Skip to main content
x

बाम, भीष्मराज पुरुषोत्तम

        भीष्मराज पुरुषोत्तम बाम यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून गणित विषय घेऊन प्रथम क्रमांकासह पदवी प्राप्त केली. ‘खेळ’ हा लहानपणापासून त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. हैद्राबादेतील ‘हनुमान व्यायाम मंडळा’त बालपणापासून जाऊन व्यायाम, पोहणे, जिम्नॅस्टिक्स व बॉक्सिंग या खेळांमध्ये शालेय-महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय स्तरावरचे यश व पुढे पोलीस पदाधिकारी असतानाही नेमबाजी, बिलियर्डस्, स्नूकर यांत मिळवलेले कौशल्य यांतून बाम यांचे अस्सल क्रीडाप्रेम दिसून येते. त्यांनी महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धाही गाजवल्या.

        १९६३-१९६४ मध्ये त्यांनी पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला यवतमाळ, वर्धा व बामगाव येथे त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून काम केले. मुंबई रेल्वे विभागातही त्यांनी पुन्हा यवतमाळसह नाशिक येथे काम केले. मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून चांगली कामगिरी केली. १९८२मध्ये भारतीय गुप्तहेर खात्यात निवड झाल्यानंतर त्यांनी ‘परदेशी गुप्तहेरांच्या कारवायांवर नियंत्रण’ या विषयावर प्रभुत्व मिळवले. परिणामी दिल्ली येथे त्यांची उपनिरीक्षक म्हणून महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली. पुढे परदेशी गुप्तहेरांच्या कारवाया रोखण्यासाठी त्यांना मुंबई येथे खास पदी नेमण्यात आले. मध्य प्रदेशात बढतीसह पोलीस महासंचालक पद (१९९०) आणि नंतर गुप्तवार्ता विभागात महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यात सहसंचालक पद या पदांची जबाबदारी त्यांनी निवृत्तीपर्यंत उत्तमरीत्या सांभाळली. १९९६ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी पोलीस खात्याचे ‘दक्षता’ मासिक संपादक या नात्याने उत्तम रीतीने चालवले. त्यांच्या लेखनामुळे, संपादनामुळे दक्षताच्या लोकप्रियतेत भर पडली. १९८२ च्या दक्षता दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यावरील त्यांच्या प्रदीर्घ लेखामुळे त्या अंकाचा विक्रमी खप झाला. दिवाळी अंकांतील निवडक लेखांचे संकलन असणाऱ्या ‘अक्षर दिवाळी’च्या अंकामध्येही या लेखाचा समावेश करण्यात आला.

        राष्ट्रपती पोलीस पदक आणि भारतीय पोलीस पदक हे त्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार त्यांना लाभले. आजही स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार्‍या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत. ते पतंजल योगाचे, भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, योग प्रशिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, मानसशास्त्रज्ञ, क्रीडा प्रशासक व संघटक आणि एक प्रेरणादायी लेखक म्हणून भारतात सुपरिचित आहेत. पतंजल योग, भारतीय तत्त्वज्ञान यांच्या अभ्यासाच्या भक्कम पायावरच त्यांचे प्रशिक्षण, लेखन, समुपदेशन यशस्वीपणे उभे आहे. शारीरिक सक्षमतेबरोबरच मनोबल, मन:शक्ती, मन:स्थिती, मनाचे संतुलन, मानसिकता, मनोवस्था इत्यादी घटकांना  महत्त्व देणारे क्रीडामानसतज्ज्ञ म्हणून ते ओळखले जातात. योगशास्त्र, भारतीय तत्त्वज्ञान, वेद-उपनिषदे आणि भगवद्गीतेचा अभ्यास आणि त्या ज्ञानाचा -माहितीचा यशस्वी अवलंब यांमुळे भीष्मराज बाम वेगळे ठरतात. सर्वच खेळांत परदेशी प्रशिक्षक नेमण्याची जणू स्पर्धाच लागलेल्या काळात त्यांची कामगिरी एक प्रेरणा निर्माण करते. सचिन तेंडुलकर, राहूल द्रविड, पी. गोपीचंद, अपर्णा पोपट, गीत सेठी, देवेंद्र जोशी, मायकेल फरेरा, जसपाल राणा, अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग अशा विश्वविख्यात खेळाडूंना बाम यांनी मार्गदर्शन केले आहे.  शिवाय - उद्योग व्यापार-वैद्यक-कला या क्षेत्रांतील होतकरूंना व प्रस्थापितांनाही ते मार्गदर्शन करतात. सामान्य कुटुंबातील खेळाडूंना, स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांनाही ते यशाचा मंत्र देतात. त्यांनी यासाठी पुरुषोत्तम अकादमी, नाशिक येथे योगविद्याधाम व पुण्यात स्पर्धा परीक्षा केंद्रे स्थापन केलेली आहेत.

         मना सज्जना, विजयाचे मानसशास्त्र, मार्ग यशाचा ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. यांचे तामिळ व हिंदी भाषांतरही झाले आहे. विजयाचे मानसशास्त्र हे त्यांचे पुस्तक खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही उपयुक्त आहे. एकाग्रता, शिस्त, ध्येयनिष्ठा, सातत्य, अचूक दिशा आदी गुण स्पष्ट करणारी सूत्रे बाम यांनी ‘मना सज्जना’ या पुस्तकाच्या माध्यमातून दिली आहेत.

        महाराष्ट्र शासनाने एकूण क्रीडा धोरणासाठी बाम यांच्या नेतृत्वाखाली एक समिती २००६ मध्ये नेमली होती. २००८ मध्ये त्यांनी शासनाला अहवाल सादर केला. महाराष्ट्र रायफल संघटनेचे अध्यक्ष, भारतीय रायफल संघटनेचे उपाध्यक्ष ही पदे त्यांनी भूषवली. आज भारतीय नेमबाजांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश मिळत आहे, याच्या मुळाशी बाम यांचे प्रयत्न आहेत.

        खेळाडूंना सभागृहात मार्गदर्शन करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

- विनय मावळणकर

बाम, भीष्मराज पुरुषोत्तम