Skip to main content
x

माडखोलकर, गजानन त्र्यंबक

     विविध वाङ्मय प्रकारांत महत्त्वाचे योगदान देणारे, राजकारणाचे सखोल अभ्यासक व भाष्यकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म मुंबईत झाला. गणित विषयात गती नसल्याने मॅट्रिक परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षण सोडले पण त्यांचा संस्कृतचा व मराठीचा मोठा व्यासंग होता. ‘केसरी’चे संपादक न.चिं. केळकर यांचे काही काळ लेखनिक होते. पुण्याच्या भारत सेवक मंडळातील कर्मचारी व ‘दैनिक ज्ञानप्रकाश’चे साहित्य विभागाचे संपादक, नागपूर येथे ‘दैनिक महाराष्ट्रा’त प्रवेश व तेथे साहाय्यक संपादक, पुढे तेथील ‘नर केसरी ट्रस्ट’तर्फे प्रकाशित होणार्‍या ‘तरुण भारत’दैनिकाचे १९४४पासून १९६७पर्यंत प्रमुख संपादक अशा अनेक जबाबदार्‍या संभाळल्या. संस्कृतप्रचुर, प्रौढ व सालंकृत अशी त्यांची भाषा होती. जागतिक व भारतीय राजकारणाचा मोठा व्यासंग  होता. ते काँग्रेसचे व गांधीजींचे कडवे टीकाकार होते. त्यांनी विदर्भातील राजकारणाचे चित्रण कादंबर्‍यांतून केले. १९४८मध्ये महात्मा गांधींचा खून झाल्यावर तरुण भारतच्या कचेरीवर व त्यांच्या घरावर हल्ला झाला त्याचा उल्लेख ‘एका निर्वासिताची कहाणी’ व ‘दोन तपे’ या आत्मचरित्रातही आहे. माडखोलकर यांना साहित्य प्रांतातही आपल्या खळबळजनक विधानांनी वाद निर्माण करण्यात रस होता. केशवसुत, गडकरी, बालकवी व अन्य प्रमुख मराठी लेखकांसंबंधी त्यांनी वेळोवेळी केलेली विधाने गाजली.

     संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे जनक

     १९४६ साली बेळगाव येथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीची कल्पना पहिल्यांदा मांडली व ती सर्वांनी उचलून धरली. तिची परिणती १९६०मध्ये महाराष्ट्राचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात झाली. त्या अर्थाने माडखोलकर हे संयुक्त महाराष्ट्र निर्मिती कल्पनेचे जनक ठरतात.

     प्रारंभी संस्कृत व मराठी कवितालेखन पुण्यातील कवी यशवंत, माधव जूलियन, गिरीश, श्री.बा.रानडे इत्यादींनी स्थापन केलेल्या ‘रविकिरण मंडळां’चे ते एक सदस्य होते. मंडळाच्या ‘उषा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात माडखोलकरांच्या कवितेचा समावेश आहे.

     ‘मुक्तात्मा’ ही पहिली कादंबरी १९३३ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘भंगलेले देऊळ’ (१९३४), ‘शाप’ (१९३६), ‘कांता’ (१९३९), ‘डाक बंगला’ (१९४२), ‘नागकन्या’ (१९४१), ‘मुखवटे’ (१९४०), ‘नवे संसार’ (१९४१), ‘चंदनवाडी’ (१९४३), ‘प्रमद्वरा’(१९४३), ‘अनघा’ (१९५०), ‘रुक्मिणी (१९५९) इत्यादी २० कादंबर्‍यांचे लेखन केले. तत्कालीन कादंबरीकारांपैकी ना.सी.फडके, वि.स.खांडेकर यांच्याबरोबर माडखोलकरांनाही कादंबरीकार म्हणून महत्त्वाचे स्थान आहे. त्यांतील बर्‍याच कादंबर्‍या विदर्भातील काँग्रेस राजकारणाचे चित्रण करणार्‍या व त्यांत गांधीजींवर टीका असल्याने त्या जनतेच्या रोषाला बळी पडल्या. पण मराठीत खर्‍या अर्थाने राजकीय कादंबरी माडखोलकरांनीच लिहिली, असे जवळजवळ सर्व समीक्षकांचे मत आहे. ‘मुक्तात्मा’पासून ‘प्रमद्वरा’पर्यंत त्यांच्या कादंबर्‍यांचा एक कालखंड विविध वैशिष्ट्यांनी गाजला. दुसर्‍या कालखंडातील ‘प्रमद्वरे’नंतरच्या कादंबर्‍या काहीशा फिक्या वाटतात. त्यांच्या ‘डाक बंगला’ व ‘नागकन्या’ या कादंबर्‍यांतील भडक शृंगारामुळे खळबळ उडवली.

     कादंबरीप्रमाणेच त्यांनी अन्य वाङ्मय प्रकारही बर्‍याच यशस्वीपणे हाताळले. ‘रातराणीची फुले’ (१९४०) व ‘शुक्राचे चांदणे’ (१९४८) या दोन कथासंग्रहांत त्यांच्या काही लक्षणीय कथा आहेत. ‘देवयानी’ (१९६४) हे नाटक व काही पौराणिक कादंबर्‍याही त्यांनी लिहिल्या.

     समीक्षक म्हणूनही त्यांनी विपुल लेखन केले. त्यांत ‘आधुनिक कविपंचक’ (१९२१), ‘विष्णू कृष्ण चिपळूणकर’ (१९२३), ‘विलापिका’ (१९२७), ‘स्वविचार’ (१९३८), ‘माझे आवडते कवी’ (१९३९), ‘अवशेष’ (१९४९), ‘जीवन साहित्य’ (१९४३), ‘परमार्थ’ (१९४३) याचबरोबर ‘माझे लेखनगुरू’, ‘महाराष्ट्राचे विचारधन’, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ व ‘श्रद्धांजली’ असे विविध लेखन त्यांनी केले. ‘दोन तपे’ व ‘एका निर्वासिताची कहाणी’, ‘मी आणि माझे साहित्य’, ‘मी आणि माझे वाचक’ ही आत्मचरित्रपर पुस्तकेही त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकतात.

     पत्रकार म्हणून त्यांनी देशात व परदेशांत पुष्कळ प्रवास केला. अमेरिकेच्या व पश्चिम जर्मनीच्या प्रवासामुळे त्यांची प्रवासवर्णने लिहिली गेली. ‘मी पाहिलेली अमेरिका’ (१९६८) ह्या प्रवासवर्णनात प्रवासातील अनुभवांबरोबरच त्यांचे राजकीय व सांस्कृतिक विचारही लक्ष वेधून घेतात.

     माडखोलकर यांनी १९३०च्या व १९४२च्या राष्ट्रीय आंदोलनांत भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. पुणे येथे पत्रकारितेचे धडे घेणार्‍या माडखोलकरांची कर्मभूमी नागपूर ठरली. तिथेच वयाच्या ७७व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

- डॉ. प्रल्हाद वडेर

माडखोलकर, गजानन त्र्यंबक