Skip to main content
x

इंगळे, महादेव भानाजी

     अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत चित्रकार म्हणून सातत्याने कार्यरत राहिलेले व सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट व महाराष्ट्र राज्याचे कलासंचालक म्हणून नियुक्ती झालेले महादेव भानाजी इंगळे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील पनोरा या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील भानाजी आणि आई मनाबाई संगीताची वाद्ये मढविण्याचा, तसेच लाकडावरील कोरीवकामाचा व्यवसाय करीत. वाद्य मढवण्याच्या कौशल्यासाठी भानाजी पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. दुर्दैवाने महादेव हा दुसरा मुलगा जेमतेम दीड वर्षाचा असताना भानाजींचे निधन झाले.

आई मनाबाईंनी या प्रतिकूल परिस्थितीतही आपला व्यवसाय सुरूच ठेवला. आई आणि भावाला मदत करीत इंगळ्यांचे प्राथमिक शिक्षण पनोर्‍यातच झाले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी दर्यापूरला प्रबोधन विद्यालयात प्रवेश घेतला. चित्रकलेची पार्श्‍वभूमी नसली तरी त्यांच्यातील कलागुण स.धु. बापट या कलाशिक्षकांनी ओळखून त्यांना प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन देऊन गे्रड परीक्षांना बसविले. पुढे शालान्त परीक्षेसाठी इंगळ्यांनी चित्रकला विषय निवडला.

नागपूरच्या स्कूल ऑफ आर्टमध्ये इंगळे यांनी टीचर्स ट्रेनिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. या परीक्षेत ते महाराष्ट्रात सर्वप्रथम आले. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही पुढील शिक्षणाच्या ओढीने इंगळ्यांनी मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. सुंदर परिसर, कलासंपन्न वातावरण आणि शिक्षकांच्या सुयोग्य मार्गदर्शनात त्यांचा अभ्यास जोरात सुरू झाला. स्वतःला झोकून देऊन ते वेगवेगळ्या कलाशैलींचा अभ्यास करीत होते. सुरुवातीला तांत्रिक कलेपासून स्फूर्ती घेऊन चित्रनिर्मिती करीत असतानाच केवलाकाराकडे त्यांचा कल वाढत होता. तैलरंगात नाइफ आणि रोलर्स वापरून गडद रंगात थेट प्रकारे केलेल्या त्यांच्या कामाचे सर्वच कौतुक करीत. याच काळात त्यांना अनेक मानाची पारितोषिके मिळाली. ‘उषा देशमुख’ सुवर्णपदक मिळवून ते 1970 मध्ये जी.डी. आर्ट परीक्षेत सर्वप्रथम आले. याच वर्षी त्यांना जे.जे. स्कूलमध्ये फेलोशिपचा बहुमान मिळाला. 1979, 1980, 1982 या वर्षी त्यांना राज्य पुरस्कार मिळाले, तर 1988, 1989 व 90 अशा तीन वेळा ते बॉम्बे आर्ट सोसायटीच्या पुरस्काराचे मानकरी ठरले.

अर्थार्जनासाठी त्यांनी पुण्याला अभिनव महाविद्यालयात साहाय्यक अधिव्याख्याता म्हणून नोकरी पत्करली. 1972 मध्ये त्यांचा कमल डोमरे हिच्याशी विवाह झाला. संसाराची जबाबदारी पत्नीवर सोपवून ते चित्रकला आणि शिक्षकी पेशावर लक्ष केंद्रित करू लागले.

कौटुंबिक अडचणींमुळे, 1972 मध्ये ते वृद्ध आईच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे अभिनव कला महाविद्यालयातील कायमस्वरूपी नोकरी सोडून अमरावतीस शिवाजी विद्यापीठात साहाय्यक अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. पण तेथील अंतर्गत  राजकारण व कामाच्या ताणामुळे त्यांना चित्रकलेला वेळ देता येईना व त्यांचे मनःस्वास्थ्यही हरवले. राजीनामा देऊन इंगळे मुंबईला आले आणि हंगामी साहाय्यक अधिव्याख्याता म्हणून जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये रुजू झाले. चित्रनिर्मिती परत जोमाने सुरू झाली. 1980 मध्ये त्यांची प्राध्यापक म्हणून औरंगाबादला बदली झाली व तेथे 1987 ते 1990 पर्यंत त्यांनी संस्थाप्रमुख म्हणून काम पाहिले. तेथे काम करायला भरपूर वेळ आणि शांतपणा मिळाला. या काळात त्यांनी वेगवेगळ्या चित्रप्रदर्शनांत भाग घेतला. 1991 व 1994 मध्ये भारतातर्फे होणार्‍या आंतरराष्ट्रीय ‘त्रिनाले’सारख्या जागतिक प्रदर्शनात त्यांनी सहभाग घेतला. 1997 मध्ये त्यांना ‘बिनाले’ चे पारितोषिकही मिळाले.

इंगळे यांची सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता व त्यानंतर ‘कलासंचालक, महाराष्ट्र राज्य’ या पदावर पदोन्नती झाली. प्रशासकीय कामाचा त्यांचा पिंड नव्हता. त्यांच्या कारकिर्दीत त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला व टीकेला सामोरे जावे लागले. प्रशासकीय कामातील खाचाखोचा, राजकारण, मानसिक ताण या सगळ्यांतूनही वेळ काढून ते चित्रे काढत.

इंगळे यांचे वास्तववादी शैलीवर प्रभुत्व असूनही त्यांचा ओढा प्रथमपासून अमूर्त शैलीकडेच होता. सुरुवातीच्या काळात ते पातळ तैलरंग रोलरने लावून नाइफच्या साहाय्याने पोत निर्माण करीत. पुढील काळात त्यांच्या चित्रांत रंगांचे जाड थर दिसू लागले. भौमितिक वाटणारे आकार व नाजूक रेषा यांच्या नाट्यपूर्ण रचनेतून त्यांची चित्रे साकार होत. रोलरच्या साहाय्याने एकावर एक लावलेल्या रंगांतून विविध पातळ्या निर्माण होऊ लागल्या.

2004 मधील निवृत्तीनंतर बदलापूरसारख्या शांत ठिकाणी त्यांची कलासाधना आजही सुरू आहे.

- गीता जाधव

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].