अग्नी, गोविंद दामोदर
गोविंद दामोदर अग्नी यांचा जन्म गोव्यातील काणकोण या गावात, गौडसारस्वत कुटुंबात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत कीर्तनकार असल्याने लहानपणापासूनच त्यांच्यावर गायनाचे संस्कार झाले.
ते वडिलांना कीर्तनात तबल्याची साथ करीत असल्यामुळे तबला वादनातही निपुण झाले. गोविंद दामोदर अग्नी यांचे शालेय शिक्षण मराठी तिसर्या इयत्तेपर्यंतच झाले.
रघुवीर सावकारांची ‘रंगबोधेच्छू नाट्य समाज’ ही कंपनी १९३० साली मडगावला आली. या संस्थेचा ‘संशयकल्लोळ’ या नाटकाचा प्रयोग पाहून गोविंदरावांना नाटकात काम करण्याची व गायनाची इच्छा झाली. रघुवीर सावकारांचे भाऊ वसंतराव सावकार यांच्यामार्फत त्यांनी या संस्थेत प्रवेश मिळवला. संशयकल्लोळमधील साधूच्या भूमिकेद्वारे त्यांचे रंगभूमीवर पदार्पण झाले. पुढे याच नाटकात आश्विनशेटची भूमिका, तसेच जलशात गायनही केले. त्यांनी नाटकात पुरुष आणि स्त्री या दोन्ही भूमिका केल्या. त्यांनी हिंदी आणि उर्दू रंगभूमीवरही लहानमोठ्या भूमिका केल्या.
गोविंदराव १९३८ च्या दरम्यान अब्दुल करीम खाँ साहेबांच्या ध्वनिमुद्रिकांनी प्रभावित होऊन वसंतराव सावकारांबरोबर मुंबईत आले आणि गोपीनाथ सावकारांच्या ‘नाट्यविहार’ या संस्थेत दाखल झाले. याच दरम्यान आग्रा घराण्याचे उ. खादिम हुसेन खाँ साहेबांचे ते गंडाबंध शागीर्द झाले. त्यांनी तब्बल २८ वर्षे आग्रा घराण्याची तालीम घेतली, तसेच त्यांना अन्वर हुसेन खाँ साहेबांचेही मार्गदर्शन लाभले. या कालावधीत गोविंदरावांचे ग्वाल्हेर, भोपाळ, अमृतसर, बनारस आदी ठिकाणी जलसे झाले. ते १९४५ च्या आसपास आजारी पडले. त्यामुळे त्यांच्या आवाजावर थोडा परिणाम झाला.
आपल्याला आग्रा घराण्याची तालीम मिळाली असली तरी फैय्याज खाँ, बडे गुलाम अलीखाँ, केसरबाई केरकर यांच्याही गायकीचे आपल्यावर नकळत संस्कार झाल्याचे ते सांगत. त्यामुळे त्यांची एक स्वत:ची अशी शैली निर्माण झाली. आवाजाचा ठोस लगाव, उपज अंगाने केलेली बोल अंगाची लयकारी, मींड, घसीट यांचा उपयोग ही त्यांच्या गायकीची खास वैशिष्ट्ये म्हणता येतील. गोविंदरावांच्या गाण्यात लालित्य होते. आग्रा घराण्याचे असूनही ते नोम्-तोम् करत नसत. ते प्रचलित तसेच अप्रचलित राग सहज गात.
गोविंदराव अग्नींनी अनेक नाटकांना संगीत दिले. त्यांनी १९४६ मध्ये गोवा हिंदू असोसिएशनच्या इमारत फंडासाठी केलेल्या ‘उद्याचा संसार’ या नाटकाचे संगीत दिग्दर्शन केले होते. याबरोबरच गोविंदरावांनी, ‘अरे बाबा जाहिरात’, मामा वरेरकर लिखित ‘धरणीधर’, पु.भा. भावे लिखित ‘विषकन्या’, बाळ कोल्हटकरांचे ‘भक्त ध्रुव’ (१९४९), विद्याधर गोखलेंचे ‘चमकला धु्रवाचा तारा’ (१९६०) इत्यादी नाटकांचे संगीत दिग्दर्शन केले होते. ‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ (गायक : विश्वनाथ बागुल), ‘उधळीत प्रलयाचा अंगार’ (गायिका : लता शिलेदार) ही गाणी विशेष गाजली आणि या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिकाही निघाल्या.
ते १९७०-७२ पासून मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात कार्यरत होते. त्यांनी जवळजवळ २५ वर्षे विद्यादान केले. त्यांच्या प्रमुख शिष्यवर्गात अंजनीबाई लोलयेकर, निर्मला गोगटे, अलकनंदा वाडेकर, अरविंद पिळगावकर, आशा खाडिलकर यांची नावे घेता येतील. याशिवाय अनेक नाट्यसंगीत गायकांना व विद्यापीठातील विद्यार्थी वर्गाला त्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.
त्यांना १९८० साली संगीत नाटक शताब्दीनिमित्त २५ वर्षांहून अधिक काळ रंगभूमीची सेवा केल्याबद्दल मानपत्र देण्यात आले, तसेच १९८१ मध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांचा गौरवही करण्यात आला. त्यांना १९८७ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे गायनाचार्य रामकृष्णबुवा वझे पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात ७ जुलै १९९० रोजी त्यांच्या शिष्यवर्गाने व चाहत्यांनी त्यांचा भव्य सत्कार सोहळा केला. त्यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी विरार येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.