कारेकर, प्रभाकर जनार्दन
प्रभाकर जनार्दन कारेकर यांचा जन्म गोव्यातील जुवे या गावी झाला. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेले कारेकर संगीताच्या ओढीनेच मुंबईत दाखल झाले. सुप्रसिद्ध गायक पं. सुरेश हळदणकर यांच्याकडे राहून त्यांनी अनेक वर्षे संगीताची तालीम घेतली. त्यांच्या गायकीचे मूळ संस्कार घेऊन कारेकरांची कारकीर्द सुरू झाली. पं. सुरेश हळदणकर हे स्वत: मैफलीचे गायक व त्याचबरोबर संगीत रंगभूमीवरील गायक-नट असल्याने, त्यांनी लोकप्रिय केलेली नाट्यपदेही कारेकर त्यांच्याच ढंगाने गात असत. ‘श्रीरंगा कमलाकांता’ हे खास उदाहरण होय. पुढे पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी.आर. व्यास या थोर गुरूंकडून कारेकरांना ग्वाल्हेर आणि आग्रा घराण्याची तालीम मिळाली. त्यामुळे अनेक प्रचलित- अप्रचलित रागांचे सादरीकरण करून कारेकर आपली मैफल सजवितात, त्याचबरोबर पारंपरिक आणि पं. अभिषेकींच्या संगीत दिग्दर्शनातील नाट्यपदेही आपल्या कार्यक्रमात सादर करतात.
मास्टर दीनानाथांच्या ढंगातील नाट्यपदेही ते विशेष तडफदारपणे सादर करतात. प्रत्यक्ष रंगभूमीवर भूमिका न करताही, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात अफाट लोकप्रियता मिळालेले गायक म्हणून कारेकर प्रसिद्ध आहेत. दमसास, पल्लेदार ताना आणि गायनातील रंजकता यांमुळे कारेकर आपल्या गायनाने रसिकांना तृप्त करतात. गेली ४० वर्षे त्यांनी आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे.
ते आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून, दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांत आणि आकाशवाणी संगीत संमेलनांत त्यांनी आपले गायन सादर केले आहे. त्याचप्रमाणे त्यांना आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन सादर करण्याची संधी मिळाली .
आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक रेकॉर्डिंग कंपन्यांतर्फे त्यांचे अनेक ध्वनिमुद्रण संच निघाले . त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय वादक-कलाकारांबरोबर गायन सादर केले आहे, उदा. कोलमन (अमेरिका), उस्ताद सुलतान खाँ (भारत). अनेक देशांमध्ये या तिघांनी एकत्रितपणे गायन-वादन सादर केले . न्यूयॉर्कमधील ‘रागा फेस्टिव्हल’, इटलीमधील ‘अम्ब्रिआ ९८’ आंतरराष्ट्रीय महोत्सव यांतील त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले होते.
अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इटली, आखाती देश अशा अनेक देशांमध्ये त्यांनी आपले गायन यशस्वीपणे सादर करून हिंदुस्थानी संगीताची ध्वजा फडकत ठेवली आहे. प्रभाकर कारेकरांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कार मिळाला आहे. हिंदुस्थानी संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी ‘स्वरप्रभा ट्रस्ट’ स्थापन केला असून त्याद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन ते प्रतिवर्षी करत असतात.
२०१४ साली त्यांना ‘तानसेन सन्मान’ आणि २०१६ साली ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.