गजेंद्रगडकर, अरविंद रामचंद्र
अरविंद रामचंद्र गजेंद्रगडकर यांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सीता होते. वडील डॉक्टर होते, त्यामुळे गजेंद्रगडकर यांनीसुद्धा डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी बी.एस्सी., बी.टी., एम.ए. अशा उच्चतम पदव्या प्राप्त केल्या; परंतु त्यांचा आंतरिक ओढा प्रथमपासूनच संगीत कलेकडे होता. संगीत क्षेत्रात त्यांनी ‘संगीत अलंकार’ (मिरज), ‘संगीत प्रभाकर’ (अलाहाबाद) अशा महत्त्वाच्या पदव्या संपादन केल्या. शालेय जीवनात बँडपथकात असताना हाती आलेली बासरी पुढे आयुष्यभर त्यांची सर्वांत प्रमुख ओळख बनून सोबत राहिली.
गजेंद्रगडकर यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात पाचगणी येथे शालेय शिक्षक म्हणून केली. त्यानंतर ते धारवाड येथील आकाशवाणी केंद्रावर संगीत संयोजक व निर्माते या हुद्द्यावर रुजू झाले. पुढे पटना, पुणे व नागपूरच्या आकाशवाणी केंद्रावर त्यांनी बढतीच्या पदांवर क्रमाक्रमाने अधिभार सांभाळला. आकाशवाणी व दूरदर्शनचे ते ‘अ’ श्रेणी प्राप्त बासरीवादक, ‘बी हाय’ श्रेणीचे स्वरमंडळवादक आणि ‘बी’ श्रेणी प्राप्त संगीत संयोजक होते. भारतातील अनेक आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांवरून त्यांचे बासरी व स्वरमंडळवादन अनेकदा प्रसारित झाले आहे.
डी. अमेल यांच्या बासरीवादनाने भारावून गेलेल्या गजेंद्रगडकरांनी सुरुवातीला एकलव्याप्रमाणे उभ्या बासरीची साधना केली. पुढे काही काळ त्यांना बासरीवादनाचे पितामह पं. पन्नालाल घोष यांच्याकडे शिकण्याचा योग आला. मथुरेचे पं. मुरलीधर शास्त्री यांच्याकडे गजेंद्रगडकरांना बासरीवादनाची तालीम मिळाली. या सर्व गुरूंकडे शिकल्यानंतर गजेंद्रगडकरांनी गायकी अंगाशी अतिशय जवळीक असणारी स्वतंत्र शैली बासरीवादनात विकसित केली. स्वरमंडळ या वाद्याचे स्वतंत्र एकल वादन करणारे ते एकमेव कलावंत होते.
गजेंद्रगडकरांनी भारतातील अनेक प्रतिष्ठित मैफलींमधून आपली कला सादर केली आहे. जपान, मलेशिया, सिंगापूर इ. देशांमध्ये मैफली व दूरचित्रवाणी कार्यक्रमांतून त्यांनी भारतीय संगीताचे वेगळेपण तेथील श्रोत्यांंना ऐकवले. मैफलींसोबत शास्त्रीय संगीत प्रचारासाठी अनेक छोट्यामोठ्या गावागावांत त्यांनी ४०० पेक्षा अधिक कार्यशाळा घेतल्या. त्यांनी वृत्तपत्रात संगीत समीक्षक म्हणून अनेक वर्षे लेखन केले.
मराठी साहित्य क्षेत्रात गजेंद्रगडकरांच्या लेखणीने आपला स्वतंत्र ठसा उमटवला . अनेक मासिके, नियतकालिकांत त्यांच्या विनोदी कथा वाचकांस आनंद देऊन गेल्या. ‘मोरू परतुनी आला’ ही त्यांनी लिहिलेली विनोदी कादंबरीही लोकप्रिय ठरली. संगीतावरील आस्वादक लेखन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. ‘स्वरांची स्मरणयात्रा’, ‘अशी शूर माणसे’, ‘सूर सावल्या’ या पुस्तकांतून त्यांच्या या लेखनाचा प्रत्यय येतो. २००२ साली त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय दिवाळी अंकांमधील ‘सर्वोत्कृष्ट लेख’ हे पारितोषिक मिळाले. संगीत शिक्षणाविषयीची त्यांची पुस्तके आजही गावागावांतील विद्यार्थ्यांस मोठे मार्गदर्शन करीत आहेत.
गजेंद्रगडकरांना उत्कृष्ट संगीत कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ व बासरीवादनातील योगदानासाठी ‘सहारा समूहा’तर्फे ‘जीवनगौरव पुरस्कार’ कारकिर्दीच्या अखेरच्या काळात मिळाले. त्यांनी पुण्यात ‘वेणुवंदना’ ही संस्था स्थापन केली; त्या संस्थेमधून अनेक बासरीवादक शिष्य तयार झाले. पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’त त्यांनी मानद शिक्षक व परीक्षक म्हणून काम पाहिले.
त्यांच्या या प्रदीर्घ व्यावसायिक कारकिर्दीमध्ये पत्नी मीरा यांची अमोल कौटुंबिक साथ त्यांना लाभली. गजेंद्रगडकरांचे पुणे येथे निधन झाले.