दावतर, वसंत केशव
वसंत केशव दावतर यांचा जन्म कोकणात मालवण जवळील मालडी येथे झाला. मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी बी.ए., पुढे एम.ए. केले. प्रा. न. र. फाटक यांचे ते विद्यार्थी होते. प्रारंभीच्या काळात ‘मौज’ साप्ताहिकात त्यांनी काही लेखन केले. ‘मृत्यूतील अज्ञातवास’ (१९५०) व ‘रंग ओला आहे’ (१९४९, साहाय्यक ज. द. देवकुळे) अशा रहस्यकथा लेखनाने त्यांची सुरुवात झाली. ‘रहस्यरंजन’शी ते निगडित होते. नंतर त्यांनी १९६२ साली ‘आलोचना’ या केवळ समीक्षेला वाहिलेल्या मासिकाचे संपादन केले (सप्टेंबर १९६२ ते ऑगस्ट १९९१). असे असले तरी पहिल्या वर्षी ललित व अनुवादित लेखन त्यांनी प्रसिद्ध केले आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाचे ‘साहित्य’ हे नियतकालिक (१९४७ ते १९५२, संपादक वा. रा. ढवळे) बंद पडले होते. ते १९५६ व १९५७ साली त्यांनी वार्षिक विशेषांकांच्या स्वरूपात प्रसिद्ध केले व तत्कालीन कथा, कादंबरी, कविता, समीक्षा इत्यादी विषयांवर मान्यवरांचे लेख तेव्हा मिळवून प्रकाशित केले होते. के. जे. सोमय्या कला, विज्ञान महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आणि विभाग प्रमुख म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. १९८५ साली ते त्या पदावरून निवृत्त झाले.
आलोचना-
मराठी साहित्य समीक्षेत ‘आलोचना’ मासिकाचे लक्षणीय योगदान आहे. तसे प्रा. स. शि. भावे यांनी स्पष्टपणे बोलूनही दाखवले होते. ग्रंथसमीक्षा, वाङ्मयेतिहास लेखन, नाट्यसमीक्षा, संशोधन, भाषा व व्याकरणविषयक लेखन, नियतकालिक विचार, ज्ञानपीठ पारितोषिके अशा विविध विषयांसंबंधी त्यांना आस्था होती. महाविद्यालयीन व विद्यापीठीय पातळीवरील मराठी विषयाच्या अध्यापनासंबंधी व अभ्यासक्रमासंबंधी त्यांनी ‘आलोचना’तून लेखन प्रसिद्ध केले आहे. ‘आलोचना’च्या ५ व्या, १०व्या, १५व्या आणि २०व्या वर्षांनिमित्ताने त्यांनी ‘संवादिता’ प्रसिद्ध केल्या होत्या. वेगवेगळ्या विषयांवर आलोचनाचे विशेषांकही त्यांनी प्रसिद्ध केले होते. साहित्यकलांकडे पाहण्याची त्यांची भूमिका कला-स्वातंत्र्यवादी होती. बा. सी. मर्ढेकर यांच्या सौंदर्यवादी भूमिकेचा पुरस्कार ते करीत. कमल देसाई, विजय तेंडुलकर व गंगाधर गाडगीळ यांच्या काही कृतींची त्यांनी विस्तृत परीक्षणे लिहिली होती.
समीक्षेइतकाच त्यांना भाषाविज्ञानात व व्याकरणात रस होता. ‘फर्दिन द सस्यूर’ या प्रख्यात भाषा वैज्ञानिकाच्या विचारांचा त्यांनी सूक्ष्मतेने अभ्यास केला होता. प्रत्यक्ष लेखनाबरोबरच वाङ्मयीन स्वरूपाची चर्चासत्रे घडवून आणण्यात त्यांना विलक्षण आस्था होती. अशाच एका चर्चासत्रातून त्यांनी ‘मराठी टीका’ (१९६६) हे पुस्तक संपादन करून प्रसिद्ध केले होते. केशवसुतांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘केशवसुत गाउनि गेले’ (१९६६) हे संपादन केले. खेरीज ‘गीतकाव्य’ (१९७१) या विशिष्ट काव्य प्रकारावरील पुस्तकही त्यांनी संपादित केले होते. महाविद्यालयीन प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना व जिज्ञासू अभ्यासकांना उपयुक्त ठरावे अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी ‘आलोचना’चे विशेषांकही प्रसिद्ध केले आहेत. ‘कुसुमाग्रज’ (मे १९६४), ‘केशवसुत’ (ऑक्टोबर- डिसेंबर १९९६), ‘श्री. कृ. कोल्हटकर’ (नोव्हेंबर- डिसेंबर १९७१), ‘पु. भा. भावे’ (नोव्हेंबर १९७७), ‘श्री. म. माटे’ (ऑगस्ट १९८७), ‘गीतकाव्य’ (सप्टेंबर- ऑक्टोबर-नोव्हेंबर १९६९), ‘वारकरी’ (फेब्रुवारी-मार्च १९७१) ‘शोकसंवेदन नाटक’ (मार्च-एप्रिल १९७२), ‘लघुकथा’ (ऑक्टोबर-नोव्हेंबर १९७३) ‘रंजनिका’ (मार्च १९७५), ‘कविता’ (ऑगस्ट १९९०), विद्यापीठ स्तरावर ‘मराठीचा अभ्यासक्रम’, ‘बालवाङ्मय’, ‘महाराष्ट्र आणि मराठी विशेषांक’, ‘ज्ञानपीठ पारितोषिके व जागतिक कविता उत्सव’ हे ते विशेषांक होत. याशिवाय ‘टिळक आणि आगरकर’ या नाटकावर चर्चा करणारे तीन लेख त्यांनी एकत्र प्रसिद्ध करून एक स्वतंत्र अंकही प्रकाशित केला होता.
‘संहिता, समीक्षा आणि पारिभाषिक संज्ञा’ (१९९४), ‘मराठीचे शिक्षण’ (१९९४), ‘मराठी शुद्धलेखन’ (१९९४), ‘तेंडुलकरांची नाट्यप्रतिभा’ (२००४) ही त्यांची पुस्तके त्यांचा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास व त्यातील जाणकारी स्पष्ट करणारी आहेत.
शेवटची काही वर्षे त्यांनी ‘मराठी संशोधन मंडळा’चे संचालक म्हणून काम पाहिले. तेव्हाही मध्ययुगीन मराठी साहित्यावर त्यांनी परिसंवाद आयोजित केला आणि आपल्या परीने ‘मराठी संशोधन पत्रिका’ ह्या नियतकालिकाला आकार देण्याचा प्रयत्न केला. अ. का. प्रियोळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ‘संशोधन मंडळा’च्या विद्यमाने त्यांनी संशोधनपर विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने वर्षभर आयोजित केली.
‘नवशक्ती’मध्ये त्यांनी चालवलेल्या ‘निर्विवाद’ या सदरातील लेखन त्यातील युक्तिवादपटुत्वामुळे व विषयावरील निःसंदिग्ध प्रभुत्वामुळे महत्त्वाचे ठरले होते.