अवचट, अनिल त्र्यंबक
डॉ. अनिल अवचट यांचा जन्म पुणे येथे रोजी झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि ओतूर (जिल्हा-पुणे) येथे वास्तव्य करीत असल्याने अवचटांचे आठवीपर्यंतचे शिक्षण ओतूरलाच झाले. पहिला मुलगा असल्याने त्याने डॉक्टर व्हावे ही वडिलांची तीव्र इच्छा होती. ओतूरसारख्या गावात राहून हे जमणे कठीण म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये (वसतिगृहामध्ये) शिक्षणासाठी ठेवले. नंतर १९५९मध्ये मॅट्रिक झाल्यावर फर्गसन महाविद्यालयातून ते इंटर झाले. पुढे बी.जे.मेडिकल महाविद्यालय (पुणे) येथून एम.बी.बी.एस. झाले. याच महाविद्यालयामधील त्यांची मैत्रीण सुनंदा ही लग्नानंतर डॉ. अनिता अनिल अवचट झाली. मुक्ता आणि यशोदा या त्यांच्या दोन मुली होत. सध्या डॉक्टरांचे वास्तव्य पुणे येथे आहे. ‘मुक्तांगण’चे कार्य आणि लेखन हेच त्यांचे खरे कार्य आहे, कारण डॉक्टर होऊनही डॉक्टरी न केलेला हा लेखक होय.
समाजकार्यातून लेखन-
समाजकार्याकडे कल असल्याने वैद्यकीय व्यवसाय न करता, सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रातील अनुभवांशी निगडित अशा प्रकारचे लेखन ‘साधना’ साप्ताहिकातील ‘वेध’ या सदरातून ते सातत्याने लिहीत राहिले. एवढेच नाही तर ‘साधना’ व ‘पुरोगामी सत्यशोधक’ या त्रैमासिकांचे संपादनही काही वर्षे त्यांनी केले. आत्तापर्यंत अशा प्रकारची त्यांची अठरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
युक्रांदला अर्पण केलेले ‘पूर्णिया’ हे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९६९मध्ये प्रकाशित झाले. एका समाजवादी निष्ठेच्या तरुणाची प्रतिकारशून्य गुलामगिरीविषयीची प्रतिक्रिया यात व्यक्त झाली आहे.
‘वेध’ (१९७४), ‘हमीद’ (१९७७), ‘अंधेरनगरी निपाणी’ (१९७८), ‘छेद’ (१९७९), ‘माणसं’ (१९८०), ‘संभ्रम’ (१९८१), ‘वाघ्यामुरळी’ १९८३), ‘कोंडमारा’ (१९८५), ‘गर्द’ (१९८५), ‘धार्मिक’ (१९८९), ‘कार्यरत’ (१९९७) अशी सारी पुस्तके त्या-त्या संदर्भातील प्रत्यक्ष पाहणीवर आधारलेली वृत्तान्तवजा, तीव्र सामाजिक भानातून लिहिलेली आहेत.
याव्यतिरिक्त ‘सृष्टीत गोष्टीत’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. एवढेच नाही तर या पुस्तकाला २००८ चा राज्य पुरस्कार (साने गुरुजी) मिळाला आहे. ‘मजेदार ओरिगामी’ आणि ‘पुणे हवेसे’ ही त्यांची पुस्तके आहेत.
‘वेध’मध्ये सदर लेखनातील ३६ लेख एकत्रित केले आहेत, तर ‘छंद’मधील लेख वृत्तान्तकथन स्वरूपाचे आहेत. ‘मोर’मध्ये ललितलेखच आहेत. या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथालयाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘स्वत:विषयी’ (१९९०), ‘आप्त’ (१९९७), ‘छंदाविषयी’ (२०००) यांसारखी पुस्तके ही स्वत:च्या आयुष्यातील घटनांशी निगडित, आत्मपर अशी आहेत.
‘पूर्णिमा’, ‘वेध’ आणि ‘छेद’ या सुरुवातीच्या पुस्तकांतील अवचटांच्या लेखनाचे सर्वप्रथम जाणवणारे वैशिष्ट्य म्हणजे त्यामधून तीव्रपणे प्रकट होणारी तरुण मनाची संवेदनशीलता होय.
