Skip to main content
x

कायंदे, कृष्ण संपत

           कोरडवाहू शेतीबाबत विदर्भ विभागात झालेल्या संशोधनासंबंधात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ डॉ. कृष्ण संपत कायंदे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर त्यांनी मध्य प्रदेशातील इंदोर येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून बी.एस्सी.(कृषी) व एम.एस्सी.(कृषी) या पदव्या प्राप्त केल्या. सुरुवातीच्या काळात त्यांनी नागपूर येथे कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्य केले. कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यावर त्यांचे कार्यक्षेत्र नागपूरहून अकोला येथे स्थलांतरित झाले. याच कालावधीत त्यांनी या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी संपादन केली. डॉ.कायंदे यांनी अखिल भारतीय कोरडवाहू कृषी संशोधन प्रकल्पात कामास सुरुवात केल्यापासून त्यांच्या संशोधनात्मक कार्याची ओळख सर्वांना झाली. त्यांनी सलग १४ वर्षे कोरडवाहू संशोधनाचे काम केले. कृषिविद्यावेत्ता ते प्रमुख शास्त्रज्ञ असा त्यांच्या कार्याचा टप्पा होता. विदर्भामध्ये सिंचनाचे प्रमाण कमी आहे. तसेच अवर्षणग्रस्त भागापेक्षा येथे पर्जन्यमान अधिक, त्यामुळे शेतपिकांच्या उत्पादनवाढीसाठी निरनिराळे प्रयोग करून, त्यामधून आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते हे सूत्र मनामध्ये बांधून त्यांनी विविध प्रकारच्या आंतरपीक पद्धतीचा परिचय करून दिला. त्यात तूर + मूग, तूर + तीळ + सोयाबीन यांचा उल्लेख करावा लागेल. तसेच खोल जमिनीमध्ये खरीप हंगामात सोयाबीन अथवा मूग यांसारखे अल्प मुदतीचे पीक घेऊन हरभरा, करडई अथवा तूर अशी दुबार पीक पद्धत करता येऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले.

           खोल काळ्या जमिनीत मातीचे ढाळीचे बांध करून मृदा व जलसंधारण करण्याऐवजी सुबाभूळ वनस्पतींचा जैविक बांध निर्माण करूनही कार्य साध्य होते, हे त्यांनी दाखवून दिले. त्याचप्रमाणे या सुबाभळीचा हिरवा पाला पिकांच्या दोन रांगांत पसरून ज्वारी आणि कपास पिकाच्या नत्र व्यवस्थापनात ५० टक्क्यांपर्यंत रासायनिक खतांचा वापर कमी करता येईल, अशी महत्त्वाची शिफारस त्यांच्या संशोधनामुळे करण्यात आली.

           विदर्भ जरी हमखास पावसाचा भाग असला तरी मान्सून पाऊस लवकर थांबल्यास पिकाला पाण्याचा ताण बसतो. हे विशेषत: कपाशी पिकासंबंधात जास्त जाणवते, म्हणून उभ्या पिकात देशी नांगराने चर काढून ठेवल्यास त्यात पावसाचे पाणी साठवण्यास मदत होते. तसेच खोल काळ्या जमिनीत पर्जन्यकाळात योग्य निचऱ्याअभावी जास्त ओलीने कमी पीक उत्पादन होते. त्याकरता गादी वाफे वापरण्याची शिफारस हैदराबाद येथील ‘इक्रिसॅट’ या संस्थेने केली; तथापि त्याला विशिष्ट प्रकारचे अवजार आवश्यक असते. ते मिळणे कठीण आहे. त्याऐवजी उभ्या पिकात दोन ते तीन तासांनंतर नांगराने नळी पाडून व परत आडवे तास टाकून रुंद वरंबे करता येतात, हे त्यांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले.

           डॉ.कायंदे यांनी कोरडवाहू शेतीसंबंधात केलेल्या कामाचा गौरव म्हणून सप्टेंबर १९८७मध्ये  भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) व कॅनडा सरकारच्या कृषी विभागाने संयुक्तरीत्या प्रशस्तिपत्र व स्मृतिचिन्ह दिले. त्यांची विदर्भातील कोरडवाहू शेतीला उपयुक्त होतील अशी तीन पुस्तके प्रकाशित झाली.

-  डॉ. नारायण कृष्णाजी  उमराणी

कायंदे, कृष्ण संपत