Skip to main content
x

देशमुख, यशवंत बाबूराव

              धुनिक पद्धतीने विचार करीत व मोजके चित्रघटक वापरून स्वत:ची चित्रे व त्यामागचा विचार प्रभावीपणे कलारसिकांपर्यंत पोहोचवणारे यशवंत देशमुख यांचा जन्म अकोल्यात झाला व विदर्भात बालपण गेले. त्यांच्या आईचे नाव वत्सला होते. पूर्वाश्रमीच्या शलाका भिसे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांनी १९८३ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि त्यांचे १९८८ मध्ये जे.जे.मधील कलाशिक्षण पूर्ण झाले. वास्तववादी शैलीत प्रावीण्य मिळविलेला हा तरुण चित्रकार पुढील काळात त्यातच अडकून न पडता अधिकाधिक प्रयोगशील होत गेला. त्यांना १९९३ मध्ये बॉम्बे आर्ट सोसायटीची ‘बेंद्रे-हुसेन’ शिष्यवृत्ती मिळाली. सहाव्या भारत भवन भारतीय समकालीन कला द्वैवार्षिक प्रदर्शनात १९९६ मध्ये देशमुख यांना ‘ग्रँड प्राइझ’ मिळाले, तर २००१ मध्ये बोस पॅशिया मॉडर्न प्राइझच्या स्पर्धेत त्यांना सेकंड रनरअपचा मान मिळाला.

              त्यांची चित्रे १९९३ मध्ये ‘मानवाकृतिप्रधान’ (फिगरेटिव्ह) शैलीपर्यंत येऊन स्थिरावली. या चित्रांचे वर्गीकरण जरी ‘मानवाकृतिप्रधान’ असे इथे केले असले, तरी काळच्या इतर चित्रकारांच्या मानवाकृतीप्रधान चित्रांपेक्षा ती खूप वेगळी आहेत. देशमुख यांच्या चित्रांमध्ये मानवाकृतींचे आकार अवकाशात एका स्थितीत स्थिर झालेले दिसत. या आकृती बर्‍याचदा चेहराविहीन व अवकाशात तरंगणाऱ्या असत. या चित्रांमधील रंगलेपन सपाट असे व गडद रंगछटा चित्रपृष्ठावर विरोधाभास प्रकट करणाऱ्या असत. या चित्रस्थितीची परिणती आकार अधिकाधिक सुलभ होण्यात व चित्रपटल रंगविहीन होण्यात झाली. त्यांची अधिकतर चित्रे करड्या रंगात होत गेली.

              देशमुख यांच्या चित्रांतून १९९५ नंतर मानवाकृती नाहीशा होऊन फक्त काही वस्तूंचे आकार उरले. हे आकार द्विमित असले तरी अवकाशाचा आभास तयार करणारे होते. अवकाशप्रधान चित्रपटलावर मोजकेच आकार चित्रांत दिसू लागले. या चित्रांचे स्वरूप वास्तवाचे चित्रण असे न राहता मोजक्या रंगछटांमधील वस्तू व तिच्या आजूबाजूला जाणवणारे वातावरण अशा प्रकारचे झाले. त्यांचे २००४ मधील बंदुकीचे चित्र या टप्प्याचे एक उत्तम उदाहरण आहे. देशमुख यांची विशिष्ट ओळख या काळातच तयार झाली.

              आपल्या कलेबद्दल बोलताना देशमुख नेहमी आपल्या बालपणात अनुभवलेल्या प्रसंगांचा उल्लेख करतात. या अनुभवांमध्ये दृश्यप्रतिमांचा प्रभाव अमूर्त जाणिवांच्या अंगाने झालेला असतो. आठवणींमधून समोर येणारे त्या वेळी अनुभवलेले वातावरण, वस्तू, निसर्ग हे सर्व जाणिवांच्या पातळीवर उरते. त्यामुळेच देशमुख यांच्या चित्रांत वस्तूंच्या ओळखीपेक्षाही अमूर्ततेची जाणीवही जास्त महत्त्वाची ठरते.

              आकार व अवकाश यांच्या योग्य संयोगातून देशमुख ही जाणीव मूर्त पातळीवर घेऊन येतात. ‘आकारामधील अवकाश’ आणि ‘अवकाशाचा आकार’ या दोन्ही बाबींचा ते काटेकोरपणे विचार करताना दिसतात. त्यामुळे त्यांची चित्रे बघताना एक समृद्ध अनुभव मिळतो. हा अनुभव जरी आपल्या वस्तूंच्या अनुभवांशी मिळताजुळता असला, तरी चित्रांमध्ये तो अतिशय नवीन व मूलगामी ठरतो.

- नितीन कुळकर्णी

देशमुख, यशवंत बाबूराव