Skip to main content
x

गांगल, सुधा गजानन

     डॉ.सुधा गांगल यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शालेय शिक्षण आणि इंटरसायन्सपर्यंतचे दोन वर्षांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. १९५२ साली लग्न झाल्यावर त्या मुंबईला स्थायिक झाल्या. १९५४ साली त्यांनी प्राणिशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी मिळवली. या विषयात विद्यापीठात त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांचा कल संशोधनाकडे असल्यामुळे त्यांनी कर्करोग संशोधन संस्थेत (कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट) प्रवेश घेतला. तिथे कर्करोगाच्या पेशी शरीराबाहेर वाढवून त्यांचे गुणधर्म मूलपेशीप्रमाणे आहेत का यावर संशोधन करून १९५९ साली एम.एस्सी. पदवी मिळवली. याच संस्थेत कर्कपेशीविरुद्ध शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करता येईल का या विषयावर संशोधन करून त्यांनी १९६३ साली पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

     कर्करोग संशोधन संस्थेत डॉ. कमल रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याबरोबर हे संशोधनाचे काम केले. या कामगिरीमुळे त्यांना अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठात शिष्यवृत्तीसह पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी बोलावणे आले. १९६४ ते १९६६ असे दोन वर्षे मिशिगन विद्यापीठात संशोधन करून त्या भारतात परत आल्या. त्यानंतर त्यांनी कर्करोग संशोधन संस्थेत भारतातील पहिली कॅन्सर इम्युनॉलॉजी लॅब सुरू केली. कर्करोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती करण्याच्या कामाला त्यांनी त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने सुरुवात केली.

     डॉ.सुधा गांगल यांनी कर्करोग पेशी शोधण्यासाठी स्थिर मार्कर (स्टेबल मार्कर) शोधली. हा कर्करोग पेशी संशोधनाचा महत्त्वाचा टप्पा ठरला. त्यांनी मुख्यत्वे भारतात मोठ्या प्रमाणात आधळणाऱ्या, तोंडाच्या कर्करोगावर काम केले. एकूण २५ विद्यार्थिनींनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून एम.एस्सी./पीएच.डी. पदव्या मिळवल्या.

     कर्करोग संशोधन संस्थेतील आपल्या प्रदीर्घ चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत त्यांचे १५० च्यावर संशोधन निबंध प्रकाशित करण्यात आलेले आहेत. त्यापैकी काही शोधनिबंध त्यांनी परदेशातील परिषदांमध्ये सादर केलेले आहेत. यावरून त्यांच्या संशोधन कामाचे जगभर असलेले महत्त्व अधोरेखित होते. त्यांनी १९८४ साली झालेल्या भोपाळ वायू दुर्घटनेच्या चौकशी समितीमध्ये त्यांनी काम केले. अनेकांच्या रक्त तपासण्या करून, विषारी वायूमुळेच श्वास घुसमटून त्यांचा मृत्यू झाल्याचे सिद्ध केले.

     त्या इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडियन कॉलेज ऑफ अ‍ॅलर्जी आणि अप्लाइड इम्युनॉलॉजीच्या फेलो आहेत. इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशनच्या कामात १९७५ सालापासून अनेक वर्षे त्या सहभागी आहेत. त्या संस्थेचे  अध्यक्षपद १९९२ ते १९९४ या कालावधीत त्यांनी भूषवले आहे. १९६५ साली शकुंतला अमीरचंद पारितोषिक, १९७४ साली राजा रवीशेर सिंग मेमोरियल कॅन्सर रिसर्च अ‍ॅवार्ड आणि १९९१ साली रॅनबॅक्सी फाउंडेशन पुरस्कार असे सन्मान त्यांना लाभले आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक समित्यांमध्ये सल्लागाराचे काम केले आहे. तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वैज्ञानिक नियतकालिकांच्या (जर्नल्सच्या) संपादक मंडळावरही  काम केले आहे.

     बी.जे. वाडिया रुग्णालयामध्ये सहा वर्षे त्यांनी संशोधन संचालक म्हणून काम पाहिले. त्यांची संशोधकवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. तेथे त्यांनी बालकांना गर्भावस्थेत होणाऱ्या थॅलेसेमिया या रोगाचे निदान कसे करता येईल, यावर संशोधन केले. तसेच जनुकीय आजारांवर उपचार करण्यास जेनेटिक क्लिनिक स्थापन केले. २००१ साली त्या पुण्याला स्थायिक झाल्या. तेथे त्यांनी मुव्हींग अकॅडमी ऑफ मेडिसीन अ‍ॅण्ड बायोमेडिसीन (एम.ए.एम.बी.) या नावाची संस्था स्थापन केली. डॉ. माधव देव यांच्याबरोबर या संस्थेच्या त्या उपाध्यक्ष व कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. पुरंदर तालुक्यातील स्त्रियांच्या जनुकीय आजारावर त्यांनी संशोधन केले. २००७ साली भारती विद्यापीठाच्या राजीव गांधी जैवतंत्रज्ञान संस्थेच्या सन्माननीय व्याख्यात्या म्हणून रूजू झाल्या. डॉ. गांगल यांनी संशोधनात योगदान देताना गृहिणी म्हणूनही आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

मृणालिनी साठे / दिलीप हेर्लेकर

गांगल, सुधा गजानन