Skip to main content
x

देशपांडे, श्रीपाद दत्तात्रेय

मामा देशपांडे

    शक्तिपात परंपरेतील दीक्षागुरू श्रीपाद दत्तात्रेय देशपांडे यांचा जन्म पुनर्वसु नक्षत्रावर गुरुवारी, आनंद नाम संवत्सरी, पुणे येथे झाला. त्यांच्या आई-वडिलांची शिस्त अत्यंत कडक होती.

आठव्या वर्षी श्रीपादची मुंज झाल्यावर वडिलांनी संध्या, सूर्यनमस्कार, सौरसूक्त, विष्णुसहस्रनाम, उपनिषद, गीता, ब्रह्मयज्ञ ही दैनंदिन उपासनेची दीक्षा दिली. पित्यासोबतच श्रीपादने हिमालयात व नंतर चार वर्षांनी नर्मदा परिक्रमा केली. श्रीपादचे शिक्षण चालू असतानाच वडील स्वर्गवासी झाले. त्यामुळे चौदा वर्षीय श्रीपाद व पाच वर्षीय यशवंत (धाकटा भाऊ) या दोघांना घेऊन मातु:श्री पार्वती पुणे येथे आल्या.

आई भक्तिरसात मग्न राही, त्याच वातावरणात श्रीपाद वाढत होता. चरितार्थासाठी तो शिकवण्या करी; पण त्याचे शालेय शिक्षण सुटले. श्रीपाद यांनी कंपोझिंग शिकून एका वृत्तपत्रात नोकरी धरली. फावल्या वेळात तो घरोघरी हिंडून साबण विक्री करी. आई पार्वतीबाई हीच त्याची ऐहिक मार्गदर्शक व अध्यात्मगुरू होती.

१९४८ मध्ये श्रीपाद राजकोटला गेले. तीन विवाह होऊनसुद्धा १९४० ते १९४८ या अवधीत मामांचा संसार आटोपला. त्यांच्या पदरात एक पुत्ररत्न होते.

वयाच्या चौतिसाव्या वर्षी मामा साधना यात्रेला मुक्त झाले. २६ नोव्हेंबर १९४१ रोजी मातु:श्री पार्वतीबाईंनी इहलोकीची यात्रा संपविली. यानंतर श्री गुरुदेवदत्त हेच मामांचे माता, पिता, बंधू व सखा होते. प्रयत्नवादी असल्याने मामांनी ‘यत्न तो देव जाणावा’ हे सूत्र अखंडपणे आचरणात आणले. १९३६ पासून मामा देशपांडे दरवर्षी पंढरपूरची वारी करू लागले. १९५४ साली सोलापूर येथे मामांना श्री वामनराव गुळवणी महाराजांचे दर्शन झाले. मामांनी १९७१ मध्ये गुळवणी महाराजांबरोबर त्रिस्थळी यात्रा केली. प्रभुकृपेने मामांना लंडनच्या भेटीचा योग आला. मामांची साधी राहणी, खाणे-पिणे, साधना व आचरण बघून तिथले लोक मामांना ‘छोटे गांधी’ म्हणू लागले. मामांना लहानपणापासूनच दत्तभक्तीचा छंद होता. वडिलांबरोबर हिमालय यात्रा करीत असताना मामांना श्री गजानन महाराज गुप्ते, नारायण महाराज केडगावकर या संतपुरुषांचे सान्निध्य लाभले. मामांना ज्योतिषविषयक ज्ञान उत्तम होते. शक्तिपात परंपरेतील अनेकांचे दीक्षागुरू मामा हेच होते. पू. श्री गुळवणी महाराजांनी मामांना विधिपूर्वक जो मंत्र दिला, तो त्यांना पूज्य वासुदेवानंद सरस्वती यांच्याकडून परंपरेने लाभला होता. दत्त संप्रदाय, नाथ परंपरा, वारकरी संप्रदाय या सर्व पंथांत श्री दत्तांचीच शिष्यपरंपरा सांगितली जाते.मामांचा शक्तिपात योग संप्रदायाच्या सर्व १६४ प्रकारांचा सखोल अभ्यास व अधिकार होता.

मामा देशपांडे यांची  ग्रंथसंपदा मोठी आहे. ह. भ. प.केशवराव देशमुख महाराजांनी केलेले ज्ञानेश्वरीचे तीन खंडांतील सुलभ ग्रंथ रूपांतर,  हरिपाठ, अभंगमालिका, नारद भक्तिसूत्र, विवरण इत्यादी ग्रंथत्यांनी  प्रकाशित केले. ‘संतकृपा’ नावाचे मासिकही त्यांनी सुरू केले. १९८३ मध्ये श्रीवामनराज प्रकाशन व श्री वामनराज त्रैमासिकाची सुरूवात केली. अनेक वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली.  ‘श्री ज्ञानेश्वरी वाड्.मय अभ्यास मंडळ’ स्थापन करून  त्यांनी ज्ञानेश्वरीचा प्रचार केला. त्यांनी श्री गुळवणी महाराजांच्या परवानगीने  परदेशी जाऊन; इंग्लंडला ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली.

श्री गुळवणी महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांनी १९७३ मध्ये ‘संप्रदाय सेवाकार्यासाठी स्वतंत्र पीठ स्थापन करावे’ या हेतूने  पुण्यातील  सिंहगड रस्त्यावरील हिंगंणे खुर्द येथे ‘माऊली’ आश्रमाची स्थापना केली.मामांनी श्री दत्तप्रभूंच्या आज्ञेने कोयनानगर जवळील हेळवाक या गावी डोंगरावर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली. मंगळवार २१ मार्च १९९० रोजी त्यांनी योगमार्गाने देह सोडला.

  सौ. शकुंतलाताई आगटे आणि. श्री शिरीषदादा कवडे हे मामांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी या नात्याने मामांचे कार्य पुढे चालवीत आहेत.

वि.ग. जोशी, - आर्या जोशी

देशपांडे, श्रीपाद दत्तात्रेय