनविषयक गहन तत्त्वज्ञान मांडणारी आणि अस्सल खानदेशी वर्‍हाडी बोलीचे सामर्थ्य जाणणारी ही कविता आहे.

     बहिणाबाईंचे जगणे आणि त्यांची कविता कृषिजीवनकेंद्री असल्याने निसर्गाची विविध रूपे, हे त्यांच्या कवितेचे एक प्रधान वैशिष्ट्य ठरते. ही निसर्गरूपे शेतकरी जीवनाशी संबंधित आहेत. शेतकर्‍याच्या कष्टातून शेतात डोलणारी पिके, फुलणारा हिरवा निसर्ग हे पाहून बहिणाबाईंचे चिंतनशील कविमन निसर्गाच्या सुजलाम-सुफलाम शक्तीला सहजतेने प्रणाम करते. साधा पाऊस आला, तरी त्यांच्या काव्यप्रतिभेला बहर येतो. वाढत्या पावसामुळे दिसणारी निसर्गाची विविध रूपे ‘आला पाऊस’ या कवितेतून त्यांनी उत्कटपणे साकारली आहेत. उगवत्या पिकाला पाहूनही बहिणाबाईंना काव्य सुचते- ‘एका एका कोंबातून। पर्गटले दोन पानं। जसे हात जोडीसन। टाया वाजवती पानं’।

     निसर्गातील पशुजीवन बहिणाबाईंच्या ‘गाडी जोडी’, ‘रगडनी’, ‘पोया’ या कवितांमधून येते. बैलाचे सामर्थ्य व त्याच्याविषयीची कृतज्ञतेची भावना त्यांतून व्यक्त होते. बहिणाबाईंची कविता ही शेतकरी जीवनाबरोबर प्रवास करीत असल्याचे सतत जाणवते. ‘पेरनी’, ‘कापनी’, ‘रगडनी’, ‘उपननी’, ‘शेतीची साधने’ या सार्‍या कविता कृषकजीवनाचे दर्शन घडविणार्‍या आहेत. ‘धरत्रीले दंडवत’ ही काळ्या आईवरील उत्कट श्रद्धा व्यक्त करणारी कविता आहे.

     शेती हा मुख्य व्यवसाय, एकत्र कुटुंबपद्धती, एकमेकांना धरून राहणे, भाऊबंदांच्या रितीभाती पाळणे, सण-उत्सव, स्त्री-जीवन, सासर-माहेर, जातीची उतरंड अशी समकालीन वास्तवाची भिन्न-भिन्न रूपे बहिणाबाईंच्या कवितेतून प्रत्ययास येतात. त्यात आपल्या माहेराचे वर्णन करणार्‍या त्यांच्या काही स्वतंत्र कविता आहेत. काही कवितांमध्ये माहेरी मिळणारे प्रेम, माहेरची माणसे यांचाही उल्लेख आलेला आहे. परंतु ‘माझं माहेर माहेर’ म्हणत सासरची कष्टमय काट्या-कुट्यांची वाट चालत राहायची, हेच बहिणाबाई आपल्या कवितेतून सांगतात. त्यांनी माहेर-सासरची गाणी गात-गात, सुखाला नकार आणि दुःखाला होकार देत संसार केला. संसाराचे मर्म आपल्या कवितेतून त्यांनी सांगितले. चुलीवर तवा आणि हाताला चटके यांशिवाय भाकर मिळायची नाही, तसा संसारही व्हायचा नाही. ओढाळ ढोर पळून जाऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात लाकडाचा ओंडका-लोढणे बांधतात. पति-पत्नी एकमेकांना वरताना गळ्यात घातलेला हार फुलांचा असतो, त्याचे स्मरण असले, म्हणजे ते लोढणे वाटणार नाही. असा एक सुरेख विचार बहिणाबाईंच्या स्त्रीसुलभ प्रतिभेने या कवितेत उलगडून दाखवला आहे.

     बहिणाबाईंनी नकळतपणे घरोट्याशी-जात्याशी जोडलेले जीवाभावाचे नाते, हे त्यांच्या कवितेचा एक लक्षणीय विशेष आहे. जात्याची लयबद्ध घरघर ऐकता-ऐकता बहिणाबाईंचे मन अंतर्मुख होत जाऊन स्वतःशी, जात्याशी, जीवनातल्या अनुभवांशी आणि हे सारे निर्माण करणार्‍या ईश्‍वराशी केव्हा हितगुज करू लागते, हे कळतही नाही. घरोट्याशी बोलता-बोलता त्या स्वतःमधल्या वाटसरूला धीर देतात- संसाराची वाट बिकट जरी असली, तरी ‘जानचं पडीन रे। तुले लोकायच्यासाठी। वाटंच्या वाटसरा। वाट बिकट मोठी?’ वास्तवाची डोळस जाणीव ठेवून, जगण्यातील चढ-उतारांना खंबीरपणे सामोरे जाण्याची बहिणाबाईंची विजिगीषू वृत्ती स्तिमित करणारी आहे.

