Skip to main content
x

गोऱ्हे, दिवाकर शंकर

          शुवैद्यकशास्त्रातले शिक्षण हा पुढील आयुष्यात काही विशेष कर्तृत्व गाजवण्यासाठीचा मार्ग आहे हे न मानले जाण्याच्या काळात या क्षेत्रात शिरून जिद्दीने, बुद्धिचातुर्याने आणि सेवाभावी वृत्तीने पशुपालकांचे, विशेषतः दुग्ध व्यावसायिकांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यात डॉ. दिवाकर शंकर गोऱ्हे यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

          नाशिकमधील दाजी गोऱ्हे यांची वेदशाळा हे गोऱ्हे कुटुंबाचे मूळ स्थान. पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेऊनही ब्रिटिशांची नोकरी न पत्करता पणजोबा नारायण शिवराम गोऱ्हे बडोदा संस्थानचे न्यायाधीश झाले. उत्तरायुष्यात ते लोणावळा येथे स्थायिक झाले. दिवाकर गोऱ्हे यांचे वडील शंकर महेश्वर गोऱ्हे व मातोश्री हे लोणावळा येथेच राहत. संत वाङ्मयाचा व्यासंग असलेले शंकर महेश्वर गोऱ्हे लोणावळा हायस्कूलचे मुख्याध्यापक होते.

          पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे जन्मलेल्या दिवाकर गोऱ्हेंचे प्राथमिक व शालेय शिक्षण मुख्यतः धुळे जिल्ह्यातील नंदुरबार येथे झाले. इंटर सायन्सची परीक्षा पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून बी.एस्सी. (व्हेट.) ही पदवी १९५२मध्ये प्रावीण्यासह संपादन केली. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात व्याख्याता म्हणून १९५६ ते १९६२ या काळात कार्यरत असताना त्यांना फ्रेंच सरकारची सहा महिने कालावधीची संशोधन प्रशिक्षण शिष्यवृत्ती मिळाली. पॅरिस येथील जगप्रसिद्ध पाश्चर इन्स्टिट्यूट या संस्थेत श्‍वानदंश, सांसर्गिक गर्भपात, स्तनदाह, पायखुरी-तोंडखुरी या जनावरांच्या रोगावर चाललेल्या संशोधन कार्याचा गोऱ्हे यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. डॉ. गोर्‍हे यांच्या संशोधनाचा आवाका पाहून पाश्‍चर इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी त्यांची पॅरिस विद्यापीठात पीएच.डी.च्या संशोधन शिष्यवृत्तीसाठी शिफारस केली. ‘फ्रेंच नॅशनल अ‍ॅग्रो रीसर्च फाऊंडेशन’ या संस्थेने दिलेल्या शिष्यवृत्तीच्या आधारे डॉ.गोऱ्हे यांनी १९६५ ते १९६८ या काळात डॉ. अ‍ॅण्ड्रे ल्युऑफ या नोबेल पारितोषिक प्राप्त सूक्ष्मजीवशास्त्र संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पॅरिसच्या सोरेबोन विद्यापीठाची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी उच्च मानांकनासह प्राप्त केली. त्यांच्या संशोधनाचा उच्च दर्जा पाहता विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून डॉ.गोऱ्हेंचा खास सन्मान करण्यात आला. प्राण्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवली असता शरीरातील पेशी अधिक कार्यक्षम होतात व कर्करोगासारख्या अनिर्बंध पेशी वाढवणार्‍या रोगाला प्रतिबंध करता येतो, हा डॉ. गोर्‍हे यांच्या संशोधनाचा निष्कर्ष होता. फ्रान्समधील या वास्तव्यातच त्यांनी पायखुरी-तोंडखुरी प्रतिबंधक लस बनवण्याचे प्रशिक्षण, संशोधनासाठी लागणाऱ्या उंदीर-सशासारख्या प्रयोगशाळा, प्राण्यांचे उत्पादन आणि संवर्धन, उष्ण कटिबंधातील जनावरांना होणारे आजार, पेशी संशोधन व अतिसूक्ष्मदर्शक यंत्र तंत्रज्ञान याविषयी विशेष ज्ञान संपादन केले.

