Skip to main content
x

गेंदासिंग, चीमा

       हाराष्ट्रातील फलोत्पादन क्रांतीचा पाया घालणारे गेंदासिंग चीमा यांचा जन्म पंजाब प्रांतातील सियालकोट जिल्ह्यातील साहिवाल या गावी सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सियालकोट येथेच झाले. त्यांनी पंजाब विद्यापीठातून १९१५मध्ये बी.एस्सी. व १९१७मध्ये एम.एस्सी. या कृषिशास्त्रातील पदव्या संपादन करून विलायतेतून डी.एस्सी.ची पदवी संपादन केली. सरळ भरती सेवेमार्फत (आय.सी.एस.) ते मुंबई प्रांताच्या कृषी सेवेत १९२१मध्ये रुजू झाले.

        स्वातंत्र्यपूर्व काळात नोकरीव्यवसायात वरिष्ठ पदांवर एकूणच भारतीयांचे प्रमाण कमी होते. अशा काळात चीमा यांच्या नोकरीची सुरुवात झाली. पहिल्याच धडाक्यात १९२१मध्ये त्यांची आय.सी.एस. प्रवर्गात ब्रिटिश सरकारने लंडनहून सेक्रेटरी ऑफ स्टेटस्मार्फत खास फतवा काढून उद्यानविद्या विभागप्रमुख म्हणून (हॉर्टिकल्चरिस्ट टू बॉम्बे स्टेट) नियुक्ती केली. ते या पदावर २१ जुलै १९२१पासून सलग २१ वर्षे कार्यरत होते. त्यांनी १९४२ ते ४६ या काळात कृषी महाविद्यालयाचे प्राचार्यपदही सांभाळले व निवृत्तीपूर्वी अल्पकाळ कृषि-संचालक पदही भूषवले. १९४८मध्ये त्यांनी ‘चेअरमन एक्सपर्ट कमिटी, केंद्र सरकार’ हे मानाचे पदही भूषवले होते. निवृत्तीनंतर परत पंजाबमध्ये न जाता ते पुण्यातच संगमवाडीत स्थायिक झाले. नोकरीच्या काळात येथील शेतकऱ्यांच्या जीवनाशी ते पूर्णपणे समरस झाले होते. कामावरील निष्ठा व त्यासाठी करावा लागणारा त्याग हे विशेष गुण त्यांच्याकडे होते. त्या वेळचे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य १९३२मध्ये एक वर्षासाठी युरोपला जाणार होते, म्हणून कृषि-संचालकांनी चीमा यांची प्राचार्यपदी नियुक्ती करण्याचे ठरवले होते, परंतु ‘या बढतीमुळे माझ्या डाळिंबावरील संशोधन कार्यावर प्रतिकूल परिणाम होईल’ म्हणून त्यांनी हे पद त्या वेळी नाकारले. हे एकच उदाहरण त्यांची कामावरील निष्ठा व त्यागी वृत्ती दाखवण्यास पुरेसे आहे.

         ‘उद्यानविद्यावेत्ता’ पद स्वीकारल्यानंतर त्यांनी उपलब्ध साधनसामग्री व भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून संशोधन आराखडा तयार केला. त्यांनी चांगल्या प्रतीची फळे व अधिक उत्पादन देणाऱ्या जातींच्या निर्मितीस प्राधान्य दिले. फळपिकांसाठी निसर्गात उपलब्ध असलेली विपुल जैविक विविधता (जेनेटिक व्हेरिएशन) व संकर पद्धतीने विशेषतः फळपिकात नवीन जाती निर्माण करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन त्यांनी निवड पद्धतीवर नवीन जाती निवडण्यासाठी भर दिला. त्यांनी सेवाकाळात फळपिकांच्या व भाजीपाल्याच्या अनेक बाबींवर संशोधन केले. नवीन जाती निर्माण करण्याचे त्यांचे कार्य खरोखर मैलाचा दगड ठरलेले आहे.

        डॉ.चीमा यांनी १९२१मध्ये प्रथमतः पेरूच्या जातीचे संशोधन हाती घेतले. भारतातील पेरू पिकवणाऱ्या विविध प्रदेशांतून सर्वेक्षणाद्वारे चांगल्या बागांमधून आणलेल्या निवडक फळांपासून तयार केलेल्या ६०० पेरू रोपांचा त्यांनी सतत १४ वर्षे अभ्यास करून लखनौ-४९ व ४६, सिंध-६३, ढोलका-७ आणि धारवाड-३४ या वाणांची प्राथमिक निवड केली. या वाणांच्या सखोल अभ्यासानंतर लखनौ-४९ (सरदार) ही अधिक उत्पादन देणारी (३० टन / हेक्टर) मोठी गोलाकार व भरपूर गोड गर आणि मऊ बिया असलेली जात १९३७मध्ये त्यांनी प्रसारित केली. आजही महाराष्ट्रातील पेरू लागवडीचे जवळजवळ १०० टक्के क्षेत्र या जातीखाली आहे. इतर प्रांतांतही ही जात मोठ्या प्रमाणावर लावली जाते.

        पेरूसोबतच त्यांनी सीताफळ व डाळिंब या पिकांवरील सुधारकार्य हाती घेतले. सीताफळातील बियांचे प्रमाण कमी करून फळाचा आकार व गराचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांनी अबोनो, चेरिमोया व सीताफळाचा संकर करून १९३४मध्ये मोठ्या आकाराची (६०० ते ९०० ग्रॅ.) फळे देणारी, भरपूर गर व कमी बिया असलेली अनोना हायब्रीड-२ ही संकरित जात निर्माण केली.

