मालेवार, घनश्याम उरकुडा
पिकांना आवश्यक असलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या सखोल अभ्यासामुळे महाराष्ट्रात डॉ. घनश्याम उरकुडा मालेवार यांचे कार्य सुपरिचित आहे. त्यांचा जन्म भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे झाला व तेथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून १९६१मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी व १९६४ साली कृषि-रसायनशास्त्र विषय घेऊन एम.एस्सी. (कृषी) पदवी प्रथम वर्गात प्राप्त केली. त्यांनी नागपूरच्या कृषी महाविद्यालयात १९६५मध्ये अधिव्याख्याता म्हणून नोकरीस सुरुवात केली. ते १९७०मध्ये परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी-रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले व १९८०मध्ये विभागप्रमुख झाले. ते १९८५पासून परभणी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले व सेवानिवृत्त (१९९९) होईपर्यंत त्या पदावर राहिले. त्यांनी १९९० ते १९९९ दरम्यान लातूर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळला. त्यांच्या सूक्ष्म अन्नद्रव्ये या संशोधनाचा खरा प्रारंभ १९७७मध्ये लुधियानातील पंजाब कृषी विद्यापीठातील पीएच.डी.च्या संशोधनाने झाला. त्यांनी महाराष्ट्रातील खोल काळ्या जमिनींचा विशेष अभ्यास करून व १५००० मातीच्या नमुन्यांचे रासायनिक परीक्षण करून सूक्ष्म अन्नद्रव्ये कमतरतेचा नकाशा तयार केला. त्यांनी पिकांना लागणार्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे जमिनीतील/पिकातील किमान प्रमाण अभ्यासून सूक्ष्म अन्नद्रव्ये वापर तंत्रज्ञानाच्या सुमारे २० शिफारशी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केल्या. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे फलोत्पादनातील व्यवस्थापन, पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जीवरासायनिक संबंध, सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीतील/पिकातील आंतरक्रिया इ. विषयांवर त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी एकूण ४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर मार्गदर्शन केले, यांपैकी ११ पीएच.डी. पदवीचे विद्यार्थी होते. त्यांचे एकूण १२६ संशोधन निबंध प्रसिद्ध झाले व त्यात चोपण जमिनीची सुधारणा, स्फुरदाचे व्यवस्थापन, तेलवर्गीय पिकांसाठी गंधकाची उपयोगिता, औष्णिक विद्युत केंद्रातील टाकाऊ राखेचा उपयोग इ. विषयांचा समावेश आहे. ते भारतीय मृदाशास्त्र संस्थेचे उपाध्यक्ष व फेलो होते. त्यांना अशा अन्य संस्थांचेही सभासदत्व व पुरस्कार मिळाले. त्यांच्या सूक्ष्म अन्नद्रव्य या निबंधास कै. उषा झेंडे पारितोषिक मिळाले, तसेच भारत कृषक समाजातर्फे कृषिगौरव पुरस्कार (२०००-०१), एकता गौरव पुरस्कार (२००१), ‘बळीराजा’ मासिकातर्फे उत्कृष्ट लेखक पुरस्कार, डॉ. एस.एस. रानडे पुरस्कार मिळाला आहे. निवृत्तीनंतरही ते खासगी संस्थांच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत होते.