अवचटांची लेखन वैशिष्ट्ये-
भोवतालच्या घटनांकडे आणि वृत्ती-प्रवृत्तींकडे बघण्याची चौकस शोधक नजर, उत्कट सामाजिक जाणीव, पांढरपेशा आणि बुद्धीजीवी वर्गाच्या दांभिकपणाविषयीची चीड, ह्या गोष्टी त्यांच्या लेखनातून वेळोवेळी व्यक्त होताना दिसतात. या सर्वांमागे समाज परिवर्तनाची आस जाणवते, आणि तरीही हे सारे नेमकेपणाने व्यक्त झालेले दिसते. समाजातील दुबळ्या व उपेक्षित आणि दारिद्य्रात रूढींच्या कचाट्यात व समाजाच्या ओझ्याखाली वाकून जगणार्या सामान्य माणसांचे त्यांच्या अगतिक आयुष्याचे वेगळ्या अशा स्तरांवरचे जीवन जगणार्यांची ओळख करून देणारे लेखन अवचट सातत्याने करताना दिसतात. दुष्काळग्रस्त माणसे, झोपडपट्टीतील माणसे, भटक्या जमातीची माणसे, तसेच विडी कामगारांचे अंधारमय शोषित जीवन या सार्यांचे विलक्षण दाहक दर्शन त्यांनी ‘माणसं’ मधून घडवले आहे.
अवचटांच्या जीवननिष्ठा आणि त्यांचा दृष्टिकोन गंभीर बांधिलकी हे मूल्य मानणारा आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एक सखोल, संवेदनशील दृष्टीकोन व्यक्त होतो. ‘धागे आडवे-उभे’ ह्या पुस्तकांत पुण्यामुंबईच्या वेश्यावस्त्या, थिएटर कामगार, तमाशा कलावंत, सांगली हळद कामगार ह्यांचे जीवन यथार्थपणे दर्शवले आहे.
विषय गंभीर असले, तरी लालित्यपूर्ण मांडणीमुळे ते वाचकप्रिय झाले आहेत. सूक्ष्म निरीक्षणे नोंदवीत, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे अवचटांचे लेखन प्रथम पुरुषी आत्मनिवेदनात्मक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे.
एकूणच महाराष्ट्रीय समाजाच्या उपेक्षित स्तरातील जीवनाचा वेध घेणारे असे हे सामाजिक स्तरावरचे लेखन आणि दुसरीकडे स्वत:विषयीचे आत्मपर लेखन अशा दोन स्तरांवर अवचट लेखन करताना दिसतात.
कलाकार व्यक्तिमत्त्व-
अनिल अवचट हे एक अजब व्यक्तिमत्त्व आहे. ते डॉक्टर आहेत, लेखक आहेत, चित्रकार आहेत. ओरिगामी आणि लाकडातील शिल्प करण्याची त्यांना हौस आहे. छायाचित्रणाचा छंद आहे. बासरीचा नाद आहे आणि वाचनाचे, भ्रमंतीचे वेड आहे. हे कमी की काय तर ते स्वयंपाकघरातही प्रयोगशील आहेत. पदार्थ बनविण्यासाठी लहान-सहान सूचना देण्यातही निपुण आहेत.
प्रत्येकाला निसर्गाने कलागुण दिलेले असतात. त्यांच्याकडे बघणे, ते वाढवणे, त्याला अग्रक्रम देणे हे आपल्या हातात आहे. त्याचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी, त्याच्यातून पैसा मिळविण्यापासून किंवा कीर्तीच्या विचारापासून दूर राहिले, तर बरेच या वृत्तीने आपण शिकत, प्रयत्न करीत राहिलो तर कोण-कोण गुरू भेटत राहतात आणि कसलीही अपेक्षा न ठेवता महत्त्वाचे असे काही देऊनही जातात. आपणही पुढच्यांना त्याच भावनेने देत राहायचे. या वृत्तीतून निखळ कलानंदातून ते सारे छंद जोपासतात आणि हे सारे अनुभवाचे संचित लेखनातून आपल्यापर्यंत पोचवतात. या सार्याची दखल वेळोवेळी घेतली जातेच. त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत.
‘माणसं’, ‘वेध’, ‘पूर्णिमा’ या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार,‘कार्यरत’ला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, कर्हाडचा रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शं.वा. किर्लोस्कर पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले. या व्यतिरिक्त १९८८ मध्येे आयोवा विद्यापीठातर्फे (USA) भरलेल्या आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेसाठी भारतातर्फे त्यांची निवड झाली होती. २०११ साली महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणारी अवचट यांची संस्था ‘मुक्तांगण’. मुक्तांगणच्या सामाजिक कार्यासाठीही अवचट यांना २०१३ साली भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार लाभला आहे.
समाज व संस्कृती यांवर भाष्य करणारा लेखक अशीच अनिल अवचट यांची प्रतिमा आहे.
- प्रा. मंगला गोखले
- आर्या जोशी
२. अवचट अनिल त्र्यंबक; ‘आप्त’; मौज प्रकाशन गृह, मुंबई; १९९७.
३. अवचट अनिल त्र्यंबक; ‘छंदाविषयी’, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई; २००१.