Skip to main content
x

गाडगीळ, माधव धनंजय

       माधव धनंजय गाडगीळ यांचा जन्म पुणे येथे झाला. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ डॉ. धनंजयराव गाडगीळ हे त्यांचे वडील. माधव गाडगीळांचे शालेय आणि बी.एस्सी.पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर ते एम.एस्सी. करण्यासाठी मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये गेले आणि त्यांनी मरीन बायोलॉजीमध्ये एम.एस्सी. केली. वडील धनंजयराव गाडगीळ यांना विज्ञान, पक्षिनिरीक्षण, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र अशा अनेक विषयांत रस होता. १९२८ साली पुण्यात सुरू झालेल्या सृष्टिज्ञान मासिकाचे, मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे वडील आजीव सभासद असल्याने ती आणि अन्य मासिके, पुस्तके माधवरावांना सहजी वाचायला मिळाली. त्यांतून माधवरावांची विज्ञानाची आवड वाढीला लागली. पक्षितज्ज्ञ डॉ. सलिम अली वडिलांचे मित्र होते. माधवरावांच्या लहानपणी त्यांना एका पक्ष्याच्या नावाबद्दल शंका होती. त्यांनी आपली ही शंका वडिलांना विचारली. वडिलांनी ही शंका डॉ. सलिम अली यांना माधवरावांनी पत्र लिहून विचारावी, असे सुचविले. माधवरावांनी पत्र लिहिल्यावर त्यांना एका आठवडयात सलिम अलींचे उत्तर आले होते.

प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ प्रा.जे.बी.एस. हाल्डेन भारतात स्थायिक झाले होते. त्यांची आणि माधवरावांच्या वडिलांची ओळख होती. माधवरावांच्या शालेय वयात त्यांच्या घरी एक रशियन अर्थशास्त्रज्ञ उतरायला आले होते. त्यांनी तेरा वर्षांच्या माधवरावांना ‘‘तू पुढे कोण होऊ इच्छितोस,’’ म्हणून प्रश्‍न विचारल्यावर त्यांनी, ‘‘मी पुढे जीवशास्त्रज्ञ होऊ इच्छितो,’’ असे सांगितले होते. पुण्यातल्या वेताळ टेकडीजवळ माधवरावांचे घर होते. ते अनेकदा टेकडीवर जात आणि तेथून पक्षिनिरीक्षण करीत, झाडे पाहत. लहानपणापासून त्यांना निसर्गदर्शनाची हौस होती, ती त्यांना पुढे आपल्या व्यवसायात उपयोगी पडली.

१९६५ साली माधवरावांचा सुलोचना फाटक यांच्याशी विवाह झाला. त्यांनी पुण्यातून गणित विषयात एम.एस्सी. केले होते. विवाहानंतर दोघेजण अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात पीएच.डी. करायला गेले. माधवरावांनी जीवशास्रात आणि सुलोचनाबाईंनी गणितात पीएच.डी. मिळवून ते दोघेही १९७१ साली भारतात परतले. वस्तुत: दोघांनाही हार्वर्डमध्ये प्राध्यापकपद मिळत होते; पण भारतातच येऊन काम करायची दोघांचीही प्रबळ इच्छा होती.

१९७१ साली परत आल्यावर दोघांनीही, ‘विज्ञानवर्धिनीया पुण्याच्या संशोधन संस्थेत दोन वर्षे संशोधनाचे काम केले. या काळात त्यांनी आणि त्यांचे महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.वा.द. वर्तक या दोघांनी मिळून खूप पायपीट करून महाराष्ट्रातल्या देवरायांचा अभ्यास केला आणि त्यांवरील आपले संशोधन निबंध प्रसिद्ध केले. नंतर १९७३ सालापासून माधवराव आणि सुलोचनाबाई, दोघेही बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये संशोधन आणि अध्यापनासाठी गेले. प्रथम ते दोघे तेथील सैद्धान्तिक अभ्यासकेंद्रात रुजू झाले. तेथे लोकोपयोगी विज्ञानावर फारसे काम झालेले नव्हते. ते करावे असे माधवरावांच्या मनात आले. ते त्यांनी संचालक प्रा. सतीश धवन यांना बोलून दाखवले. प्रा. धवन यांनी माधवरावांना प्रोत्साहन दिले. मग माधवरावांनी कर्नाटकातील बंदिपूरच्या जंगलातील हत्तींच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास केला. त्यांच्या पुढाकाराने प्रथमच भारतातील हत्तींची मोजदाद झाली. माहुतांबरोबर बोलण्याच्या गरजेतून ते कानडी भाषा शिकले. त्यामुळे ते कानडीतून अस्खलित लिहू-बोलू शकतात.

