Skip to main content
x

कहाळेकर, भालचंद्र महाराज

     .. १९३८ ते १९४८ हा कालखंड मराठवाड्याच्या दृष्टीने नवजागरणाचा कालखंड आहे. साहित्याच्या क्षेत्रातील ह्या पिढीचे अग्रणी म्हणून भालचंद्र महाराज कहाळेकर यांचे नाव नमूद करावे लागेल. मराठवाड्याच्या (हैद्राबाद धरून) वाङ्मयीन जीवनात त्यांनी एक प्रकारची सुसूत्रता आणली. सर्जनशील साहित्यिक अन् रसिक वाचक यांचा संपर्क घडवून आणला. मराठी मंडळासारख्या संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. आधुनिक कवितेचे आणि कथेचे मराठवाड्यातील अग्रदूत कविवर्य वा.रा. कांत अन् बी. रघुनाथ यांना आपल्या कोशातून बाहेर काढून, या वाङ्मयीन वातावरणात ओढले. मराठवाड्याचे सांस्कृतिक केंद्र असलेल्या हैद्राबादेत कार्यकर्त्यांचा एक उत्तम संच कहाळेकरांनी निर्माण केला. साहित्य परिषदेचा झपाट्याने कायाकल्प घडवून आणण्यात कहाळेकरांची योजकता, क्रांतदर्शित्व, कर्तृत्वशक्ती अन् निष्ठा कारणीभूत ठरली आहे.

कविश्रेष्ठ वा.रा.कांत यांच्या मते, प्रा.भालचंद्र महाराज कहाळेकर यांच्या विद्वत्तेने आणि प्रेरणेने प्रभावित झालेली एक पिढी हैद्राबादसह मराठवाड्यात निर्माण झाली आहे. त्यांच्यासारख्या सुसंस्कृत,बुद्धिमान अन् वाङ्मयप्रेमाने तळमळणाऱ्या नि:स्वार्थी माणसाची प्रतिमा त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांच्या अंत:करणात रुजली आहे यात संशय नाही.

भालचंद्र शंकर महाराज कहाळेकर यांचा जन्म मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या, वैदिक परंपरेच्या कहाळेकर-जोशी-महाराज घराण्यात मु. परतूर, जि. परभणी, सध्याचा जालना जिल्हा येथे मामाच्या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई. वडील वेदशास्त्रसंपन्न शंकर शंभुनाथ महाराज कहाळेकर हे दशग्रंथी, घनपाठी, अग्निहोत्री, प्रख्यात आयुर्वेदीय वैद्य व संस्कृत पाठशाळा संस्थापक-संचालक होते.

कहाळेकर यांचे पणजोबा वेदशास्त्रसंपन्न गुंडभट नाना महाराज कहाळेकर (ब्र.भू. सच्चिदानंद नंदतीर्थ स्वामी महाराज) यांनी संन्यासोत्तर समाधी घेतली. पणजोबांची समाधी व कहाळेकर घराण्याचे कुलदैवत असलेल्या मल्हारी म्हाळसाकांतांचे मंदिर मु. कहाळा (जि. नांदेड) येथे गोदावरीच्या तीरावर आहे. या देवस्थानाचे वारसदार अन् वंशज म्हणून महाराजही उपाधी कहाळेकर घराण्याला लाभली आहे.

वडील शंकर महाराज यांच्याबरोबर लहानपणीच काशीयात्रा अन् तिथेच व्रतबंध, तसेच घरी नित्यपूजाविधी, बाणपूजा, सूर्यनमस्कार, दंडबैठकादि व्यायाम, संस्कृत अमरकोशादी अभ्यास, धर्मशास्त्र, सर्व सूक्ते ही त्यांच्या वडिलांची शिस्त कहाळेकरांना लाभली. त्या योगे बलदंड शरीरयष्टी, निर्भयवृत्ती, निर्व्यसनीपणा, लोकसंग्रह हा वडिलांचा वारसा त्यांच्या अंगी बाणला.

