Skip to main content
x

चव्हाण, चंद्रकांत सखाराम

अर्नाळकर, बाबूराव

       बाबूराव अर्नाळकर यांचा जन्म ठाणे जिल्ह्यातील अर्नाळा गावी झाला. घरची परिस्थिती यथातथाच असल्याने त्यांच्या मावशीने त्यांना मुंबईला आणले. मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी काही काळ व्यापारी ब्रिटीश कंपनीत नोकरी केली. स्वातंत्र्य चळवळीत हिरिरीने भाग घेतल्यामुळे बाबूरावांना तीन वेळा कारावास भोगावा लागला. ‘मराठा’ नावाचे एक मासिक त्यांनी काही काळ चालविले. मुंबईत स्वातंत्र्य सैनिक संघाचे ते अध्यक्ष होते. १९४१पासून १९६४ पर्यंत त्यांनी एक चष्म्याचे दुकान चालविले. संदेशकार अच्युत बळवंत कोल्हटकर हे त्यांचे गुरू असून त्यांनीच बाबूरावांना लेखनाची प्रेरणा दिली. एडगर वॉलिस लिखित ‘द फोर जन्टलमेन’ या कादंबरीचा अर्नाळकरांवर जबरदस्त प्रभाव पडला आणि त्यातून गुप्तहेर कथा लेखनाचा विषय त्यांना मिळाला.
        ‘चौकटची राणी’ ही त्यांची पहिली गुप्तहेर कथा १९४२च्या फेब्रुवारीत प्रसिद्ध झाली. नंतर त्यांनी गुप्तहेर कथा लेखनाचा कारखानाच चालवला. त्यांनी या कथांमधून निर्माण केलेल्या धनंजय, छोटू, झुंजार, विजया, चारुहास, काळा पहाड, दर्यासारंग, भीमसेन, कृष्णकुमारी वगैरे नायक/नायिका यांनी अनेक वाचकांना मोहून टाकले. ओघवती भाषा, सुटसुटीत व उत्कंठावर्धक कथानक यांमुळे सर्वसामान्य वाचकवर्गाचे ते आवडते लेखक बनले. १९३६ ते १९८४ या काळात त्यांनी १०९२ रहस्यकथा लिहिल्या. त्यांनी काही लघुकथा व नाटिकाही लिहिल्या.
       महाराष्ट्र शासनाने १९६२ साली दहा हजार रुपयांचे मानधन देऊन बाबूरावांचा सन्मान केला. १९६४मध्ये ते जस्टीस ऑफ पीस झाले. त्यांच्या गुप्तहेर कथांनी अनेक वर्षे वाचकांच्या बुद्धीला रुचणारे खाद्य पुरवले आणि त्यांच्या मनावर वर्षानुवर्षे अधिराज्य केले. रहस्यकथा लेखनाचा विक्रम केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेले बाबूराव अर्नाळकर हे एकच नाव असावे. वाचकवर्गाच्या संख्येचा विक्रमही कदाचित यांचाच असावा.

- वि. ग. जोशी

चव्हाण, चंद्रकांत सखाराम