१९७३ साली माधवराव साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७५ साली ते सहयोगी प्राध्यापक झाले आणि १९८१ साली प्राध्यापक झाले. १९८३ साली माधवरावांनी संस्थेत पारिस्थितिकी विज्ञान केंद्र (सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्स) सुरू केले. पुढे ते त्या केंद्राचे दहा वर्षे अध्यक्षही होते. पारिस्थितिकी जीवशास्त्राचे भारतातील आद्य संशोधक म्हणून माधवरावांचा उल्लेख करायला हरकत नाही. प्रा.राघवेंद्र गदगकर, आर. सुकुमार हे त्यांचे विद्यार्थी होत.

कर्नाटकात बांबूच्या संबंधात काही समस्या निर्माण झाली. त्याच्या चौकशी समितीवर माधवराव होते. पण त्या चौकशी समितीच्या कामावर माधवराव समाधानी नव्हते. मग त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षक घेऊन त्या प्रश्‍नाचा मुळापासून अभ्यास केला आणि त्याची तड लावली. मेंढपाळ आणि धनगरांच्या जीवनाचा पारिस्थितिकीवर काय परिणाम होतो, याचा त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या सामाजिक जातिव्यवस्थेबद्दलही त्यांनी अभ्यास केला. कैलाश मल्होत्रा या प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञाबरोबर त्यांनी १९८० साली भारताला भेडसावणाऱ्या विविध पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास केला. त्या वेळी केंद्र सरकारात नव्याने स्थापन झालेल्या पर्यावरण विभागाला त्यांनी त्या संबंधातील अहवाल सादर केला. त्यासाठी त्यांनी केरळ-कर्नाटक-महाराष्ट्रात असणारा पश्चिम घाट, राजस्थानचे वाळवंट, हिमालय, मध्य भारतातील वने आणि दख्खनच्या पठारावरील शेती यांचा स्वत: फिरून अभ्यास केला. हा त्यांचा अहवाल आधुनिक भारतामधील विविध प्रकारच्या पर्यावरणीय ऱ्हासाचा सांगोपांग विचार करणारा अभ्यास म्हणून ओळखला जातो. त्यासाठी त्यांनी नैसर्गिक संपत्तीचे व्यापारीकरण न करता, लोकशाहीकरण करण्याचा आणि त्यात लोकसहभाग मिळवण्याचा आग्रह धरला.

एखादा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा पर्यावरण, तांत्रिक, सामाजिक, आर्थिक अंगांच्या दृष्टिकोनातून अभ्यास व्हावा म्हणून तसा कायदा येण्यापूर्वी अंतराळ संशोधन केंद्राच्या एका प्रकल्पाचा अभ्यास माधवरावांनी प्रा. सतीश धवन यांच्या सांगण्यावरून केला. तो भारतातील तसा पहिला अभ्यास. त्यानंतर केंद्र सरकारने तसा कायदाच आणला. माधवरावांनी अशा अनेक समित्यांवर काम केले. अशाच सामाजिक भावनेतून त्यांनी चंडिप्रसाद भट्ट यांच्याबरोबर चिपको आंदोलनात, सायलेंट व्हॅली आंदोलनात आणि पश्चिम घाट बचाव मोहिमेत सक्रिय सहभाग दिला. गरिबांच्या पर्यावरणवादास त्यांनी बळ पुरविले. केवळ शिकविणे हा उद्देश न ठेवता, इतर संशोधक, शिक्षक, धोरणकर्ते, स्वयंसेवी संस्था, शेतकरी आणि सामान्य नागरिकांबरोबर त्यांनी अनेक प्रकल्प राबविले.

आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन विकसित करीत त्यांनी रोमिला थापर (इतिहास), रामचंद्र गुहा (समाजशास्त्र), के.सी. मल्होत्रा (मानववंशशास्त्र), चार्ल्स पेरिंग्ज (अर्थशास्त्र), मनोहरन (भाषाशास्त्र), सलिम अली (पक्षिशास्त्र), अशा अनेकांबरोबर काम केले. काही शेतकऱ्यांना बरोबर  घेऊन त्यांनी लेखनही केले. हार्वर्डहून परत आल्यावर माधव गाडगीळांच्या कारकिर्दीचे अवलोकन केले तर असे लक्षात येते की, १९७०च्या दशकात त्यांचे काम पर्यावरण संवर्धनाशी संबंधित होते. १९८०च्या दशकात ते वननीतीशी संबंधित होते. १९९०च्या दशकात त्यांनी जैववैविध्य संवर्धन, आंतरराष्ट्रीय प्रयत्न आणि धोरणांविषयी काम केले, तर एकविसाव्या शतकात त्यांनी पर्यावरण शिक्षणाकडे लक्ष वळवून त्यात लहान मुलांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न केले.

