Skip to main content
x

अब्दुल, करीम खाँ

गायक

      अब्दुल करीम खाँ यांचा जन्म कुरुक्षेत्र पानिपतजवळील सहारनपूर जिल्ह्यातील किराना या गावी झाला. अब्दुल करीम खाँ यांना जन्मत:च संगीताची आवड व उत्तम आवाजाची देणगी होती. त्यांना तसेच त्यांचे कनिष्ठ बंधू अब्दुल लतीफ व अब्दुल हक यांनाही त्यांचे सख्खे चुलते अब्दुल्ला खाँ व चुलत—चुलते नन्हे खाँ यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने तालीम मिळाली. अब्दुल करीम खाँसाहेबांनी खडतर साधना करून वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासूनच होतकरू गवय्यांच्या मैफली  गाजविल्या. त्यांचा अति मधुर आवाज व एकूणच सर्वसामान्य श्रोत्यांनीही आकृष्ट व्हावे अशी वैशिष्ट्यपूर्ण गायकी या सर्व कलागुणांमुळे ऐन तारुण्यातच त्यांचा मोठा नावलौकिक झाला.

       खाँसाहेबांचा विवाह १८९० च्या रमजान ईदनंतर झाला. खाँसाहेब व त्यांच्या दोन बंधूंची कीर्ती बडोद्याच्या महाराजांच्या कानी गेली व महाराजांनी बडोदा दरबारी अब्दुल करीम खाँसाहेब व त्यांचे बंधू अब्दुल हक यांची राजगायक म्हणून नेमणूक केली. ही घटना त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची व त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीला नवी दिशा देणारी ठरली.

       बडोदे दरबारी अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने सुमारे दोन-अडीच वर्षे चाकरी केल्यानंतर त्यांनी दरबारातील सरदार माने यांची मुलगी ताराबाई हिच्याशी विवाह करण्याचे ठरविले. त्यांच्या या नवीन विवाहसंबंधास समाजमान्यता मिळणार नाही हे उघडच होते. या अडचणीतून मार्ग काढण्याच्या उद्देशाने त्यांनी ताराबाईंसह प्रथम मुंबई येथे व नंतर मिरज येथे प्रयाण केले. नंतर ते विवाह करून तेथेच स्थायिक झाले.

       मिरज मुक्कामी एका परिचितांच्या घरी उतरल्यानंतर त्यांना प्लेगची लागण झाली. अचानक भेटलेल्या एका फकिराने त्यांना मिरज शहरातच असलेल्या ख्वाजा शमना मिरादसाहेबांच्या दर्ग्यात जाऊन मनोभावे  गानसेवा अर्पण करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार खाँसाहेबांनी त्या दर्ग्यात अखंड गानसेवा अर्पण केली. खाँसाहेबांच्या काखेतील प्लेगची गाठ बरी होऊन त्यांच्या प्रकृतीला पूर्ण आराम पडला. मूलत:च भाविक वृत्तीच्या खाँसाहेबांनी याच दर्ग्याच्या सेवेतच स्वत:स वाहून घेतले. मिरज मुक्कामी त्यांचा रियाज व नावलौकिक चढत्या श्रेणीने वाढत होता. त्या काळी प्रचलित असलेल्या गुरुकुल पद्धतीनुसार त्यांच्या घरी अनेक विद्यार्थी येऊन संगीताची आराधना करू लागले.

       अब्दुल करीम खाँसाहेबांनी कर्नाटक संगीत पद्धतीचाही सखोल अभ्यास केला होता व त्या संगीत पद्धतीतील सौंदर्यशास्त्राचा आविष्कारही त्यांनी  आपल्या गायनात खुबीने व बेमालूमपणे केला.

        याव्यतिरिक्त ग्वाल्हेर घराण्याचे गायक भूगंधर्व रहिमत खाँसाहेब यांच्याकडूनही त्यांनी मार्गदर्शन घेतले. अब्दुल करीम खाँचा आवाज सुरेल असून तंबोर्‍याच्या आवाजात तो एकजीव होत असे. त्यांचे गाणे आलापप्रधान होते. स्वरप्रधान, आलापचारीची गायकी महाराष्ट्रात रूढ करण्याचे श्रेय त्यांनाच जाते. त्यांच्या आलापाच्या दोन स्वरांतील आस कधीच तुटत नसे. त्यांची तान जोरदार व गमकयुक्त असे. प्रत्येक हरकत रेखीव असे.

