Skip to main content
x

घाटगे, अमृत माधव

       डॉ. अमृत माधव घाटगे यांचा जन्म १९१३ साली कोल्हापूर येथे झाला. त्यांचे शिक्षण कोल्हापूर, मुंबई आणि अमेरिकेतील पेनसिल्वानिया येथे झाले. डॉ. घाटगे हे भारतीय व युरोपीय भाषांचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

डॉ. घाटगे यांचा भाषाशास्त्राचा आणि साहित्याचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी पाली, प्राकृत, संस्कृत आणि भाषाशास्त्र या विषयांचे, पुण्याचे डेक्कन महाविद्यालय व सर परशुराम महाविद्यालय, कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालय, धारवाड येथील कर्नाटक महाविद्यालय आणि नागपूर महाविद्यालय या ठिकाणी अध्यापन केले. मुंबईतील विल्सन महाविद्यालयामधील ख्यातनाम संस्कृत तज्ज्ञ प्रा. एच. डी. वेलणकर यांचे डॉ. घाटगे हे विद्यार्थी होते. भाषाशास्त्र विषयक विल्सन व्याख्यानमालेमध्ये त्यांनी ‘इतिहासकालीन भाषाशास्त्र व भारतीय आर्यांच्या भाषा’ या विषयांवर जी व्याख्याने दिली, त्यामुळे त्यांचे सर्वत्र नाव झाले.

डॉ. घाटगे १९६८ मध्ये पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे सहाय्यक संचालक आणि सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्टडीज इन लिंग्विस्टिक्सचे संचालक झाले. डेक्कन महाविद्यालयाने १९७३मध्ये हाती घेतलेल्या संस्कृत शब्दकोशाचे प्रमुख संपादक पद त्यांनी स्वीकारले.

१९८५मध्ये भरलेल्या ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्सचे ते अध्यक्ष होते. तसेच १९९० मध्ये बंगळुरू येथे भरलेल्या भारतातील पहिल्या प्राकृत संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. घाटगे यांनी भूषवले होते. डॉ. घाटगे १९३५ पासून पुण्यातील ‘भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट’चे आजीव सभासद आहेत. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल १९९३मध्ये त्यांना ‘प्राकृत ज्ञानभारती’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डॉ. घाटगे यांची महत्त्वाची प्रकाशने :Introduction to Ardha-Maghadi (१९४१) - अर्धमागधीची तोंडओळख (१९४१), Konkani of South Kanara (१९६३) - दक्षिण कानडामधील कोंकणी भाषा (१९६३), Kochin Dialect (१९६७) , कोचीन बोलीभाषा (१९६७), Marathi of Kasargode (१९६९), कासारगोडमधील मराठी भाषा (१९६९),Marathi Dialect Text-1  (१९७१) मराठी बोली-(१९७१).

- र.वि. नातू

घाटगे, अमृत माधव