विविध समाजामध्ये कित्येक पिढ्यांपासून टिकून असलेले परंपरागत ज्ञान आणि पद्धती यांची नोंद ठेवण्याचे कार्य त्यांनी केले. त्यातूनच देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांनी दबावगट निर्माण केले. बांबूची परंपरागत पद्धतीने केली जाणारी छाटणी ही अधिक शाश्वत असल्याचे आणि कागद उद्योगाकडून होणारी बांबूंची तोड पर्यावरणाला मारक आहे हे त्यांनी दाखवून दिले. गाडगीळ यांच्या अभ्यासामुळे वनउद्योगासाठी दिले जाणारे अनुदान वनांसाठीच कसे मारक आहे, हे स्पष्ट झाले. विपुल जैवविविधतेच्या जगातील २५ प्रमुख देशांपैकी एक असलेल्या पश्चिम घाटातील जैवविविधतेची नोंद ठेवण्याचे काम त्यांनी हाती घेतले. त्यांनी तरंतुला प्रकारच्या कोळ्याची जात आणि टोरंट प्रकारच्या बेडकाची जात शोधली. त्यांच्या अभ्यासातून देशातील पहिला नीलगिरी बायोरिझर्व्ह स्थापन झाला.

त्यांनी विद्यार्थी आणि गावकरी यांच्या मदतीने अगदी गावपातळीवरील जैववैविध्याची नोंद करून ठेवण्यासाठी पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर (पी.बी.आर.) आणि स्टुडंट्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर (एस.बी.आर.) या दोन अभिनव संकल्पना प्रचलित करून नामशेष होण्यापूर्वी किमान आपल्याकडे कोणते जैववैविध्य होते, त्याचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी व्यावहारिक प्रयत्न केले. वनविषयक धोरणांची निश्चिती, जैवविविधताविषयक २००२ सालचा कायदा, व्याघ्रकृती दल, केंद्रीय पर्यावरणाचा आराखडा, एन.सी.ई.आर.टी.चे शालेय शिक्षणात पर्यावरणविषयक धोरण, अशा विविध समित्यांवर गाडगीळांनी काम केले. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील शिरसी या छोट्या शहरात फील्ड स्टेशन उभारून, स्थानिक लोकांच्या मदतीने मौलिक आणि उपयुक्त संशोधन केले. कन्नड भाषिकांत डॉ. गाडगीळांना खूप मानाचे स्थान आहे.

देशातील सर्व विज्ञान अकादम्यांवर त्यांनी काम केलेले आहे. थर्ड वर्ल्ड अकॅडमीज ऑफ सायन्सेस, यूएस नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसवर त्यांनी काम केलेले आहे. पंतप्रधानांच्या विज्ञान सल्लागार समितीवरही त्यांनी काम केलेले आहे. अब्जावधी रुपयांच्या जागतिक पर्यावरण निधीचे विविध राष्ट्रांतील प्रकल्पांना कसे वाटप करावे याची शास्त्रीय बैठक आणि छाननी करण्यासाठीच्या समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या एकूण कार्यासाठी त्यांना १९८१ साली पद्मश्री’, तर २००५ साली पद्मभूषणपुरस्कार मिळाला. २००२ साली त्यांना हार्वर्ड विद्यापीठाचा शतकवीर माजी विद्यार्थी पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, ईश्वरचंद्र विद्यासागर गोल्ड प्लेक, वसुंधरा पुरस्कार, व्होल्व्हो पर्यावरण पुरस्कार, कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार असे सन्मान मिळालेले आहेत.

वेळोवेळी अतिथी प्राध्यापक म्हणून अनेक परदेशी विद्यापीठांना भेटी देणारे प्रा. गाडगीळ विज्ञान आणि पर्यावरणासारखे विषय साध्या आणि सोप्या भाषेत सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात वाकबगार आहेत. त्यांनी कन्नड, मराठी, इंग्रजी अशा विविध भाषांतून लेख लिहून जनजागृतीचे काम केले आहे. त्यांच्या पुस्तकांची भाषांतरे मराठी, कन्नड, हिंदी, गुजराती, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांतून झाली आहेत. दी हिंदूया प्रसिद्ध वर्तमानपत्रातून मुलांसाठी त्यांनी लिहिलेला स्तंभ वाचकप्रिय झाला होता. मराठी विज्ञान परिषदेच्या १९८३ सालच्या उदगीर येथे भरलेल्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आकाशवाणीवरून त्यांनी कन्नड आणि मराठीतून अनेक भाषणे आणि मुलाखती दिलेल्या आहेत. आकाशवाणीच्या पुरुषोत्तम मंगेश लाडया प्रतिष्ठित व्याख्यानमालेत त्यांनी २००९ साली, जैवविविधतेच्या जोपासनेवर भाषण दिले होते. आकाशवाणीच्या संग्रहासाठी त्यांनी इंग्रजी आणि मराठीतून प्रत्येकी साडेसहा तासांच्या मुलाखती दिलेल्या आहेत.

२००४ साली बंगळुरू येथून निवृत्त झाल्यावर ते पुण्यात येऊन स्थायिक झाले असून, आघारकर संशोधन संस्थेत त्यांचे संशोधनाचे काम चालू आहे.

शैलेश माळोदे

संदर्भ :
१. देशपांडे, अ.पां.; ‘विद्वजन’; मनोविकास प्रकाशन; २००५. २.दै. सकाळ; ८ जुलै २००२. ३.दै. महाराष्ट्र टाइम्स; १२ जुलै २००२.

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].