कुलकर्णी, यशवंत सदाशिव
यशवंत सदाशिव कुलकर्णी यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील किरवली या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे झाले. पुढे माध्यमिक शिक्षण सातारा येथे झाले. मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि बी.एस्सी.(कृषी) ही पदवी संपादन केली. पदवी शिक्षणानंतर त्यांनी बटाटा संशोधक म्हणून कामास सुरुवात केली. हे काम करत असताना त्यांनी एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. रोपपैदासकार होण्यापूर्वी त्यांची कारकिर्द सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणून सुरू होती. वनस्पती -रोगशास्त्रज्ञ ते रोपपैदासकार हा त्यांचा प्रवास महत्त्वाचा ठरला. त्यामुळे पिकांच्या नवीन जाती निर्माण करताना रोग प्रतिबंधक जात निर्माण करण्याची दृष्टी आली.
डॉ.कुलकर्णी यांचे सुरुवातीचे संशोधन गहू गेरवाविषयी होते. त्यांनी तीळ पिकाबद्दल संशोधन करून धुळे ७-११-१ ही जात प्रसारित केली. पुढे त्यांनी जळगाव येथे प्रथम कापूस पैदासकार (१९५३-५७) व नंतर तेलबिया विशेषज्ञ (१९५७-१९६८) असा प्रदीर्घ कालावधी संशोधन कार्यात व्यतीत केला. कापूस पैदासकार म्हणून त्यांनी निर्माण केलेली वाय-१ ही देशी कापसाची जात सर्वमान्य झाली. संशोधनात्मक कार्य करत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी डॉ.सी.जे. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली. त्यांचा संशोधनाचा विषय कापूस हाच होता.
डॉ.कुलकर्णी हे रोपपैदासकार म्हणून जरी परिचित होते, तरी त्यांचे वनस्पती -रोगशास्त्रातील योगदान महत्त्वाचे आहे. उडीद पिकाचा बुरशीजन्य रोग हा सॅनीचीट्रियम या बुरशीमुळे होतो, हे त्यांनी दाखवून दिले. तसेच बॅक्टेरिया जीवाणूमुळे होणार्या पिकावरील सर्व रोगांबद्दल ‘फॅक्टोबॅक्टेरिसीई’ हे नवीन कूळ निर्माण करावे, ही त्यांची सूचना सर्वमान्य होऊन त्याबद्दल कार्यवाही झाली.
शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुणे येथील आघारकर संशोधन संस्थेत मानद प्राध्यापक म्हणून कार्य केले. या काळात पुणे विद्यापीठात मायक्रोबॉयोलॉजी विषयातील एम.एस्सी. व पीएच.डी. पदवीसाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणून कार्य केले. ‘तेलबिया विशेषज्ञ’ म्हणून डॉ.कुलकर्णी यांची दहा वर्षांची कारकिर्द महत्त्वाची ठरली आहे. भुईमुगाची सुप्रसिद्ध जात एस.बी. ११ ही त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरलेली आहे.