Skip to main content
x

ढेरे, रामचंद्र चिंतामण

     रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील निगडे या छोट्याशा खेडेगावात आजोळी झाला. चिंतामण गंगाधर ढेरे हे त्यांचे वडील व शारदा या त्यांच्या आई होय. ढेरे यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी (१९३५) त्यांच्या वडिलांचे निधन उर्से धामणे या मावळातील गावी झाले. आई व पाठची बहीण प्रमिला यांच्यासह त्यांना लगेच आजोळी जावे लागले. वडिलांच्या तेराव्या दिवशी आईने प्रायोपवेशन करून प्राणत्याग केला. थोरले व धाकटे मामा व वृद्ध आजी यांनी या दोन्ही भावंडांचे पालकत्व स्वीकारले. वयाच्या १४ व्या वर्षी आजी, मामा व धाकटी बहीण यांच्यासह ढेरे पुणे मुक्कामी आले व म्यनिसिपल शाळेतून व्हर्नाक्युलर फायनल या परीक्षेत सर्वप्रथम आले. पुढे उपजीविकेसाठी जमतील तशी अर्धवेळ विविध कामे (शिक्षक, मुद्रित शोधक, ग्रंथपाल इत्यादी) करीत रात्रशाळेत शिक्षण घेत शालान्त परीक्षा देत असतानाच राष्ट्रभाषा ‘प्रवीण’, ‘साहित्य विशारद’ अशाही परीक्षा दिल्या. पुढे बहि:स्थ पद्धतीने पुणे विद्यापीठात बी.ए. झाले. एम.ए.ची परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे देता आली नाही. पण एकीकडे स्वतंत्र संशोधनपर ग्रंथ प्रकाशित झाले होते. १९७५ मध्ये ‘षट्स्थल: एक अध्ययन’ या संशोधनपर प्रबंधासाठी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही पदवी प्राप्त झाली. १९८०मध्ये ‘लज्जागौरी’, ‘चक्रपाणि’, ‘महाराष्ट्राचा देव्हारा’ आणि ‘संतसाहित्य आणि लोकसाहित्य: काही अनुबंध’ या ग्रंथांसाठी पुणे विद्यापीठाची डी.लिट. ही सर्वोच्च पदवी प्राप्त झाली. २००४मध्ये डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या अभिमत विद्यापीठ पुणे यांनी सन्माननीय डी.लिट. (डॉक्टर ऑफ लेटर्स) ही पदवी दिली. औपचारिक पदवीप्राप्तीसाठी प्रयत्न न करता ह्या सर्व सन्मानांनी  ढेरे यांच्या ज्ञाननिष्ठेचा आणि संशोधन कार्याचा गौरव केला आहे.

‘श्रीविठ्ठल: एक महासमन्वय’, ‘लज्जागौरी’, ‘दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा’, ‘नाथ संप्रदायाचा इतिहास’ या ग्रंथांची कन्नड भाषेत भाषांतरे झाली असून ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’, ‘विसोबा खेचर विरचित षट्स्थल’, ‘शिखर शिंगणापूरचा श्रीशंभूमहादेव’ अनुवादित होत आहेत. ‘श्रीविठ्ठल’ व ‘लज्जागौरी’ या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.

ढेरे यांच्या संशोधनाची जातकुळी प्रतिभा-प्रज्ञावंताची आहे. कविता, कथा, कादंबरी लेखकांबाबतच प्रतिभेचा विचार बहुधा केला जातो. परंतु कुठल्याही क्षेत्रातील संशोधक मुळात प्रतिभासंपन्न असावा लागतो. त्याला प्रज्ञेची जोड मिळाल्यानंतरच खर्‍या अर्थाने नवनिर्मिती होते. ढेरे यांचे सर्व संशोधन समाज आणि संस्कृती यांच्या अनुबंधातून झाले आहे. ते एखाद्या प्रतिभासंपन्न कवीच्या निर्मितीप्रमाणे आहे. कारण ढेरे यांचा मूळ पिंड हा कवीचाच आहे. ऐन उमेदीच्या काळात ढेरे यांच्या साहित्य निर्मितीचा प्रारंभ त्यांच्या गावच्या भजनी मंडळे आणि विशेषतः शहरी परंपरेतले मित्र यांच्यासाठी रचना करीत झाला. पुढील काळातील त्यांचे लेखन पाहिले तर कधी काळी तमासगीर मित्रांसाठी त्यांनी पोवाडे, लावण्या ह्यांची रचना केली असेल, यावर विश्वास बसू नये. पण १९५३ ते १९६० या काळात पुण्याच्या व मुंबईच्या आकाशवाणीसाठी त्यांनी पाच संगीतिका लिहिल्या होत्या. ‘कांचनमृग’, ‘प्रेमयोगिनी मीरा’, ‘यक्षप्रिया’ या शीर्षकांवरून त्यांच्या स्वरूपाची कल्पना येते. याखेरीज अप्रकाशित काही स्फुट कविताही आहेत. वाच्यार्थाने पुढे कविता मागे पडली असली, तरी त्यांच्या ग्रंथांची काव्यात्म पण अन्वर्थक शीर्षके आणि अत्यंत संवेदनशील विषयांवरील लेखनाची काव्यात्म शैली यांतून त्यांच्या कविप्रकृतीची कल्पना येते. कविप्रकृतीला वस्तुनिष्ठ पुरावे, तर्क आणि अभ्यासपूर्ण मांडणी यांची साथ असल्याने रसिकसमुद्रा आणि तर्कमुद्रा यांचा मनोज्ञ संगम त्यांच्या सर्व ग्रंथांतून प्रत्ययास येतो. त्यासाठी अंतरज्ञानशाखीय अभ्यासाचा भक्कम पाया आहे.