        डाळिंब सुधारकार्यातही त्यांनी निवड पद्धतीचाच आधार घेतला. त्यांनी पुण्याजवळील आळंदी गावातील डाळिंबाच्या बागेतून निवड पद्धतीने जी.बी.जी.-१ (गणेश) ही लालसर, मोठे व मऊ दाणे असलेली गोड चवीची जात १९३७मध्येच निर्माण केली. आजही महाराष्ट्र व इतर प्रांतांत हीच जात लावली जाते. महाराष्ट्रात द्राक्ष पिकात सुरुवातीस भोकरी ही जात व्यापारी तत्त्वावर लावली जात होती. पांढरी साहेबी जातीची फळे उत्तम प्रत असलेली होती, परंतु तिचे उत्पादन खूपच कमी होेते. कमी उत्पादकतेचे कारण गेंदासिंग चीमा व डॉ.जी.बी.देशमुख यांनी शोधले व पांढऱ्या साहेबी जातीत ‘सेल्फ इनकपॅटॅबिलिटी’ असल्यामुळे या जातीच्या फळधारणेसाठी दुसऱ्या जातीचे परागकण आवश्यक असतात असा शोध लागला. त्यामुळे या जातीची फळे म्हणजे नैसर्गिक संकरित फळेच असतात. याचा फायदा घेऊन डॉ.चीमा यांनी पांढऱ्या साहेबी जातीप्रमाणे चांगल्या प्रतीची फळे व अधिक उत्पादन देणारी जात शोधण्यासाठी पांढरी साहेबीच्या बियांपासून रोपे तयार करून ती अभ्यासली आणि त्यातून सिलेक्शन -७ (चीमासाहेबी) व सिलेक्शन ९४ हे वाण शोधले. यापैकी सिलेक्शन ७ हा वाण त्याच्या चांगल्या प्रतीच्या फळांसाठी व अधिक उत्पादनासाठी प्रसारित करण्यात आला. या जातीने उत्पादनाच्या बाबतीत जागतिक विक्रम नोंदवलेला आहे (९० टन/ हेक्टर). ‘थॉमसन सिडलेस’ ही बिनबियांची जात लागवडीखाली येण्यापूर्वी चिमासाहेबी हीच जात महाराष्ट्रात व्यापारी तत्त्वावर लावली जात होती.

        प्रि-कुलिंग व कोल्ड स्टोअरेज या प्रक्रियांचा पाया डॉ. चीमा यांच्या १९३२ ते १९४२च्या दरम्यान केलेल्या शीतगृह साठवणुकीसाठीच्या अभ्यासात आहे. डॉ.चीमा यांनी भारतात प्रथमच शीतगृहात निरनिराळ्या फळांच्या, भाजीपाल्याच्या साठवणुकीसाठी शीतगृहातील तापमान, आर्द्रतेचे प्रमाण, वेष्टन पद्धत याचे प्रमाणीकरण केले. या अभ्यासासाठी त्यांनी परदेशी तंत्रज्ञान व आर्थिक मदतीच्या साहाय्याने एक सुसज्ज शीतगृह उभारले होते. यापूर्वी १९२८ व १९३०मध्ये त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर हापूस आंबे इंग्लंडच्या पंचम जॉर्ज यांना शीतगृहातून यशस्वीरीत्या पाठवलेले होते. डॉॅ. चीमा यांनी फळाबरोबरच गुलाबाची फुलेही फ्रान्स, जर्मनी या ठिकाणी निर्यात केली होती. पुढे फळे, भाजीपाला व फुले निर्यात व्यवसायात महाराष्ट्र अग्रेसर झाला. या सर्व संशोधनात त्यांना ह.पु. परांजपे, डॉ. एस.आर. गांधी,  जी.बी. देशमुख व करमरकर यांचे सहकार्य मिळालेले होते.

        पर्यावरण विकास, वनशेती, कोरडवाहू फळबाग विकास या गोष्टींना डॉ.चीमा यांनी त्या काळी सक्रिय पाठिंबा दिला होता. नगर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याला त्यांनी रस्त्याच्या कडेला चिंच, आंबा ही झाडे लावण्यास सांगितले व त्याची रोपेही पुरवलेली होती. विधी महाविद्यालयाच्या टेकडीवर झाडी लावून ती हिरवीगार करण्यास घारपुरे यांना झाडे पुरवलीच व वृक्षारोपणातही त्यांनी आपल्या मुलांसह पुढाकार घेतला. अशा संशोधकाचा १९६९मध्ये मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना मानपत्र देण्यात आले. याच वेळी त्यांच्या सन्मानार्थ त्यांनी संशोधित केलेल्या ‘सिलेक्शन-७’ या द्राक्ष जातीचे, ‘जी. बी. जी.-१’ या डाळिंबाच्या जातीचे व ‘लखनौ-४९’ या पेरूच्या जातीचे अनुक्रमे ‘चिमासाहेबी’, ‘गणेश’ व ‘सरदार’ असे नामकरण करण्यात आले. हे थोर संशोधक पुण्यातच दिवंगत झाले.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

गेंदासिंग, चीमा