Skip to main content
x

कोरपे, कुसुम वामन

     कुसुम वामन कोरपे यांचा जन्म एका सुशिक्षित सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्रीधर गोविंद सपकाळ हे नामवंत कायदेपंडित व ख्यातकीर्त राजकीय पुढारी होते. त्यांचे ज्येष्ठ बंधू नीळकंठ सपकाळ हे सुद्धा सुविख्यात वकील आणि सामाजिक व राजकीय नेते होते. कुसुम कोरपे या महाराष्ट्राचे अग्रणी सहकारी नेते तथा महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते सहकार महर्षी वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या धर्मपत्नी होत. कुसुम कोरपे यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी समाजसेवेसाठी व्रतस्थ होती. त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. ही दोन्ही घराणी उच्चविद्याविभूषित असल्यामुळे त्यांचाही ओढा सतत विद्यार्जनाकडे राहिला. विवाहानंतरही त्यांनी शिक्षण सुरू ठेवून एम.ए.ची पदवी मिळवली. नागूपर विद्यापीठाने ‘विदर्भातील 20व्या शतकातील ग्रामीण नेतृत्वाचा विकास’ हा त्यांचा शोधप्रबंध स्वीकारून त्यांना पीएच.डी. पदवी बहाल केली.

     समाजसेवेला ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे कुसुम कोरपे यांचे राजकीय, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातील समाजकार्य प्रभावी राहिले आहे. त्यांनी 1957-1967 या 10 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत समाजोपयोगी भरीव कार्य केले. त्यांना मूर्तिजापूर मतदारसंघातील मतदारांनी दोन वेळा प्रचंड बहुमताने विधानसभेवर निवडून दिले ही त्यांच्या कार्याची पावती होय. त्यांनी आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील जनसामान्यांच्या समस्या व जिव्हाळ्याच्या प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

     कुसुम कोरपे यांची सहकार चळवळीवर प्रगाढ श्रद्धा असल्यामुळे त्यांनी या चळवळीला वाहून घेतले. निवारा ही मानवी जीवनातील मूलभूत गरज असते. आजच्या अत्यंत महागाईच्या परिस्थितीत अनेकांची घरकुलाची कोमेजणारी स्वप्ने त्यांनी सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील आपल्या अथक सेवेतून साकारली. त्या 1982-1987 या काळात महाराष्ट्र को. ऑप हाऊसिंग फायनान्स सोसा. लि., मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर संचालिका म्हणून कार्यरत होत्या. या काळात  त्यांच्या प्रोत्साहनाने जिल्ह्यात अनेक गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आल्या व या संस्थांना वित्तपुरवठा होऊन अनेकांना निवार्‍याचे छत मिळाले. अकोल्यातील सर्वप्रथम व गृहनिर्मितीत अग्रेसर असलेल्या आदर्श सहकारी वसाहत या गृहनिर्माण संस्थेच्याही त्या अध्यक्षा आहेत. कुसुम कोरपे यांना शैक्षणिक कार्याची विशेष ओढ होती. शिवाजी शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीव सदस्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून अकोला व विदर्भात विद्यादानाचे कार्यात त्या सदैव क्रियाशील राहिल्या. शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना शेतकर्‍यांविषयी नेहमीच आस्था होती. भारत कृषक समाज या शेतकरी समाज संस्थेच्या त्या आजीव सदस्या आहेत. या संस्थेच्या कार्यात सहभागी होऊन त्यांनी शेतकरी सेवेचे व्रत सांभाळले.

    अल्प बचत समिती व मुंबईच्या समाजकल्याण महामंडळावर कुसुम कोरपे सदस्या होत्या. तसेच त्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या उपाध्यक्षा व संचालिकाही होत्या. अनेक महिला मंडळाशी त्यांचा  संपर्क असून त्यांच्या आदर्शव्रत प्रेरणेने महिला चळवळींची विकासात्मक वाटचाल सुरू आहे.

    कुसुम कोरपे यांनी 1974 व 1987 अमेरिका, 1983 मध्ये युरोप, अमेरिका, जपान व हवाई बेट या पाश्चात्त्य देशांना भेटी देऊन तेथील सहकारी चळवळ व सामाजिक संस्कृतीचे अध्ययन केले. तेथे मिळविलेल्या ज्ञानाचा व अनुभवाचा देशातील चळवळीला, समाजाला लाभ व्हावा म्हणून त्यांनी ‘प्रदक्षिणा भूमातेची’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक  लिहिले. ते पुण्याच्या ख्यातनाम गतिमान प्रकाशनने प्रकाशित केले. तसेच त्यांनी त्यांच्या वडिलांचे ‘पिताश्री’ या शीर्षकाचे चरित्र लिहिले आहे.

    - सुधाकर रोडे

कोरपे, कुसुम वामन