दाणी, अनंत पुरुषोत्तम
महाराष्ट्रात संकरित गोपैदास कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवून धवलक्रांती घडवण्यात ज्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय योगदान दिले, त्यामध्ये डॉ. अनंत पुरुषोत्तम दाणी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पस्तीस-चाळीस वर्षांपूर्वी भारतात दूधटंचाई ही एक मोठी समस्या होती. भारतीय गायींची दूध उत्पादन क्षमता अत्यंत कमी असल्यामुळे दूध उत्पादनवाढीस मर्यादा होत्या. त्या वेळी कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विदेशी चांगल्या जातीच्या वळूचे वीर्य वापरून देशी गायीपासून अधिक दूध उत्पादन क्षमता असणारी नवीन संकरित पिढी निर्माण करण्याचे धोरण महाराष्ट्र शासनाने स्वीकारले. त्या वेळी प्रशिक्षण देऊन हजारो कुशल कृत्रिम रेतन तंत्रज्ञ तयार करण्याचे फार मोठे काम डॉ. दाणी यांनी केले. या विशिष्ट प्रशिक्षणासाठी उपयुक्त ‘आभासपेटी’ हे नावाजलेले शैक्षणिक साहित्य निर्माण करणारे संशोधक म्हणूनही पशुवैद्यकीय क्षेत्रात त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.
अनंत पुरुषोत्तम दाणी यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील एदलाबाद येथे मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव ताराबाई होते. ते १९४७मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी अंमळनेरच्या विज्ञान महाविद्यालयामधून १९४९मध्ये इंटर सायन्स उत्तीर्ण केले. मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातून १९५४मध्ये मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. (व्हेटरनरी सायन्स) ही पदवी मिळवली. पुढे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्यात नोकरी करत असतानाच मुंबई विद्यापीठाची एम.व्ही.एस्सी. ही जनावरांचे प्रजननशास्त्र विषयातील पदवी मिळवली. त्यांची नोकरीची सुरुवात ग्रामीण भागात पशुवैद्य म्हणून झाली. त्यानंतर त्यांनी पुणे येथील कृत्रिम रेतन केंद्रावर प्रदीर्घ काळ काम केले. नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच डॉ. दाणी यांना कृत्रिम रेतन पद्धतीच्या सर्व तांत्रिक बाबींचे ज्ञान आणि अनुभव मिळाला. हे तंत्रज्ञान वापरण्यात त्यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले. त्याचबरोबर कृत्रिम रेतन केंद्रावर प्रशिक्षणासाठी येणार्या पशुवैद्यकीय पदवीधर आणि ग्रामीण भागात काम करणार्या पशुधन पर्यवेक्षकांना हे तंत्रज्ञान शिकवण्याचाही अनुभव जमा झाला. या तंत्राचे यश दिसू लागल्यानंतर प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून दूध उत्पादनवाढीच्या कार्यक्रमास गती देण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले. त्यासाठी पुणे या मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम रेतन प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्याची जबाबदारी डॉ. दाणी यांच्यावर सोपवली गेली व ती त्यांनी जबाबदारीने पार पाडली.
खेड्यापाड्यांतून त्यांनी कृत्रिम रेतन कौशल्याचा वापर करून संकरित गोपैदास कार्यक्रमाला मोठे यश प्राप्त करून दिले. त्यामुळे दूध उत्पादनात झपाट्याने वाढ होताना दिसू लागली. ही प्रगती लोकप्रतिनिधींच्या लक्षात येऊन विधानसभेतही संकरित गोपैदास कार्यक्रमाची वाहवा झाली. डॉ. दाणी यांनी केलेल्या प्रशिक्षण कामाची ही मोठी पावती होती. कृत्रिम रेतन करताना गायीच्या शरीरातील अवयव डोळ्यांना दिसत नाहीत, त्यामुळे गुदद्वारातून हात घालून प्रत्यक्ष गायी तपासताना काही अपघात होण्याची शक्यता असते. विद्यार्थ्याचे हात गायीच्या शरीरात, परंतु प्रत्यक्ष डोळ्यांनी हाताचे कार्य दिसत नाही. त्यामुळे विषयाचे आकलन होणे अवघड जाते. कत्तलखान्यात विद्यार्थ्यांना नेणे, तपासण्यासाठी पुरेशा गायी मिळणे; अशा सर्व अडचणींचा विचार करून डॉ. दाणी यांनी ‘आभासपेटी’ हे उपकरण तयार केले. ही एक लाकडी पेटी असून त्यात कृत्रिम हाडामध्ये कत्तलखान्यातून आणलेल्या मृत जनावराचे गर्भाशय व अन्य संलग्न अवयव बसवण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यास प्रत्यक्ष गाय तपासत असल्याचा आभास होतो आणि इच्छित स्थानी वीर्य सोडण्याचे शिक्षण विद्यार्थ्यांना सुलभपणे घेता येते. आभासपेटीमुळे गायी पाळण्याचा आणि विद्यार्थ्यांना कत्तलखान्यात नेण्याचा व्याप टाळून यावरचा प्रचंड खर्च वाचतो. या आभासपेटीसाठी डॉ. दाणी यांना १९७६-१९७७चे पुणे विद्यापीठाचे डॉ. जी.डी. आपटे पारितोषिक प्राप्त झाले. महाराष्ट्र शासनातर्फे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर या उपकरणाची मागणी आणि प्रशंसा झाली. विविध नियतकालिकांतून आभासपेटीला प्रसिद्धी मिळाली. डॉ. दाणी यांनी बुळकांडी या विषाणुजन्य आणि झपाट्याने पसरणार्या साथीच्या रोगाचे कायमचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी लसीचे उत्पादन करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांनी पशु-जैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथे उपसंचालक पदावर असताना अद्ययावत प्रयोगशाळा स्थापन करून व आधुनिक तंत्र कार्यान्वित करून राज्यभर पुरवठा होईल, अशा प्रमाणात लस उत्पादनाचे कार्य केले.
डॉ. दाणी यांना चित्रकलेची विलक्षण आवड होती. त्याचा वापर त्यांनी आपल्या व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या उत्साहाने केला. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ‘हंस’, ‘वाङ्मयशोभा’, ‘मनोहर’, ‘उद्यम’ अशा मासिकांतून त्यांच्या चित्रांना आणि व्यंगचित्रांना प्रसिद्धी मिळाली. डॉ. दाणी यांनी नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच प्रजासत्ताक दिनासाठी पशु-संवर्धन खात्याचा चित्ररथ तयार केला. त्यानंतर त्यांनी ग्रामपातळीवर, जिल्हापातळीवर भरलेल्या अनेक प्रदर्शनांमध्ये पशु-संवर्धन खात्यासाठी मॉडेल्स, पोस्टर्स तयार करून भाग घेतला. त्यांनी विविध राष्ट्रीय आणि जागतिक स्तरांवरील कृषी प्रदर्शनामध्येही पशु-संवर्धन खात्याचे आकर्षक दालन उभारण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग घेतला.
सेवानिवृत्तीनंतर डॉ. दाणी यांनी स्वतःला सामाजिक कार्यात गुंतवून ठेवले. पुणे येथील झोपडपट्टी परिसरातील प्राथमिक शाळेतील मुलांना मनोरंजक व उद्बोधक गोष्टी सांगणे, चित्रकला शिकवणे, इंग्रजी भाषा शिकवणे; असे सेवाभावी कार्य ते करत आहेत. यात त्यांची पत्नी मीरा यांची त्यांना साथ लाभली आहे.