Skip to main content
x

देसाई, चैतन्य पुंडरीक

हाराष्ट्रातील महत्त्वाचे संगीतशास्त्रकार म्हणून महत्त्वाचे असणारे चैतन्य पुंडरीक देसाई यांनी किराणा घराण्याच्या गायकीचे शिक्षण उ. अब्दुल करीम खाँसाहेबांकडून घेतले, तसेच भैयासाहेब अष्टिवाले यांच्याकडेही ते शिकले. कौटुंबिक पार्श्वभूमी वैद्यकाची असल्याने त्यांनी आयुर्वेदाची पदवी संपादन केली. संस्कृत भाषेचाही त्यांचा उत्तम व्यासंग होता.

भारतीय संगीताचा इतिहास व मूलभूत सिद्धान्त यांचा गाढा व्यासंग करून त्यांनी या विषयावर एक संशोधन प्रबंध लिहिला. विशेषतः प्राचीन संगीताच्या संदर्भात ते एक अधिकारी व्यक्ती मानले जात. ‘भारतीय संगीत’ (१९३१ ते १९३३) हे द्वैमासिक व ‘संगीत कला विहार’ या मासिकासह अनेक माध्यमांतून त्यांचे संगीतविषयक लेखन वेळोवेळी प्रसिद्ध झाले. या लेखांतून त्यांनी संगीतशास्त्र विषयक अनेक समस्यांचे निराकरण केले.

खैरागड येथील इंदिरा कला संगीत विद्यापीठात ते संशोधक अधिकारी म्हणून कार्यरत होते. या विद्यापीठातर्फे ‘श्रीनान्यभूपाल प्रणीत भरतभाष्यम्’ या ग्रंथाची संपादित आवृत्ती दोन खंडांत अनुक्रमे १९६१ व १९७६ साली प्रसिद्ध करण्यात आली. या खंडांचे संपादन चैतन्य देसाई यांनी केले. या खंडांमध्ये इसवी सन बाराव्या शतकातील ‘भरतभाष्यम्’ या ग्रंथाचे देसाईंनी विवेचक टिपांसह हिंदी भाषांतर केले. हे संपादन कार्य त्यांचे मोठे योगदान आहे.

‘संगीतविषयक संस्कृत ग्रंथ’ हा चैतन्य देसाई लिखित ग्रंथ महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळासाठी सुविचार प्रकाशन मंडळाने १९७९ साली प्रकाशित केला. यात प्राचीन काळातील ‘नारदीय शिक्षा’, ‘भरतनाट्य-शास्त्रम्’, ‘दत्तिलम्’, ‘बृहद्देशी’पासून आधुनिक काळातील ‘श्रीमल्लक्ष्यसंगीतम्’, ‘रागकल्पद्रुम’, ‘संगीत सुधाकर’, ‘अभिनव रागमंजरी’ अशा सुमारे ११० ग्रंथांची, त्यांचे ग्रंथकार, वर्ण्यविषय, त्यांवरील टीकाग्रंथ, मतांतरे, अनेक प्रचलित मतांची योग्यायोग्यता इ.चा सखोल आढावा घेतला आहे. या ग्रंथाच्या वाचनाद्वारे प्राचीन काळापासून संगीताची शास्त्रपरंपरा कशी बदलत गेली आहे याचे आकलन होऊ शकते. या दृष्टीने हे एक मोठेच कार्य चैतन्य देसाई यांनी केले. एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबईत त्यांचे निधन झाले.

         — चैतन्य कुंटे

देसाई, चैतन्य पुंडरीक