Skip to main content
x

गम्रे, अमृत नामा

         अमृत नामा गम्रे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील बोरसूड या गावी झाला. दि. १ मार्च १९४० रोजी लष्करी नोकरीत प्रवेश केल्यावर महार फलटणीमध्ये त्यांची हवालदार या पदावर नियुक्ती करण्यात आली.
          दि. २ नोव्हेंबर १९४८ रोजी झोझिला पास येथील माचोई तळावर हल्ला करणाऱ्या आक्रमक तुकडीमधील मशीनगन चालवणाऱ्या तुकडीचे नेतृत्व हवालदार गम्रे यांच्याकडे होते. आक्रमक तुकडीला त्रासदायक ठरणाऱ्या शत्रूच्या स्वयंचलित मोर्चाला नष्ट करण्याचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. त्यांनी शत्रूला इतक्या कुशलतेने गुंतवून ठेवले, की आक्रमक तुकडीला आपल्या लक्ष्याच्या दिशेने पुढे सरकणे सहजसाध्य होऊन गेले. या चकमकीदरम्यान हवालदार गम्रे यांना स्वतः जोरदार गोळीबाराचा सामना करावा लागला; परंतु अशा अवघड परिस्थितीतही ते डगमगले नाहीत.
       १४ नोव्हेंबर या दिवशी पिनद्रास येथील ब्राऊन हिलवरील हल्ल्यात हवालदार गम्रे यांनी अशीच कामगिरी पार पाडली. या युद्धादरम्यान शत्रूचा सामना करताना अमृत नामा गम्रे यांनी दाखवलेल्या अतुलनीय  शौर्याबद्दल दि. १५ नोव्हेंबर १९४८ रोजी त्यांना ‘वीरचक्र’ देऊन सन्मानित करण्यात आले.

-संपादित

गम्रे, अमृत नामा