कविता, स्फुट लेख, चरित्रे, संत साहित्यासंबंधीचे संशोधन, सहसा अलक्षित अशा मुसलमान मराठी संत कवींवरचे संशोधन किंवा वारकरी संत साहित्याप्रमाणे नाथ संप्रदाय, देवी (स्त्री देवता) संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, आधुनिक कवींची संपादने आणि नाट्योदय मीमांसा अशा अनेक विषयांचा धांडोळा ढेरे यांनी घेतला आहे. त्याचा केवळ अल्पसा परिचयच येथे शक्य आहे.

ढेरे हे प्रामुख्याने प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्याचे संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक, लोकसंस्कृती व लोकसाहित्याचा एकूण जीवनानुबंध शोधणारे संशोधक आहेत. भारतीय संदर्भात महाराष्ट्रातील संस्कृतीचा शोध घेणारे साक्षेपी संशोधक आहेत. हा त्यांचा संशोधक म्हणून परिचय फार पृष्ठस्तरीय ठरावा एवढा सूक्ष्म, सखोल, संख्यात्मकदृष्ट्याही विपुल आणि ऐतिहासिक - भौगोलिकदृष्ट्या विस्तृत स्तरावरच्या त्यांच्या संशोधनाचा व्याप थक्क करणारा आहे.

भौतिकदृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विद्यार्थीदशेतच लेखन-संशोधनाला प्रारंभ करून त्याच प्रतिकूलतेशी झगडत गेल्या साठ-पासष्ट वर्षांत त्यांची एकूण ग्रंथसंख्या शंभरी ओलांडून गेली आहे. सन्माननीय डी.लिट.पासून साहित्य अकादमी पुरस्कारांसह लहानमोठे सुमारे पन्नासहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अनेक ग्रंथांची विविध भाषांत भाषांतरे झाली आहेत. तीन गौरवग्रंथांतून त्यांच्या संशोधन कर्तृत्वाचा आढावा घेतला गेला आहे. एखाद्या संशोधन संस्थेला साजेसे शोधकार्य ढेरे यांनी निर्माण केले आहे. त्यासाठी स्वतःचा प्रचंड, विविधांगी व सर्वार्थाने अमूल्य ग्रंथसंग्रहही प्रतिकूलतेवर मात करीत सिद्ध केला आहे.

प्राचीन व मध्ययुगीन मराठी साहित्याचा समाज-सांस्कृतिक अभ्यास हा त्यांच्या सर्वच संशोधनाचा पाया आहे. भारतीय संदर्भात महाराष्ट्रातील संस्कृतीचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय संस्कृतीच्या मुळांचा शोध म्हटले की, सामान्यपणे वेदांपासून प्रारंभ होतो आणि संस्कृत साहित्याचे आधारच प्रमाण मानले जातात. परंतु ढेरे संस्कृतीच्या गाभ्यातील लोकसांस्कृतिक साधनांचा शोध साक्षेपाने घेतात. एम.एन.श्रीनिवासन याबाबतीत त्यांचे पथप्रदर्शक ठरतात. श्रीनिवासन यांच्याप्रमाणेच त्यांच्या मते अभिजन व लोक या संस्कृतींचे परस्पराभिसरण होत असते. त्यातही प्रामुख्याने लोकसंस्कृतीमधील अनेक घटकांचे ‘संस्कृतिकरण’ होण्याची प्रक्रिया अधिक प्रबळपणे दिसते. कोणत्याही समाजातील देव-देवता, यांच्या मुळाशी असलेल्या श्रद्धा, उपासना, चालीरीती-रूढी, अगदी भाषासुद्धा यांचे ‘नागरी’करण होण्याची प्रक्रिया सतत घडत असते.