          गोऱ्हे यांनी १९५२मध्ये बी.एस्सी. (व्हेट.) पदवी प्राप्त केल्यानंतर पुढील चार वर्षे तत्कालीन मुंबई राज्यांतर्गत गुजरातमध्ये शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य केले. जनावरांसाठी दवाखाने व साथीच्या रोगांचा प्रतिबंध, याखेरीज पशुसंवर्धनाच्या व पशुउत्पादन वाढीच्या कोणत्याही योजना तत्कालीन ब्रिटिश सरकारने याअगोदर राबवल्या नव्हत्या. रोगविषयक संशोधन केंद्रे व लसीकरण केंद्रे अभावानेच होती. एकंदरीतच तालुका स्तरावर पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्याकडे आजारी गुरांवर उपचार करणारा, वळूंचे खच्चीकरण करणारा व साथीच्या रोगात जनावरांना लसी टोचणारा ‘ढोर डॉक्टर’ म्हणूनच पाहिले जाई. कोणताही सामाजिक मानसन्मान व प्रतिष्ठा पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या वाट्याला येत नव्हती. पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या स्नातकांची मानसिकताही यापेक्षा वेगळी नव्हती. कामाविषयी आत्मीयता वा वेगळे काही करून आपल्या सेवेची सामाजिक उपयुक्तता कशी वाढवावी याचा त्यांच्याकडे कोणताही विचार नव्हता. अशा काळात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून जीवनाला सुरुवात करणाऱ्या डॉ.गोऱ्हेना पशुवैद्यकशास्त्राला चांगले दिवस आपणच आणले पाहिजेत, या विचाराने झपाटले. त्यांनी  सुरुवातीला सुरत आणि नंतर भादरण या गावी प्रथम योग्य त्या औषधांची व उपकरणांची खरेदी करून दवाखाने सुधारले आणि गावातील जनावरांची, दुग्धोत्पादक गाई-म्हशींच्या गोठ्यांची पाहणी करून दूध उत्पादकांना पशुसंगोपनविषयक शास्त्रीय माहिती देणे सुरू केले. जनावरांत साथीच्या रोगांची लागण झाल्यास लसीकरणाऐवजी ‘देव-देवता’ करण्याकडे लोकांचा जो कल होता, तो बदलला. गावचे पोलीस पाटील व पुढारी यांच्या साहाय्याने लसीकरणाचे महत्त्व लोकांच्या मनी ठसवले. ही डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीला व कामाबद्दलच्या तळमळीला मिळालेली पावती होती.