कहाळेकरांचे प्राथमिक शिक्षण परभणी येथे, तर विद्यालयापर्यंतचे शिक्षण औरंगाबादला झाले. पुढील शिक्षणासाठी ते हैद्राबादला आले. तिथे ते १९४४ मध्ये एम.. एल.एल.बी. झाले. .. १९४७ मध्ये परभणी येथील नूतन विद्यामंदिर विद्यालयामध्ये मुख्याध्यापकपद स्वीकारून ती संस्था त्यांनी  ऊर्जितावस्थेत आणली. /४ वर्षे शाळेची व्यवस्था पाहून कहाळेकर हैद्राबादला परत आले. एम..ची पदवी दुसऱ्या वर्गात संपादन केल्यानंतर ते कायद्याच्या अभ्यासाकडे वळले. येथेही त्यांनी आपली चमक दाखविली. काही दिवस त्यांनी वकिली केली. परंतु, त्यांचा पिंड अध्यापन करण्याचा असल्याने ते पुन्हा अध्यापन क्षेत्राकडे वळले. मा... भुसारी यांच्या प्रयत्नांमुळे चादरघाट महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक व त्यानंतर अखेरपर्यंत उस्मानिया महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कहाळेकर अध्यापन क्षेत्रात कार्यरत राहिले. अध्यापनातील व्यासंगामुळे अन् वैचारिक अधिष्ठानामुळे, विद्यार्थ्यांची एक नवी अभ्यासू, चौकस पिढीच तयार झाली. प्रा.नरहर कुरुंदकर, प्रा..पं. जोशी, प्रा.डॉ.उषाताई जोशी, प्रा.तु.शं.कुलकर्णी, प्रा.मधू जामकर इ. शिष्यवत मांदियाळी गुरुवर्य कहाळेकरांचे अध्यापनातील वैचारिक ऋण मानणारी आहे.

प्राचार्य नरहर कुरुंदकर हे महाराष्ट्रातील ख्यातनाम व्यासंगी विचारवंत. जिज्ञासू दृष्टीने त्यांनी ज्ञानाची, साहित्याची परिक्रमा आरंभिली. या साधनेमागे गुरुवर्य प्रा.भालचंद्र महाराज कहाळेकर यांचे मार्गदर्शन सातत्याने लाभल्याविषयी ऋण व्यक्त करताना प्रा.कुरुंदकर म्हणतात, ‘‘शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात मी त्यांचा विद्यार्थी कधीच नव्हतो. १९४९ ते आजतागायत त्यांच्याशी केल्या गेलेल्या कठोर अन् प्रदीर्घ वाद-विवादातून माझी मते क्रमाने स्पष्ट होत गेली. त्यांच्या निर्दयटीकेतूनच दगडाला कंगोरे आले आहेत व म्हणूनच त्यांचे शिष्यत्व हे वैचारिक आहे. कहाळेकर महाराजांचा किती विषयांचा अन् किती व्यासंग होता याचा अंदाज मला शेवटपर्यंत घेता आला नाही. वाङ्मय समीक्षा, भाषाशास्त्र, व्याकरण, इतिहास, राजकारण अन् समाजकारण ह्या विषयांतील व्यासंगी अन् प्रखर विवेचक माझ्या पाहण्यात नाही.’’

आपल्या आयुष्यात कहाळेकरांनी थोडेफार जुजबी पण मौलिक लेखन केले. मराठवाड्यातील वाङ्मयीन क्षेत्र त्यांनी नव्या जाणिवांनी, स्वाभिमानाने समृद्ध करण्याचे केलेले कार्य कमी महत्त्वाचे असू शकत नाही. स्वत:च्या प्रकाशात स्वत:च उजळून निघण्यापेक्षा इतरांना प्रकाशित करून आपली ओजस्वी परंपरा निर्माण करणे हे कहाळेकरांचे ध्येय होते अन् ते त्यांनी प्रभावीपणे साध्यही केले.

ज्ञानतपस्वी गुरुवर्य ना.गो. नांदापूरकर, .शे.पोहनेरकर, कविवर्य वा.रा.कांत, वि.पा.देऊळगावकर, प्रा.भगवंतराव देशमुख, बी.रघुनाथ, राम पिंगळीकर, अनंत भालेराव, बा.गं.हरसूलकर, यशवंत कानिटकर, डॉ. सुरेंद्र बारलिंगे, डॉ. यु..पठाण, प्रा..वि. जोशी, रा..माढेकर, तसेच महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिकांनी प्रा.भालचंद्र महाराज कहाळेकर यांच्या व्यासंग, भाषानिष्ठा, अध्ययन, अध्यापन यांविषयी आपल्या लिखाण, भाषण अन् विचारांतून प्रशंसोद्गार काढले आहेत. .गांधींच्या विचारांचा व तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर खूपच प्रभाव होता. कहाळेकर स्वत: चरख्यावर सूत कातत. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी खादीचाच वापर केला. संपूर्ण खादीचा वेश, गौरवर्ण, कमी उंची, बलदंड शरीर, चेहर्यावरील व्यासंगी वृत्तीचे तेज असे त्यांचे रूप होते.

कहाळेकरांचे प्रभावी, ओजस्वी वक्तृत्व श्रोत्यांना केवळ भारावून टाकणारे नव्हते, तर अंतर्मुख करणारेही होते. ओघवती भाषा, कठोर विश्लेषण अन् परखड विचारसरणी या योगे त्यांनी अनेक सभा जिंकल्या. तसेच, आभार प्रदर्शनासारख्या किरकोळ समजल्या जाणार्या भाषणांनी त्यांनी फड जिंकले आहेत. कहाळेकर हे सव्यसाची, व्यासंगी वक्ते होते. उपहास, उपरोध ही शस्त्रेही ते कुशलतेने आपल्या भाषणांतून वापरीत. विशेषत: एखाद्या विरोधी विषयाच्या समर्थनार्थ ते उभे राहिले म्हणजे मग त्यांच्या वाणीला धार चढत असे.

