Skip to main content
x

दवे, रमेश महिपतराम

     डॉ. रमेश महिपतराम दवे यांनी मुंबई विद्यापीठातून तत्त्वज्ञान विषयात एम.ए. आणि पीएच.डी. या उपाधी प्राप्त केल्या. त्यानंतर संस्कृतमध्ये कोविद, हिंदी विषयात कोविद व विनीत या उपाधी मिळविल्या. मुंबईच्या एस.आय.इ.एस. महाविद्यालयात तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र या विषयांचे अध्यापन त्यांनी केले. त्यांनी ३७ वर्षांचा प्रदीर्घ कालखंड महाविद्यालयीन अध्यापनात व्यतीत केला आहे. २००० मध्ये तत्त्वज्ञान विभागप्रमुख या पदावरून ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर त्यांनी ‘अनंताचार्य भारतीय विद्या संशोधन मंडळ’ या संस्थेचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला.

     भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, धर्म हे त्यांचे अभ्यासविषय. भारतीय विद्या भवन, सोमय्या संस्कृतिपीठम्, जैन सोशल ग्रुप, एशियन आटर्स अ‍ॅन्ड कल्चरल सेंटर, नूतन महिला महाविद्यालय (विलेपार्ले) अशा विविध ठिकाणी त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. ‘ऑल इंडिया रेडियो’वरून गुजराती व हिंदी भाषांतून त्यांची व्याख्याने प्रसारित झाली आहेत.

     १०० हून अधिक चर्चासत्रे व परिषदा यांमध्ये उपस्थित राहून त्यांनी अनेक शोधनिबंध प्रस्तुत केले आहेत. यांपैकी काही नावे- जागतिक धर्मपरिषद (लंडन १९८०), आंतरराष्ट्रीय भक्ती परिषद (वाराणसी १९८५), पौर्वात्य-पाश्चिमात्य तत्त्वज्ञान संमेलन परिषद (मुंबई १९८८), पुराणांविषयी आंतरराष्ट्रीय परिषद (मुंबई १९९७) उपासनेविषयी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र (सोमैया, मुंबई १९९३).

    डॉ. रमेश दवे यांची एकूण २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गुजराती, हिंदी व इंग्लिश भाषांमधील ही पुस्तके तत्त्वज्ञान, धर्म, तर्कशास्त्र या विषयांशी निगडित आहेत. त्यांपैकी काही महाविद्यालयीन अभ्यासक्रमात अंतर्भूत करण्यात आली आहेत.

    डॉ. दवे अनेक विख्यात संस्थांचे आजीव सदस्य आहेत. त्यांपैकी काही आहेत - All India Philosophical Congress, गुजरात तत्त्वज्ञान परिषद, अखिल भारतीय दर्शन परिषद, Bombay Philosophical Society, Bombay Astrological Society,संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत  WCRP (World Congernece of Religion for Peace) या संस्थेच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी १९७५ ते १९८५ अशी दहा वर्षे काम पाहिले.

     शिक्षणक्षेत्रात व्याख्याते म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजाविली आहेच, त्याचबरोबर इतर जबाबदाऱ्याही पार पाडल्या आहेत. १९७९ ते १९९९ या कालावधीत तत्त्वज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठात त्यांनी कार्य केले. १९८४ ते १९८७ या काळात कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या विश्वपरिषदेतही काम केले.

    - डॉ. गौरी माहुलीकर

दवे, रमेश महिपतराम