       खाँसाहेब भावनायुक्त गाणे अधिक पसंत करीत. बोल अंगात चिजेचे शब्द वेडेवाकडे होतात, त्यामुळे शब्दातील भावना नष्ट होऊन सौंदर्यहानी होते असे त्यांचे मत होते. रागदारीप्रमाणेच अब्दुल करीम खाँसाहेब ठुमर्‍याही सुंदर गायचे. ‘जमुना के तीर’ व ‘पियाबिन नाही आवत चैन’ या त्यांच्या गाजलेल्या ध्वनिमुद्रिका होत. ‘गोपाला मेरी करुणा क्यों नहीं आवे’ हे भजन ऐकून श्रोतृवृंदाच्या डोळ्यांच्या कडा ओलावत. जाणकार श्रोत्यांपासून ते अडाणी श्रोत्यांच्या आवडीनुसार ते गाण्यात विविधता आणत असत. ‘दे हाता या शरणागता’, ‘उगीच का कांता’, ‘प्रेमभावे’ ही नाट्यगीतेही त्यांनी गायली. खाँसाहेबांनी अमाप लोकप्रियता कमविली होती. त्यांच्या अनेक ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत व त्या सर्व रसिकप्रिय आहेत. खाँसाहेबांनी मोठी शिष्य परंपरा निर्माण केली.  अब्दुल वहीद खाँ, सुरेशबाबू माने, रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व, दशरथबुवा मुळे, बेहरेबुवा, कपिलेश्वरीबुवा, जावकर, सरनाईक, रोशनआरा बेगम इ. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये गणले जातात.

       अब्दुल वहीद खाँ यांनी हिराबाई बडोदेकर यांना आपली परंपरागत घरंदाज गायकी शिकवून उत्तम कलाकार बनविले, तर सवाई गंधर्वांनी गंगूबाई हनगल, पं. फिरोज दस्तूर व पं. भीमसेन जोशी इत्यादींना विद्यादान करून आपल्या पारंपरिक गायकीची ध्वजा फडकत ठेवली.

      अब्दुल करीम खाँसाहेब खयाल, ठुमरी, मराठी नाट्यपदे, तसेच संतांचे अभंगही आपल्या कार्यक्रमांतून सादर करीत असत. त्यांनी गायत्री व इतर काही मंत्र तालबद्ध व रागबद्ध पद्धतीने लोकमान्य टिळकांना गाऊन दाखविले असता ते अत्यंत संतुष्ट झाले व त्यांनी खूप स्तुती केली. खाँसाहेब हे स्वभावत:च निरलस वृत्तीने वागणारे होते.

      देवल व क्लेमेंट्स या शास्त्रकारांच्या ‘श्रुती’विषयक संशोधनासाठी खांसाहेबांनी मौलिक सहकार्य केले होते. पं. वि.ना. भातखंडे व थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रामन यांना भारतीय संगीतांतर्गत सर्व बावीस श्रुती खाँसाहेबांनी लागोपाठ गाऊन दाखविल्या. हे अद्भुत कार्य यापूर्वीच्या काळात कोणाही गायक कलाकाराने केल्याचे ऐकिवात नाही.

       अब्दुल करीम खाँ स्वत: मुस्लिमधर्मीय असले तरी त्यांच्या घरी गुरुकुल पद्धतीनुसार राहून विद्यार्जन करणारे विद्यार्थी मात्र हिंदूच होते. त्या सर्वांच्या निवासाचा खर्चही खाँसाहेब स्वखुषीने करीत असत.

       आधुनिकता व बदलत्या काळाबरोबर चालण्याची खाँसाहेबांची तयारी होती. त्या काळात करीम खाँसाहेबांनी ‘आर्य संगीत विद्यालय’ काढले. त्यांनी मुंबई येथे ‘सरस्वती संगीत विद्यालया’ची स्थापनाही त्यानंतरच्या काळात केली होती. त्यांनी निर्माण केलेल्या स्वरलिपीतील ‘संगीत स्वरप्रकाश’ हा ग्रंथ १९११ साली प्रकाशित झाला.

      ऑक्टोबर १९३७ मध्ये पाँडिचेरीहून योगी अरविंद यांचे करीम खाँसाहेबांना आमंत्रण आले. खाँसाहेबांनाही त्यांच्या दर्शनाची उत्कट इच्छा होती. परंतु पाँडिचेरीच्या वाटेवरील रेल्वे प्रवासात सिंगर पेरुमल कॉइल ऊर्फ कोकिला स्टेशनवर त्यांचे अचानक प्राणोत्क्रमण झाले.

        खाँसाहेब हे खरोखरच एक असामान्य कोटीतील अद्भुत प्रतिभेचे कलाकार होते. आपल्या गायकीने हजारो श्रोत्यांना संगीताचा आनंद लुटावयास देणारे आणि संगीताच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी आधुनिक वृत्तीने झटणारे अशा दोन्ही नात्यांनी अब्दुल करीम खाँसाहेबांची स्मृती महाराष्ट्र जतन करीत आहे. मिरज येथे त्यांच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी संगीत समारोह संपन्न होतो.

अच्युत अभ्यंकर

अब्दुल, करीम खाँ