Skip to main content
x

गोसावी, मोरेश्वर सदाशिव

       मोरेश्वर सदाशिव गोसावी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण गावी एका अत्यंत सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फलटणलाच झाले. अनन्यसाधारण बुद्धिमत्ता लाभलेल्या गोसावी यांनी शालेय जीवनापासून ते बी. कॉम., एम.कॉम., एल.एल.बी., साहित्याचार्य या सर्व परीक्षांमध्ये विद्यापीठात प्रथम वर्गात प्रथम क्रमांक मिळविण्याचा विक्रम केला आहे. ‘बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (व्यवसाय व्यवस्थापन)’ ह्या विषयात पीएच. डी. करणारे ते पुणे विद्यापीठातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत.

     पुण्याच्या बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामधून ते बी. कॉम. झाले. त्याच वर्षी म्हणजे १९५४ मध्ये ते ट्यूटर म्हणून त्याच महाविद्यालयात काम करू लागले. १९५६ मध्ये एम. कॉम. पदवी मिळवल्यावर ते प्राध्यापक झाले. १९५७ मध्ये सुरू झालेल्या ह्या महाविद्यालयाला सहा वर्षांतच पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली ह्याचे संपूर्ण श्रेय गोसावी यांचे आहे. १९५८ मध्ये त्यांची नाशिकच्या बी.वाय. के. वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी महाविद्यालयाचे प्राचार्य होणे हाही एक जागतिक विक्रमच आणि १९९५ मध्ये सेवानिवृत्त होईपर्यंत सदतीस वर्षे प्राचार्यपदाची धुरा समर्थपणे पेलणे हाही जागतिक विक्रमच होय.

     प्राचार्य झाल्यानंतर महाविद्यालयाची विविधांगी प्रगतीच्या दिशेने वेगात वाटचाल सुरू झाली. कॉलेजमध्ये व्यवसाय व्यवस्थापनाच्या पदव्युत्तर शिक्षणाचा निवासी अभ्यासक्रम सुरू झाला. शिक्षणात माहिती तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केला गेला. बी.बी.ए., बी.एफ.टी., बी.सी.ए. यासारखे व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू झाले. शिक्षण हे प्रात्यक्षिक कार्यावर आधारित असावे यासाठी अतिथी व्याख्यानांचे महत्त्व त्यांनी जाणले व उद्योगाशी अनुबंध प्रस्थापित केले. विद्यार्थ्यांना संशोधनाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षणाला एक गुणात्मक दर्जा प्राप्त करून दिला. पत्रकारिता क्षेत्रातही व्यापक बदल होणार आहेत हे गोसावी यांनी पंचवीस वर्षांपूर्वीच ओळखले आणि एच.पी.टी. महाविद्यालयामध्ये पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू केला. उत्तर महाराष्ट्रात पत्रकारितेचे शास्त्रशुद्ध शिक्षण उपलब्ध करून दिले.

     शिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा, व्यासंग, सर्जनशीलता, शुद्ध चारित्र्य निर्माण होण्यासाठी उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ते सातत्याने आजही प्रयत्नशील आहेत. शिक्षण मूल्याधिष्ठित, क्षमताधिष्ठित, जीवनाभिमुख, व्यवसायाभिमुख, परिणामकारक, संजीवक व्हावे हा ध्यास बाळगून तज्ज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, प्रकल्पकार्य, गटचर्चा, स्वयं अध्ययन, औद्योगिक संस्थांशी संबंध, व्यक्तिमत्त्व विकास-उद्योजकता विकास शिबिरे, संशोधन असे उपक्रम ते राबवत आहेत.