डॉ. ढेरे यांच्या अगदी प्रारंभिक ‘दत्त संप्रदायाचा इतिहास’ (१९५८) पासून पुढे ‘खंडोबा’ (१९६१), ‘चक्रपाणि’ (१९७७), ‘महाराष्ट्राचा देव्हारा’ (१९७८), पुणे विद्यापीठातील कै. न. चिं. केळकर व्याख्यान मालेतील व्याख्याने, ‘लज्जागौरी’ (१९७८) (मातृदेवतांच्या उपासनेवर गंभीर प्रकाश टाकणारा प्रबंध), ‘श्री विठ्ठल: एक महासमन्वय’ (१९८४) (दक्षिणेतील गोपजनांच्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णवीकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा), ‘महामाया’ (१९८८) (दक्षिणेतील मध्यकालीन काव्यनाटकांतून कैकाडी स्त्रीच्या रूपात प्रकटलेल्या महामायेचे रहस्य उलगडण्याच्या निमित्ताने समाज, धर्म आणि कला यांच्या परस्परसंबंधांचा शोध डॉ.तारा भवाळकर यांच्या सहयोगाने), ‘शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव’ (२००१) या डॉ. ढेरे यांच्या अतिमहत्त्वाच्या व अन्य सर्वच ग्रंथांत ढेरे यांच्या संशोधनदृष्टीचा प्रत्यय येतो.

या अतिमहत्त्वाच्या स्वतंत्र संशोधन ग्रंथांखेरीज त्यांनी केलेली संपादने महत्त्वाची आहेत. त्यातील काही हस्तलिखितांचा प्रयत्नपूर्वक शोध घेऊन ती मुद्रित स्वरूपात आणली आहेत. या ग्रंथांच्या विस्तृत प्रस्तावना आणि टिपा यांमधून ढेरे यांची स्वयंप्रज्ञ प्रातिभ दृष्टी व्यक्त होते. पूर्वप्रकाशित व पुनःसंपादित ग्रंथांवर नवा प्रकाश टाकला आहे. अशा संपादनांपैकी ‘आज्ञापत्र’ (रामचंद्रपंत अमात्यप्रणीत स्वराज्यनीती १९६०), ‘श्रीशिवशान्त स्तोत्र तिलकम्’ (१९६०), (प्र. शं. जोशी सहयोगाने), ‘निरंजन माधव-विरचित सुभद्रा स्वयंवर’ (१९६७), ‘संतांच्या आत्मकथा’ (१९६७, १९६९-दुसरी आवृत्ती), ‘संतांच्या चरित्रकथा’ (१९६७), ‘मानपुरी पदावली’ (१९६७), ‘श्री आदिनाथ भैरव-विरचित नाथलीलामृत’ (१९७२), ‘श्री चक्रधर-निरूपित श्रीकृष्ण चरित्र’ (१९७३), ‘महिकावतीची बखर’ (१९७३), ‘मुरारिमल्ल - विरचित बाळक्रीडा’ (१९७७), ‘बोरकरांची प्रेमकविता’ (१९८७), ‘विसोबा खेचर - विरचित षट्स्थल’ (१९८९) या काही ग्रंथांच्या निवडक शीर्षकांवरही ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, आधुनिक कविता, आदी अनेकविध विषय डॉ. ढेरे यांच्या शोधविषयांचा व्याप दाखवतात. याखेरीज ‘सरदार वल्लभभाई पटेल’ (१९५०) या त्यांच्या पहिल्या पुस्तकापासून संतचरित्रे, ‘विवेकानंद, शारदामाता आणि रामकृष्ण परमहंसां’पासून ते ‘मुसलमान मराठी संत कवी’ (१९६७) अनेक लहानमोठे चरित्रग्रंथ हे ढेरे यांच्या ग्रंथनिर्मितीचे एक स्वतंत्र दालन आहे तर ‘अमृतकन्या’ (१९५९), ‘विविधा’ (१९६७), ‘लोकसंस्कृतीची क्षितिजे’ (१९७१), ‘विराग आणि अनुराग’ (१९७५), ‘लौकिक आणि अलौकिक’ (१९७६),‘कल्पवेळ’ (१९७६), ‘लोकसंस्कृतीचे उपासक’ (१९६४) असे कितीतरी स्फुट लेखसंग्रह आहेत. खेरीज ‘लोकदेवतांचे विश्व’ (१९९६) आणि अगदीच वेगळ्या स्वरूपाचा ‘भारतीय रंगभूमीच्या शोधात’ (१९९६) असे ग्रंथही आहेत. याखेरीज ‘इंद्रायणी’ नावाच्या नियतकालिकाचे द.र.कोपर्डेकर (पुणे) यांच्यासह चौदा अंकांचे (१९६२-१९६३) संपादन त्यांनी केले होते. याखेरीज अद्यापही ग्रंथरूपात न आलेले असंख्य स्फुट लेख काही मुलाखती आहेत.

‘लज्जागौरीचा’ पुढचा टप्पा म्हणून ‘आनंदनायकी’ (२००२), ‘तुळजाभवानी’ यांनंतर ‘कोल्हापूरच्या महालक्ष्मी’च्या शोधकार्यात ढेरे मग्न राहिले , त्यामुळे  स्त्री-देवतांच्या निमित्ताने भारतातील-महाराष्ट्रातील मातृदेवतांवर नवीन प्रकाश पडण्यास मदत झाली आणि तिथल्या स्त्री-जीवनाच्या स्थितिगतीचा एक विशाल पट लोकसांस्कृतिक प्रकाशात स्पष्ट झाला .

- डॉ. तारा भवाळकर

ढेरे, रामचंद्र चिंतामण