          सन १९५६ ते १९६२ या काळात पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विकृतिशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र या विभागांत अध्यापनाचे कार्य करतानाच या दोन विभागांत चालणाऱ्या संशोधन कार्यात डॉ. गोर्‍हे यांचा सहभाग होता. याच काळात ‘स्वाइन फीव्हर’ या वराहवर्गीय व ‘साऊथ आफ्रिकन हॉर्स सिकनेस’ या अश्‍ववर्गीय विषाणूजन्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मुंबई शहर व महाराष्ट्रात प्रथम झाला. या साथीच्या रोगाचे अचूक निदान व या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसनिर्मिती या दोन आघाड्यांवर डॉ.गोऱ्हे यांचे कार्य असाधारण ठरले व मोठ्या संख्येने होऊ घातलेली डुकरे आणि घोडे यांची प्राणहानी टाळण्यात शासनाला यश आले. पशुरोगासंबंधी अधिक काही करण्याच्या ऊर्मीनेच डॉ. गोऱ्हे यांनी परळ येथील ‘हाफकिन इन्स्टिट्यूट’ या जीवाणू/विषाणूजन्य मानवी रोगावर संशोधन करणाऱ्या व लसी निर्माण करणाऱ्या संस्थेशी संबंध वाढवले आणि धनुर्वाताला प्रतिबंध करणाऱ्या सीरमचे व श्‍वानदंश (रेबीज) लसीचे उत्पादन करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ‘रेबीज हा प्राणघातक रोग कुत्र्यापासून माणसांना होतो, म्हणूनच वैद्यकीय आणि पशुवैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांनी एकत्र येऊन या रोगावर संशोधन करणे आवश्यक आहे,’ हा हाफकिनच्या विषाणू विभागाचे प्रमुख डॉ. नानावटी यांचा सल्ला शिरोधार्य मानला व त्यांच्याच सहकार्याने डॉ. गोऱ्हे यांनी पॅरिसस्थित जागतिक कीर्तीच्या ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश मिळवला आणि आपल्यातील संशोधकाला जागतिक स्तरावरील सूक्ष्मजंतूविषयक संशोधन करणाऱ्या संस्थेत पोहोचवले. १९६८मध्ये भारतात परतल्यावर डॉ.गोऱ्हे  यांनी चार वर्षे ‘सीबा रीसर्च सेंटर’ या माणसांसाठी औषधे निर्माण करणाऱ्या संस्थेत वरिष्ठ संशोधक म्हणून काम केले. ‘मानवी रोगावर नवी औषधे निर्माण करण्यासाठी संशोधन’ ही या काळात डॉ.गोऱ्हे यांची कामगिरी होती. सीबा रिसर्च सेंटर यांच्या स्वित्झर्लंडमधील प्रमुख संशोधकांसोबत काम करण्याची संधीही त्यांना प्राप्त झाली. डॉ.गोऱ्हे यांना परदेशी संस्थेपासून दूर करून पुन्हा पशुवैद्यकीय संशोधन आणि पशुविज्ञान क्षेत्राकडे वळवण्याचे श्रेय मणिभाई देसाई या द्रष्ट्या माणसाच्या अचूक निवडीकडे जाते. यामुळेच भारतीय पशुपालन क्षेत्राला, विशेषतः दुग्ध व्यवसाय क्षेत्राला डॉ.गोऱ्हे यांच्यासारख्या सर्जनशील संशोधकाचा आणि ध्येयवेड्या कर्तृत्वाचा पुनर्लाभ झाला.

          भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानचा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि दुग्ध व्यवसायाला नवीन दिशा देणाऱ्या संकरित गायींच्या या  प्रकल्पाचे आव्हान १९७२मध्ये डॉ.गोऱ्हे यांनी स्वीकारले. या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून सूत्रे हातात घेतली.

          संकरित दुभती जनावरे ही संकल्पनाच त्या काळी भारताला नवीन होती. परदेशी उच्च उत्पादक जातींच्या संकरातून निर्माण झालेली ही जनावरे अधिक दूध देत असली; तरी भारतीय उष्ण हवामानात त्यांचे आरोग्यरक्षण ही कठीण समस्या होती. या समस्यांची पूर्ण जाण डॉ.गोऱ्हे यांना होती. वेळच्या वेळी लसीकरण आणि आजार उद्भवल्यास ताबडतोब उपचार, यातच संकरित गायींची यशस्विता सामावलेली होती. भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या संकल्पनेप्रमाणे अशा गायी दूरवर, खेडोपाडी पसरलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या फारशा सबळ नसलेल्या ग्रामीण जनतेकडे जाणार होत्या. अशा गायींचे लसीकरण आणि औषधोपचार केवळ त्यांना परवडणाऱ्या दरातच पुरवणे जरुरीचे होते. म्हणूनच सुरुवातीला डॉ.गोऱ्हे यांनी प्रतिष्ठानमार्फत अद्ययावत प्रयोगशाळा उभारून लसनिर्मिती आणि औषधनिर्मिती सुरू केली. पायखुरी-तोंडखुरी हा रोग भारतीय जनावरांच्या पाचवीलाच पुजलेला होता. संकरित जनावरांचे मृत्यू घडवून आणण्याची या रोगाची क्षमता लक्षात घेऊन वाघोली लसनिर्माण प्रकल्पातून डॉ.गोऱ्हे यांनी प्रथम या रोगप्रतिबंधक लसींची निर्मिती सुरू केली. यापूर्वी ही लस केवळ बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपन्यांकडून महागड्या दरात उपलब्ध केली जात होती. फ्रान्समधील अनेक मातब्बर संशोधन संस्थांशी असलेल्या आपल्या व्यक्तिगत संबंधाच्या जोरावर डॉ.गोऱ्हे यांनी लसनिर्मितीसंबंधी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि प्रचंड आर्थिक मदत प्रतिष्ठानसाठी मिळविली. पायखुरी - तोंडखुरी प्रतिबंधक लस अल्पदरात आणि पुरेशा प्रमाणात भारतीय दुग्ध व्यावसायिकांना उपलब्ध झाली, हे डॉ.गोऱ्हे यांचे या व्यवसायासाठीचे प्रथम क्रमांकाचे योगदान ठरले.

