Skip to main content
x

कुलकर्णी, प्रशांत विनायक

   दैनिक वर्तमानपत्रांतील तत्कालीन घटनांवर टीकाटिप्पणी करणाऱ्या पॉकेट कार्टून्सच्या दर्जेदार कामगिरीसाठी प्रशांत विनायक कुलकर्णी यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल; पण या व्यंगचित्र प्रकारापुरतेच त्यांचे कौशल्य मर्यादित नाही. व्यंगचित्रकला ही इतर कलांप्रमाणे अविरत व्यासंगाची गरज असलेली कला आहे. म्हणून सतत जागृत राहून त्याच्या नव्या-नव्या रूपात निर्मितीचा प्रयत्न करणे यातच खरा आनंद आहे, यावर श्रद्धा असणारे ते मराठीतील प्रयोगशील व्यंगचित्रकार आहेत.

प्रशांत विनायक कुलकर्णी यांचा जन्म कोल्हापूरचा; पण त्यांचे बालपण रत्नागिरी येथे गेले. तेथील शालेय शिक्षणानंतर त्यांनी बंगळुरू येथील अभियांत्रिकी महाविद्यालयामधून बी.. (सिव्हिल) ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते मुंबईत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात अभियंता म्हणून नोकरीला लागले. मंडळाच्या महानिर्मिती विभागात वीजनिर्मिती संबंधित बांधकामाशी निगडित असलेली कामे ते सांभाळतात.

अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिकत असताना बंगळुरू येथे प्रसिद्ध होणाऱ्या डेक्कन हेराल्डया वृत्तपत्रात येणाऱ्या राममूर्ती यांच्या व्यंगचित्रांनी त्यांना प्रभावित केले. ते स्वतःही व्यंगचित्र काढून पाहण्याला उद्युक्त झाले. त्यानुसार विद्यार्थिदशेतच हॉस्टेल लाइफया विषयावर त्यांनी व्यंगचित्रमाला रेखाटली. ती महाविद्यालयाच्या मासिकामध्ये छापून आली. छापील चित्रांची ही त्यांची सुरुवात होती.

नंतर कुलकर्णी नोकरीसाठी मुंबईला आले. एकदा नागपूर क्रिकेट कसोटीसाठी संदीप पाटील शेवटच्या क्षणी विमानाने हजर झाले, या घटनेवर प्रशांत कुलकर्णी यांनी सहज एक व्यंगचित्र रेखाटले व ते लोकसत्तेला पाठवून दिले. लोकसत्तेने ते छापले, आणि त्याला वाचकांकडून चांगली दाद मिळाली.

या उत्साहवर्धक सुरुवातीनंतर षट्कारया क्रीडाविषयक मासिकातून त्यांची व्यंगचित्रे नियमित येऊ लागली. तसेच चंदेरीया सिनेमाविषयक मासिकातून, तर अक्षरच्या दिवाळी अंकांतून त्यांची खूप व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली. हे चालू असता त्यांनी महानगरया सायंदैनिकासाठी दररोज पॉकेट कार्टूनकाढायला प्रारंभ केला व ही कामगिरी नंतर मुंबई सकाळसाठीही  केली. दै. लोकसत्तासाठी काय चाललंय कायया मथळ्याखाली ते आठवड्यातून सहा दिवस पॉकेट कार्टून काढत असतात. याखेरीज आवाज’, ‘अक्षर’, ‘कालनिर्णय’, ‘दीपावली. दर्जेदार दिवाळी अंकांतून राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक आशय असलेली व्यंगचित्रे, व्यंगचित्रमाला अशी दहा हजारांहून अधिक व्यंगचित्रांची निर्मिती प्रशांत कुलकर्णी यांनी केली.

पॉकेट कार्टूनप्रमाणेच कुलकर्णी यांची मासिकांतून आणि दिवाळी अंकांतून येणारी व्यंगचित्रे आपल्या विशेष गुणवत्तापूर्णतेने लक्ष वेधून घेणारी असतात. या दोन्ही प्रकारांच्या व्यंगचित्रांना त्यांच्यामधील उपजत सूक्ष्म निरीक्षणशक्ती, सामाजिक जाणीव, मार्मिक विनोदबुद्धी आणि शब्दांचा हुशारीने वापर करण्याचे कौशल्य यांची जोड आहे. या बरोबरीने पात्रांच्या समर्पक मुद्रांवरून आणि हावभावांवरून आशय अचूकपणे पोहोचवण्याचे रेखाटन कौशल्य त्यांच्यापाशी आहे. मात्र या दोन्ही प्रकारच्या व्यंगचित्रांमधल्या मूलभूत फरकाची त्यांना जाणीव आहे.

