Skip to main content
x

देवरकोंडा, सुदर्शन रामचंद्र

               सोलापूरमधील एक प्रसिद्ध व्यक्तिचित्रकार म्हणून सुदर्शन रामचंद्र देवरकोंडा यांची ख्याती आहे. त्यांचा जन्म सोलापूरला झाला. मुंबईत कलेच्या क्षेत्रात त्यांनी ‘दर्शन’ या टोपणनावाचा वापर केला.

              सोलापूरच्या घरची जबाबदारी मोठी होती. परंतु लहानपणापासूनच लिओनार्दो दा व्हिंची, मायकेल अन्जेलो, एस.एम.पंडित यांसारख्यांच्या चित्रांचा प्रभाव पडलेला असल्याने भारावलेले त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देईना. त्या परिस्थितीत शिक्षणासाठी मुंबईला येऊन त्यांनी पडेल ती जबाबदारी स्वीकारली व संपूर्ण शिक्षण संपेपर्यंत जिद्दीने सोलापुरात पाय ठेवला नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र त्यांनी सोलापुरातच पाय रोवले व त्यांनी या क्षेत्रासच स्वत:ला वाहून घेतले. कला शिक्षकाच्या भूमिकेतून कार्य करीत असतानाच, सोलापूर परिसरात त्यांनी दृश्यकलेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध उपक्रम आयोजित केले. मुळातच व्यक्तिचित्र, पेन्सिल ड्रॉइंग या माध्यमाची अनिवार आवड असल्याने विद्यार्थिदशेतच त्यांनी या विषयावर प्रभुत्व मिळविले. पेन्सिलीला टोक करण्याची त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती.

              व्यक्तीच्या चेहऱ्यावरील मांसल भागाचा बोलकेपणा व त्या व्यक्तीच्या कौटुंबिक-सामाजिक बांधीलकीला सुखावणारा हुबेहूबपणा या दोन्ही गोष्टी त्यांच्या व्यक्तिचित्रणात सामावलेल्या दिसतात. तैलरंगातील व्यक्तिचित्रण करताना चपट्या सेबल हेअर ब्रशचा ते वापर करतात. चित्रण वास्तववादी असले तरी त्यातील कलात्मकता जपली जाते. या चित्रणाचे वैशिष्ट्य म्हणजे व्यक्तीचा ‘स्किन कलर’ जपला जातो व त्यानुसार शेडलाइट केले जातात. अगदी पातळ रंगांनी शेवटचा इफेक्ट दिला जातो.

              सोलापूरला परतल्यानंतर देवरकोंडा यांनी जास्तीत- जास्त व्यक्तिचित्रणावर भर दिला. यांपैकी त्यांची रामकृष्ण मोरे, डॉ.वळसंगकर, पंडित तारानाथ राव इत्यादी व्यक्तिचित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

              मुंबईत जी.डी. आर्ट व ए.एम.ला शिकत असताना त्यांनी पुस्तकांची मुखपृष्ठे, कथाचित्रे व जाहिरातींची कामे केली. आठ वर्षे ते चित्रपटांशी संबंधित पोस्टर्स, बॅनर्सची कामे करीत होते. सोलापूरच्या चित्रकला महाविद्यालयात निवृत्त होईपर्यंत प्राचार्य पदाची धुरा सांभाळताना त्यांनी कर्तव्येही तितक्याच निष्ठेने पार पाडली. आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने त्यांचा १९८७ साली सन्मान करण्यात आला. त्यांना १९९७ मध्ये उत्कृष्ट कलाध्यापकाचा विद्यापीठीय पुरस्कार प्राप्त झाला. मान्यवर सामाजिक संस्थांमध्ये, तसेच शासनाच्या अभ्यासक्रम नियोजनाचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. सुदर्शन देवरकोंडा यांनी सोलापूरचे कलाविश्‍व समृद्ध केले आहे.

              - पद्मजा देशपांडे

देवरकोंडा, सुदर्शन रामचंद्र