     शिक्षणातून महिलांचे सबलीकरण व्हावे म्हणून श्रीमती मंजुळाबाई रावजीला क्षत्रीय (एस.एम.आर. के.)  महिला विद्यालयाच्या रूपात स्वतंत्र महिला विद्यालयाची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणात सहभाग वाढावा यासाठी त्या भागात उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. डॉ. एम. एस. जी. सेंटर ऑफ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञान, उद्योजकता विकास, विदेशी भाषाज्ञान यांसारखे पूरक प्रमाणपत्र अभ्यासक्रम संस्थेत चालू आहेत. प्राचार्य म्हणून झालेल्या कारकिर्दीत व सेवानिवृत्तीनंतरही गोखले एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह म्हणून हे सर्व काम ते करीत आहेत. नव्या काळाची गरज लक्षात घेऊन विज्ञान, कला आणि अन्य विद्याशाखांकडेही त्यांचे लक्ष आहे. विद्यापीठाचे एकूण एकशे सव्वीस अभ्यासक्रम संस्थेत सुरू आहेत. शिक्षण प्रक्रिया चैतन्यमय व्हावी म्हणून ते शिक्षक प्रशिक्षणास मोठे महत्त्व देतात. शिक्षकांना शिक्षणाचे तत्त्वज्ञान, विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, शैक्षणिक नियोजन-प्रशासन, व्यवस्थापन, अध्यापन पद्धती व कौशल्ये यांचे अद्ययावत् ज्ञान असलेच पाहिजे यासाठी गोखले एज्युकेशन सोसायटी व डॉ. एम.एस. जी. फाउंडेशन फॉर आंत्रेप्रेनिअरशीप अ‍ॅण्ड मॅनेजमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य, व्याख्याते, मुख्याध्यापक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी ह्यांच्यासाठी केवळ तीन वर्षांत एकूण साठ शिबिरे सरांनी आयोजित केली.

     या संस्थात्मक कार्याबरोबरच पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सदस्य म्हणून कर्मचारी, अध्यापक व विद्यापीठाच्या शास्त्रशुद्ध कारभारासाठी त्यांनी बहुमोल कार्य केले आहे. पुणे विद्यापीठ आदर्श व्हावे म्हणून पुढाकार घेऊन त्यांनी अकौंटस् कोड तयार केले होते. त्यानुसारच विद्यापीठाचा कारभार चालू आहे. १९७० ते २००५ ह्या काळात वाणिज्य व व्यवस्थापन या विषयांसाठी पीएच. डी. चे ते मार्गदर्शक होते. वाणिज्य, व्यवस्थापन व तंत्रज्ञानाशी संबंधित ए.आय.सी.टी. ई., आय.सी.ए. आय.ए., एम.डी. अशा संस्थांचे सदस्य, इंडियन कॉमर्स असोसिएशन फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, इंटर युनिव्हर्सिटी कौन्सिल ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च यांचे ते अध्यक्ष होते. टोकियोमधील ऑल एशिया मॅनेजमेंट कॉन्फरन्समध्ये (मॅन अँड वर्क) हा शोधनिबंध त्यांनी सादर केला. १९९२ मधील आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘उच्च शिक्षण प्रशासन’ युनिव्हर्सिटी ऑफ ट्वेंट (नेदरलॅण्डस) या विद्यापीठात जे. डी. सी. बिटको आय.एम.एस. आर. या संस्थेची रचना व विकास हा शोधनिबंध उच्च शिक्षणाचा उद्योगक्षेत्राशी अनुबंध निर्माण करणारा म्हणून आदर्श शोधनिबंध ठरला.

     व्यवसाय शिक्षण व गुणवत्तापूर्ण प्रशासन ह्या विषयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ‘मॅनेजमेंट गॅप इन डेव्हलपिंग इकॉनॉमी’, ‘नाशिक डिस्ट्रिक्ट इकॉनॉमिक सर्व्हे,’ ‘अचिव्हींग एक्सलन्स’, ‘एज्युकेशन प्लस’ ही त्यांची पुस्तके त्यांच्या प्रगाढ व्यासंगाचा प्रत्यय देतात. शंभराहून अधिक पुस्तकांचे संपादन व प्रकाशन त्यांनी केले आहे. व्यवस्थापनविषयक जर्नल्स व नियतकालिकांतून सातत्याने त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात.

     गोखले एज्युकेशन सोसायटीचे नाव त्यांच्या गतिशील नेतृत्वामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. संस्थेची सोळा महाविद्यालये, वीस माध्यमिक विद्यालये, चोवीस पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, दहा कृषिशिक्षण केंद्रे, आश्रमशाळा व वसतिगृहे ह्यांतून एक लाख विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळत आहे.

     सन २००० मधील महाराष्ट्र राज्य आदिवासी पुरस्कार व आय.एस.ओ. - ९००१-२०० प्रमाणपत्र (२००३) मिळून सन्मान झाला आहे.

     या महत्त्वपूर्ण शैक्षणिक योगदानाबद्दल डॉ. गोसावी यांचा राजीव गांधी शांतता पुरस्कार, मास्टर टीचर मिलेनियम पुरस्कार, ‘सर’ ही पदवी, इंटरनॅशनल बायोग्राफिकल असोसिएशन केंब्रिजची फेलोशिप अशा अनेक पुरस्कारांनी गौरव झालेला आहे.

- प्रा. सुहासिनी पटेल

गोसावी, मोरेश्वर सदाशिव