पॉकेट कार्टून ही पटकन, जलदीने पाहण्यासाठी असतात, तर दुसऱ्या प्रकारची व्यंगचित्रे सावकाशीने पाहत, तपशील न्याहाळत आस्वाद घेण्यासाठी असतात. हा महत्त्वाचा फरक मनाशी पक्का ठेवून आशय आणि अभिव्यक्तीच्या बाबतीत सतत नवे नवे प्रयोग करीत ते मराठीतील नेहमी आढळणाऱ्या व्यंगचित्रांहून वेगळी चित्रे काढतात. ही व्यंगचित्रे विषय आणि मांडणी यांच्या संपूर्ण वेगळेपणामुळे चकित करताकरता, त्यांमधील कल्पकतेला व मार्मिकतेला जाणकारांची हार्दिक दाद मिळवून देतात. उदाहरणार्थ, विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांना त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांचे दिलेले रूप ही चित्रमाला; शिवकालीन वर्तमानपत्राचा व्यंगचित्रकाराच्या कल्पनेतून उतरलेला नमुना; पन्नाशी ओलांडण्याच्या मुहूर्ताच्यानिमित्ताने महाराष्ट्राने पन्नास वर्षांत केलेल्या प्रगतीचा व्यंगात्मक आलेख; आधुनिक मानवाचे डार्विनच्या उत्क्रांती सिद्धान्तानुसार हजारो वर्षांनंतर कसे रूप असेल याचा काल्पनिक आणि व्यंगचित्रात्मक अंदाज, अशा काही त्यांच्या चित्रमाला नमुन्यादाखल दाखवता येतील.

प्रशांत कुलकर्णी यांनी तत्कालीन राजकीय घटनांवर टीकाचित्रे काढली आहेत. ती त्यांच्या सामाजिक जाणिवेतून बनलेल्या स्वतंत्र दृष्टीकोणावर आधारित आहेत. पक्षीय भेदाभेद न करता निःपक्षपणे ते आपली टीका निर्भयतेने मांडतात.

स्वतंत्र व्यंगचित्रांव्यतिरिक्त प्रशांत कुलकर्ण्यांनी ढिंगटांगया ब्रिटिश नंदी (प्रवीण टोकेकर) यांच्या सकाळमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या विनोदी स्तंभासाठीही वर्षभर चित्रे रेखाटली. या चित्रांनी मजकुरातील टीका अधिक टोकदार करून गंमत वाढवायला मदत केली.

रसिकांसाठी रेषा, भाषा आणि हशाआणि शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्टून धमालहे व्यंगचित्रांवर आधारलेले कार्यक्रम सादर करून व्यंगचित्रकलेच्या प्रबोधनाला प्रशांत कुलकर्ण्यांनी मोठा हातभार लावला आहेरेषा, भाषा आणि हशायांचे तर महाराष्ट्रात आणि बाहेर, अनेक ठिकाणी शंभरहून अधिक कार्यक्रम झाले आहेत. या त्यांच्या कामगिरीचा कळस म्हणजे त्यांनी संपादित केलेला निवडक मराठी व्यंगचित्रेहा मराठीमधील अगदी सुरुवातीपासून ते नंतरच्या जवळजवळ शंभर वर्षांतील, पण प्रामुख्याने स्वातंत्र्योत्तर काळातील निवडक मराठी व्यंगचित्रकारांची चित्रे व तत्संबंधी मुलाखती, विश्लेषण, व्यंगचित्रकारांची चिंतने एकत्रित असलेला ग्रंथ. या अभूतपूर्व ग्रंथाला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयया संस्थेने नाशिकचा उत्तम विनोदी साहित्यपुरस्कार देऊन गौरविले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्तम साहित्याचा पुरस्कारही याला मिळाला आहे.

प्रशांत कुलकर्णी यांच्या १९९० ते २००१ या कालखंडातील सामाजिक, राजकीय परिस्थितीचा आलेख काढणार्या व्यंगचित्रांचा संग्रह अधांतरी दरबारया नावाने प्रसिद्ध झाला आहे.

कार्टूनिस्ट कंबाइनया व्यंगचित्रकारांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. या कालावधीत त्यांनी केलेली कामगिरी अजोड होती.

यामध्ये ठिकठिकाणी भरवलेली व्यंगचित्रांची प्रदर्शने व त्या सोबतीने तुमच्यासमोर तुमचे अर्कचित्रया उपक्रमाअंतर्गत कुणाही रसिकांसाठी खुले असलेले आयोजन या गोष्टी तर होत्याच. पण त्या बरोबरीने हौशी व नवोदित शिकाऊ व्यंगचित्रकारांच्या प्रबोधनासाठी त्यांनी कार्यशाळा आयोजित केली होती व अनुभवी व्यंगचित्रकारांना, तसेच या क्षेत्रातील जाणकार साहित्यिक समीक्षकांना मार्गदर्शनासाठी  त्यांनी आमंत्रित केलेले होते. प्रशांत कुलकर्णी यांनी राबवलेला हा उपक्रम यशस्वी झाला. यात ठाणे येथे शंभरहून अधिक इच्छुकांनी भाग घेतला होता, तर याच प्रकारचे आयोजन रुपारेल महाविद्यालयामध्ये  विद्यार्थ्यांसाठी केले होते, त्यालाही भरघोस प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजून व्यंगचित्र व व्यंगचित्रकला यांविषयी समाजामध्ये आवड व जाण वाढावी यासाठी त्यांनी आपल्या कारकिर्दीत सातत्याने प्रयत्न केले.

राजकीय व्यंगचित्रांसाठीचा देशपातळीवरील माया कामतपुरस्कार त्यांना २०१० साली मिळाला.

- वसंत सरवटे

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].