     बहिणाबाईंच्या कविमनाने समाजव्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण केले आणि त्यासंबंधीच्या त्यांच्या संवेदनशील मनाच्या प्रतिक्रिया काव्यरूपात प्रकट झाल्या. समाजातील जातींची उतरंड आणि त्यातून अस्पृश्यांच्या वाट्याला आलेली पिळवणूक याचे मार्मिक वर्णन बहिणाबाई कवितेतून करतात. दारूच्या भट्टीजवळच्या दुनियेचे आणि मुसलमान वाड्याचे चित्र रेखाटून तेथील भीषण, विदारक वास्तवाचे दर्शनही बहिणाबाईंची कविता घडविते. श्रीमंत व गरीब यांच्यातील आर्थिक व सामाजिक दरीही बहिणाबाईंची काव्यप्रतिभा नेमकेपणाने टिपते- ‘अरे, बालाजी इठोबा। दोन्ही एकज रे देव। सम्रीतीनं गरिबीनं। केला केला दुजाभाव॥’, ‘अनागोंदी कारभार’ ही त्यांची कविता अशीच; पण बदलत्या समाजवास्तवाची नोंद मिस्कीलपणे घेणारी आहे.

     जे काही जीवनाचे तत्त्वज्ञान बहिणाबाईंच्या कवितेतून आपल्याला मिळते, ते त्यांनी प्रथम स्वतःसाठी, स्वतःला सांगितले आहे. ‘योगी आणि सासुरवाशीण’ ही स्त्रीजीवनाचे  तत्त्वज्ञान सांगणारी त्यांची एक हृदयस्पर्शी कविता आहे. ‘लेकीच्या माहेरासाठी। माय सासरी नांदते।’ या शब्दांतून स्त्रीजीवनाचे निरंतर सत्य बहिणाबाईंनी अत्यंत सहजपणे सांगून टाकले आहे. जगण्याचे तत्त्वज्ञान त्यांना फार स्पष्टपणे उमगले होते. हे माझ्या जीवा, जीवन क्षणभंगुर आहे; हे कधीच विसरू नकोस आणि हेही लक्षात ठेव की, जगात करण्यासारखे खूप काम आहे. ते करता-करता त्यातच देवाजीचे रूप पाहा, असे त्या सांगतात. ही कवयित्री श्रद्धाळू, ईश्वरपरायण आहे; पण दैववादी अजिबात नाही. दुःखाचे आघात सहन करूनही ती हळवी असाहाय्य बनली नाही. उलट जीवनविषयक शहाणपण ती बाळगून होती. ‘लपे करमाची रेखा’ या कवितेतून याचा प्रत्यय येतो. पतिनिधनानंतर ‘आता माझा माले जीव’ असे स्वतःला त्यांनी समजावले. जीवनाकडे तटस्थपणे पाहण्याचे सामर्थ्य बहिणाबाईंना लाभले होते. अशा दृष्टीला सुगरणीच्या खोप्याचे रहस्य कळावे, यात नवल नाही. जीवनाकडे विलक्षण दृष्टीने बघण्याची बहिणाबाईंची वृत्ती प्रत्येक गोष्टीत काही नवाच शोध लावत जाते. माणसातला देव क्वचितच सापडून जातो, परंतु अनेकदा माणसातला माणूस हरवलेला असतो, हीच व्यथा बहिणाबाईंच्या कवितेतून ऐकायला मिळते. बहिणाबाईंनी माणसातच देव पाहिला. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत आशावादी, वास्तवाचे भान बाळगणारा व परखड होता.

    बहिणाबाईंच्या काव्याचे सगळे विषय त्यांच्या दैनंदिन जीवनातील आहेत. म्हणूनच या काव्यविश्वात कसलीही कृत्रिमता, कसलाही उपचार सापडणार नाही. प्रांजळ आविष्कार आणि कल्पक प्रतिभा, अचूक शब्दांची निवड, त्यांतील लडिवाळपणा, कारुण्य व हास्य या कलागुणांइतकेच बहिणाबाईंचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही महत्त्वाचे आहे. वृत्त-अलंकार जुळवून जाणीवपूर्वक केलेले हे काव्य नाही. अष्टाक्षरी रचनेतील सफाईदारपणा, हे या कवितेचे एक प्रधान वैशिष्ट्य ठरते. प्रत्येक कवितेत संपूर्ण घटना किंवा विचार आहे. कवितेचा प्रारंभ आणि शेवट परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा याबद्दलची जागरूकता जाणवते. खानदेशी वर्‍हाडी बोलीमुळे या काव्याची लज्जत अधिकच वाढली आहे. स्त्रियांच्या भाषेच्या स्पष्ट खुणाही या कवितेत स्पष्टपणे जाणवतात. या सार्‍याच कविता तालबद्ध व लयबद्ध आहेत. काव्यगुणांनी समृद्ध म्हणून त्या कविता तर आहेतच; परंतु त्याहून ती गाणी आहेत. म्हणूनच बहिणाबाईंच्या कविता-संग्रहाला ‘बहिणाईची गाणी’ असेच नाव दिलेले आहे.

     बहिणाबाईंची कविता एका बाजूला सनातन माणुसकीच्या  मूल्यांशी जोडली गेलेली, संतकाव्याच्या परंपरेशी जवळचे नाते सांगणारी आहे, तर दुसर्‍या बाजूला दैनंदिन लौकिक वास्तवातूनच जन्मास आलेली, जगण्याचे शहाणपण देणारी कविता आहे.

         - आशुतोष पाटील

चौधरी, बहिणाबाई नथूजी