Skip to main content
x

धांदरफळे, कृष्णा रावजी

माहूरकर, विष्णुदास

    मराठवाड्यातील माहुरगड येथील रेणुकामातेचे भक्त व थोर दत्त उपासक, प्रसिद्ध कविश्रेष्ठ संत विष्णुदास माहूरकर यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रावजी होते. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील ‘धांदरफळ’ म्हणून त्यांचे आडनाव धांदरफळे झाले. मूळ पुरुष चिंतामणीबुवा ऊर्फ श्रीधर हे धर्मपरायण होते. पुढे हे घराणे भ्रमण करीत सातारा येथे स्थायिक झाले.

विष्णुदास यांचे परिवारातील नाव कृष्णा होते; परंतु विष्णुदास हेच नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. त्यांना विष्णू, अनंत, गणपती असे तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. आपले ज्येष्ठ बंधू विष्णू याविषयीच्या आदरापोटी कृष्णाने कवी म्हणून ‘विष्णुदास’ असे नाव धारण केले असावे, असे काही अभ्यासकांचे मत आहे. सातारा येथेच विष्णुदास यांचे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणापासूनच त्यांस भटकंतीची आणि देवाधर्माची विशेष आवड होती. साताऱ्याजवळील माहुली,जरंडेश्वर, खिंडीतील गणपती,औंधची देवी ही ठिकाणे विष्णुदासांची आवडीची ठिकाणे होती. या स्थळांना वारंवार भेटी देण्याचा त्यांस छंदच जडला होता. लहानपणीच ते प्रवचन, कीर्तन शिकले होते. तसेच उत्स्फूर्त कविता, विशेषत: भक्तिगीते रचण्याचा त्यांना नाद होता.

सातारा-औंध रस्त्यावरील रहिमतपूर येथील हरिभक्तिपरायण सातपुते यांचा धांदरफळे कुटुंबाशी निकटचा स्नेहसंबंध होता. या सातपुते यांची कन्या रुक्मिणी हिच्याशी विष्णुदास यांचा १८५६ साली विवाह झाला. अध्यात्मरंगी विष्णुदासांना परमार्थात प्रपंचाची अडचण नको होती; पण अखेर आई-वडिलांच्या आग्रहापुढे त्यांना नमते घेऊन लग्न करणे भाग पडले. लग्न झाले तरी विष्णुदास संसारात रमले नाहीत.

साताऱ्याजवळील  त्रिपुटी येथील साधक-अधिकारी पांडुरंगबुवा दगडे यांच्याशी पारमार्थिक चर्चा करण्यात, साधना करण्यात विष्णुदास यांचा वेळ जात असे. दगडेबुवा यांच्या समवेत विष्णुदासांनी पंढरपूर, तुळजापूर, देहू, आळंदी अशा तीर्थक्षेत्रांच्या यात्राही केल्या होत्या. परमेश्वराची ओढ, ईश्वराचा शोध त्यांना घरात स्वस्थ बसू देत नव्हता. पण प्रपंच-पत्नी सोडून कसे जायचे?, हा प्रश्न त्यांना पडला होता. पत्नीची परवानगी घेऊन घर सोडून जावे या प्रामाणिक हेतूने त्यांनी पत्नीला आपला मनोदय सांगितला आणि एके दिवशी ते घर सोडून निघून गेले.

गृहत्याग करून, ठिकठिकाणी हिंडून ते पंढरपूरला आले व तेथून तुळजापूर, विजापूर करीत हंपीच्या विरूपाक्षाच्या दर्शनाला गेले. असेच भटकत भटकत ते एके दिवशी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे आले. रेणुकामातेचे दर्शन करताच त्यांना एक प्रकारची मन:शांती, समाधान लाभले आणि ईश्वरभेटीची त्यांची तळमळ संपुष्टात आली. रेणुकामातेच्या भक्तीने त्यांच्या काव्याला नवा बहर आला  व नव्या-नव्या रचना होत राहिल्या. माहूर येथील श्री. रेणुराव देशमुखांकडे त्यांना आश्रय मिळाला. भल्या पहाटे उठून मातृतीर्थावर स्नान करून, संध्या आटोपून विष्णुदास गडावर रेणुकामातेच्या दर्शनास जात. तेथून समोरच्या डोंगरावरील दत्त दर्शनास व अनसूया दर्शनास जात व परत येताना गडावरील कालीमातेचे दर्शन करून येत. हा त्यांचा नित्यनेम होता. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता एक कठोर व्रत म्हणूनच ते हा नित्यनेम पार पाडत असत. गावात पाच घरे भिक्षा मागून ते आपली भूक भागवत व उरलेला सर्व वेळ रेणुकामातेशी संवादात, अनुसंधानात घालवत. विष्णुदास यांना साक्षात रेणुकेचे व दत्तप्रभूंचे दर्शन घडलेले होते.

संत विष्णुदास यांचे चरित्र व काव्य तीन खंडांमध्ये प्रसिद्ध झालेले आहे. या खंडांमध्ये त्यांनी रचलेल्या भक्तिरचना, आरत्या, कविता, पदे,अष्टके आणि अभंग अशी वैविध्यपूर्ण व विपुल काव्यरचना आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या काही लावण्या, प्रेमगीते, विरहगीतेसुद्धा प्रसिद्ध आहेत. रेणुका व दत्तभक्तांमध्ये यांच्या भक्तिरचना फार लोकप्रिय आहेत.

सातारकडचे एक देवीभक्त सदोबा काळे माहूरला दर्शनास आले असता त्यांना विष्णुदास दृष्टीस पडले. ही वार्ता साताऱ्याला  जाऊन त्यांनी विष्णुदास यांच्या पत्नीला सांगितली. विष्णुदासांची सोळा वर्षांनी पत्नीशी माहूर येथे भेट झाली. त्यांचा नव्याने संसार सुरू झाला; पण काही वर्षांतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. ५०-५५ वर्षे माहूर येथेच वास्तव्य केल्यामुळे विष्णुदासांना ‘माहूरकर’ म्हणूनच ओळखले जाते. थोर दत्तभक्त टेंब्येस्वामींसह अनेक साधु-संत विष्णुदासांना भेटण्यास आले होते.

सत्तरी ओलांडल्यानंतर विष्णुदासांची प्रकृती वृद्धापकाळाने क्षीण होत गेली. मठाची जबाबदारी शिष्य खंडेराव यांच्यावर सोपवून ते मुक्त झाले. पौष शुद्ध सप्तमीला, (इ.स. १९१६) ते रात्री सिद्धासन घालून ओंकार जप करीत बसले व पहाटे समाधिस्थ झाले. तेथे त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.

 — विद्याधर ताठे

धांदरफळे, कृष्णा रावजी