मराठी साहित्य संमेलनात, परिषदेच्या कार्यात, संस्थेची घटना तयार करण्याच्या कामात कहाळेकरांनी अविश्रांत श्रम घेतले. कोणतीही बाब योजनाबद्ध असावी, त्यास संघटनेचे साहाय्य असावे याविषयी त्यांचा कटाक्ष असे. सबंध यंत्रणा तयार करण्यापासूनच थेट कुठले विषय ठरावाच्या रूपात चर्चेसाठी घ्यावेेत याबद्दल त्यांची स्पष्ट अशी भूमिका असे. प्रा.भालचंद्र महाराज यांच्या ह्या योगदानाबद्दल नितान्त आदर बाळगून त्यांना १९६७ मध्ये जालना येथे संपन्न झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देऊन कृतज्ञता व्यक्त केली गेली. संमेलनातील त्यांचे भाषणही अत्यंत प्रभावी अन् मार्गदर्शक ठरले.

सार्वजनिक जीवनात कहाळेकर तर्ककठोर आग्रही वाटत. हाती घेतलेल्या संस्थांचे कार्य ते निष्ठापूर्वक, नि:स्वार्थीपणे, सचोटीने हाताळीत. मराठवाडा साहित्य परिषद ह्या साहित्यिक संस्थेत ते इतके विरघळून गेले होते, की ते स्वत:च एक सांस्कृतिक संस्था बनून गेले. .सा..च्या प्रारंभ काळापासून ते संस्थेचे प्रमुख आधार होते. संस्थेची घटना तयार करणे, संस्थेचे केंद्रीय कार्यालय हैद्राबाद येथे ठेवून ते कार्यक्षम ठेवणे, वाङ्मयीन अभिरुची संपन्न करण्यासाठी अनेक कार्यक्रम आखणे, संशोधनपर ग्रंथांचे अन् साहित्याचे प्रकाशन करणे, नवीन प्रकाशन योजना राबविणे, प्रतिष्ठान, ‘पंचधारामासिकाची मुहूर्तमेढ रोवून ते नावारूपास आणणे, संस्थेसाठी वास्तू उभारणे इ.अनेकविध कार्यांत कहाळेकर यांच्या योजकतेला, विचारांना, संयोजन कौशल्याला अन् निरलस परिश्रमांना फार मोलाचे स्थान आहे.

मराठवाडा साहित्य परिषद पुढे औरंगाबादला गेल्यानंतरही कहाळेकरांनी हैद्राबाद येथील आंध्र-मराठी साहित्य परिषदेचे कार्य तितक्याच जोमाने चालू ठेवले. प्रा. कहाळेकरांचा आणखी एक विशेष होता, तो म्हणजे मराठी निष्ठा अन् भारतीय निष्ठा यांतील अद्वैतमराठीची अन् मराठी संस्कृतीची उपासना, ही व्यापक भारतीय निष्ठेची साक्ष आहे. या परिक्रमेत कहाळेकर पूर्णतया तादात्म्य पावले. पंचधाराच्या प्रत्येक अंकावर त्यांचा ठसा आहे. तेलुगू, तामिळ वाङ्मयाचे इतिहास, महाराष्ट्राचा धार्मिक इतिहास, याशिवाय प्राचीन ग्रंथांचे संशोधन-प्रकाशन, तेलुगू-मराठी कोश, साहित्यिकांचे विशेषांक इ. उपक्रमांमागे आधार राहिला तो कहाळेकरांच्या सक्रिय प्रेरणेचाआंध्र प्रदेशात मराठी भाषा, वाङ्मय अन् संस्कृती जतन करण्यात कहाळेकरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या स्मृत्यर्थ आंध्र मराठी साहित्य परिषद, औरंगाबाद अन् परभणी येथे ग्रंथालये स्थापण्यात आली आहेत.

कौटुंबिक स्वास्थ्य कहाळेकरांना क्वचितच लाभले. १९३९ ते १९४७ ह्या वैवाहिक जीवनानंतर पत्नी सौ. गंगाबाई यांचे (दोन कन्या मागे ठेवून) दु:खद निधन झाले. त्यानंतर कहाळेकरांनी दुसर्या लग्नाचा विचारही केला नाही. त्यांच्या आयुष्यातील विरक्तभाव अन् एकटेपणा अधिकच वाढला. अखेरच्या श्वासापर्यंत वाङ्मयीन क्षेत्र, साहित्यिक संस्थांची जडणघडण, अन् मराठी भाषेचा विकास हाच त्यांचा ध्यास अन् जीवनाधार बनला.

डॉ. धुंडिराज कहाळेकर

कहाळेकर, भालचंद्र महाराज