Skip to main content
x

दातार, मुकुंद रघुनाथ

      चार उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ, चार दर्जेदार संपादन ग्रंथ, एक कविता संग्रह आणि अनेक अभ्यासपूर्ण लेख ज्यांच्या नावावर आहेत व ज्यांची नाममुद्रा सांगली आकाश-वाणीवरील निरूपणात्मक कार्यक्रमाने घरोघर पोचलेली आहे, असे डॉ.मुकुंद रघुनाथ दातार वारणानगर महाविद्यालयामध्ये ३४ वर्षे प्राध्यापक व ३ वर्षे प्राचार्य म्हणून कार्य करून सेवानिवृत्त झाले. सध्या त्यांचे वास्तव्य पुण्यात असून गीता धर्म मंडळाच्या मासिकाचे संपादक म्हणून  ते कार्यरत आहेत.

कोल्हापूर विद्यापीठातून त्यांनी ‘एकनाथाची काव्यसृष्टी एक अभ्यास’ या विषयावर प्रबंध लिहून १९८१ साली पीएच.डी. पदवी प्राप्त केली. संतसाहित्याचे थोर अभ्यासक प्रा.पां.ना.कुलकर्णी यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. हा प्रबंध समीक्षाग्रंथ रूपात प्रकाशितही झालेला आहे. संत एकनाथांच्या भक्तिरसाविष्काराचे स्वरूप व भक्तीविषयक संकल्पना यांचे मधुसूदन सरस्वती व रूप गोस्वामी यांच्या विवेचनाशी कोणते साम्य आहे व नाही याचा साधार शोध डॉ. दातार यांनी आपल्या पीएच.डी. प्रबंधात घेतलेला आहे.

‘संतकवी एकनाथ’, ‘तुका म्हणे’, ‘स्मरण केशवसुतांचे’ आणि ‘वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी’ हे चार समीक्षा ग्रंथ तसेच  ‘ज्ञानेश्वरी १२वा अध्याय’ , ‘कवी सुधांशु यांची कविता’, ‘वेचक एकनाथी अभंग’ आणि ‘मध्ययुगीन धर्मसंप्रदायी वाङ्मय’ असे ४ दर्जेदार संपादन ग्रंथ आणि ‘भावमुद्रा’ नावाचा कविता-संग्रह अशी डॉ.दातार यांची ग्रंथसंपदा आहे.

डॉ.दातार यांना त्यांच्या विविध ग्रंथलेखनाबद्दल व वक्तृत्वाबद्दल ज्ञान प्रबोधिनीचा मातृमंदिर पुरस्कार, पुणे नगरवाचन मंदिराचा उत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार, पु.भा.भावे स्मृती वक्तृत्व पुरस्कार, समर्थ रामदास स्वामी पुरस्कार (सांगली) आणि नाथदास पुरस्कार (पुणे) असे पुरस्कार मिळालेले आहेत. २०१५ साली त्यांना  त्यांच्या कार्यासाठी ‘स्नेहांजली पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. 

 

डॉ.दातार यांच्या मार्गदर्शनाखाली ३ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.साठी प्रबंध-लेखन केले असून तिघांनाही पीएच.डी. मिळालेली आहे. पैकी दोघांचे प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशितही झालेले आहेत.

वारणानगर परिसराचा कायापालट करणारे सहकार महर्षी कै.तात्यासाहेब कोरे यांच्या ‘मी एक कार्यकर्ता’ या आत्मकथनाचे सुरेख शब्दांकन डॉ.दातार यांनी केलेले आहे. वारणानगरच्या शैक्षणिक-सांस्कृतिक कार्यात यांचा सक्रिय सहभाग आहे. अध्ययन, अध्यापन, समीक्षण, संशोधन, मार्गदर्शन अशा विविध अंगांनी त्यांनी मराठी साहित्याची भरघोस सेवा केलेली आहे.

त्यांच्या ग्रंथांना डॉ.हे.वि. इनामदार, प्रा.पां.ना. कुलकर्णी, कवयित्री शांताबाई शेळके, डॉ.सदानंद मोरे या मान्यवरांच्या सुंदर प्रस्तावना लाभलेल्या आहेत. “व्यासंगातून येणारी वस्तुनिष्ठ दृष्टी आणि सहृदयतेतून लाभणारी समरसता हे डॉ.दातारांचे स्पृहणीय विशेष आहेत”, अशा शब्दांत डॉ.इनामदारांनी दातारांच्या संपादनाविषयी आपले मत व्यक्त केलेले आहे तर डॉ.सदानंद मोरे म्हणतात, “आस्वादक समीक्षेत सहृदयता आणि चिकित्सा यांचा समन्वय असावा लागतो. डॉ.दातारांच्या लेखनात तो आहे.”

- विद्याधर मा.ताठे

दातार, मुकुंद रघुनाथ