          आपला अभ्यास व ज्ञानकक्षा वाढवण्यासंबंधी डॉ.गोऱ्हे नेहमीच सतर्क राहिले. भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानांतर्गत गोसंवर्धनाचे कार्य अंगीकारल्यानंतरही तद्नुषंगिक अनेक परदेश शिक्षण दौरे त्यांनी केले. त्यात कोपनहेगन (डेन्मार्क) येथील सिद्धवळू केंद्र व लाळ्या खुरकूत संशोधन केंद्र (१९७२), अ‍ॅमस्टरडॅम येथील दुभत्या गायींचे व्यवस्थापन, रोगप्रतिबंध व आहारपोषण यासंबंधी संशोधन संस्था (१९७५), उष्ण कटिबंधातील जनावरांवर रोग संशोधन करणारे ग्लासगो संशोधन केंद्र (१९७७), लीऑन, फ्रान्स येथील स्तनदाह संशोधन केंद्र व कालवडी अंडकोष संशोधन संस्था (१९८२), स्विस डेव्हलपमेंट एजन्सी व ब्रिटिश ओव्हरसीज डेव्हलपमेंट एजन्सी या संस्थांच्या मार्फत त्या त्या देशातील दुभत्या जनावरांविषयीचे संशोधनकेंद्र (१९८३-१९८६), दुभत्या जनावरांच्या खाद्यव्यवस्थापनात संगणकाचा वापर याविषयी डेन्मार्क येथे प्रशिक्षण, अतिशीत वीर्य उत्पादन व ते शेतकऱ्यांच्या गोठ्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रणालीचा अभ्यास (फ्रान्स), विक्रमी दुग्धोत्पादन करणार्‍या होलस्टीन गायींच्या अंडकोषांचा अभ्यास, अशा अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांचा समावेश होता. ‘भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठान’ची ध्येयधोरणे,  मणिभाई देसाई यांची ग्रामीण जनतेशी असलेली बांधिलकी आणि डॉ. गोऱ्हे यांची कार्यतत्परता आणि धडाडी पाहूनच महाराष्ट्र शासनाने लसनिर्माण व औषधनिर्माण प्रकल्पाला पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे २६० एकर जमीन उपलब्ध करून दिली, तर डेन्मार्कच्या डॅनिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सीने महागडी उपकरणे, यंत्रसामग्री व आवश्यक ते तांत्रिक प्रशिक्षण दिले. डॉ. गोर्‍हे यांचे असामान्य कार्य पाहून त्यांना ज्येष्ठ पशुविज्ञान प्रतिष्ठान महाराष्ट्र, पुणे या संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार (२०१०) देण्यात आला.

          - डॉ. रामनाथ सडेकर

 

गोऱ्हे, दिवाकर शंकर