मारुलकर, अलका प्रमोद
अलका प्रमोद मारुलकरांचा जन्म सोलापूर येथे झाला. त्यांचे वडील म्हणजे प्रसिद्ध गायक व गुरू पं. राजाभाऊ देव हे होत. राजाभाऊ देव यांना जगन्नाथबुवा पंढरपूरकर, राजाभैया पूछवाले, रजबअली खाँ व बी.आर. देवधर यांच्याकडून तालीम मिळाली होती. त्यामुळे आपले वडील राजाभाऊ देव यांच्याकडे संगीत शिकताना अलका देव यांनी ग्वाल्हेर, किराणा, जयपूर या घराण्यांची सौंदर्यमूल्ये आत्मसात केली. तसेच गिरीजादेवी यांच्याकडून त्या ठुमरी-दादरा शैलीही शिकल्या.
लग्नानंतर पुण्यातील वास्तव्यात पं.मधुसूदन कानेटकर यांच्याकडेही त्यांनी जयपूर घराण्याचे प्रगत अध्ययन केले. वडिलांच्या नोकरीतील भ्रमंतीमुळे त्यांचे शिक्षण नागपूर, रांची, बनारस व वनस्थली (राजस्थान) येथे झाल्यामुळे त्यांनी तेथील भाषांबरोबर ठुमरी, दादरा, होरी, कजरी, राजस्थानी मांड वगैरे उपशास्त्रीय गायन प्रकारांवरही प्रभुत्व मिळवले.
वयाच्या अगदी दहाव्या वर्षापासून सर्व महत्त्वाच्या संमेलनांतून त्यांचे कार्यक्रम झाले. आकाशवाणीच्या ‘अ’श्रेणीच्या कलाकार असलेल्या अलका मारुलकर यांनी देश व विदेशांतही गायनानिमित्त दौरे केले, संगीतसभा गाजवल्या.
अलका मारुलकर यांनी इंग्रजी वाङ्मयात एम.ए.ची पदवी प्राप्त केली. महर्षी अरविंदांच्या ‘सावित्री’ या महाकाव्याचा त्यांनी अभ्यास केला. ‘कोरिलेशन ऑफ द बंदिश इज विथ द रागाज अॅण्ड स्कोप फॉर द नवरसाज इन द बंदिशीज’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पीएच.डी. मिळवली.
त्यांनी ‘प्रेमांजली ’, ‘कबीर’, ‘मधुघट’, ‘आजि आनंद आनंद’, ‘सूरदास’, ‘तीरथ’ यांसारखे कार्यक्रम केले. त्यांनी जोगेश्री, आनंदकल्याण, पंचमगौरी इ. रागांची निर्मिती केली व अनेक रागांतील नवीन बंदिशी तयार केल्या. मारुलकरांचे परिपूर्ण आलाप, बोल-आलाप व ताना यांना लययुक्त पद्धतीने जोडणारे बेहेलावे, वैशिष्ट्यपूर्ण रचनात्मक ताना यांमधून किंवा स्वरांच्या विणकामातून, तर कधी रागाच्या स्वरसमूहाच्या विस्तारातून त्यांच्या गायनाचे सर्वांगसुंदर दर्शन घडते.
गोव्याच्या कला अकादमीच्या संगीत विभागप्रमुख असतानाही आणि नंतर निवृत्त झाल्यावर अनेक शिष्यांना सखोल तालीम देताना रागाच्या अंतरंगात खोलवर जाण्याची क्षमता निर्माण व्हावी, स्वत:सारखा नवनिर्मितीचा, प्रयोगशीलतेचा ध्यास त्यांनाही लागावा, असा त्यांचा आग्रह असतो. ट्रिनिटी क्लब, मुंबई यांनी ‘संगीतकौमुदी’, तर गायनाचार्य भास्करबुवा बखले स्मृती संगीत समारोह, चंडिगढ येथे ‘गानसरस्वती’ या किताबांनी त्यांना गौरवण्यात आले. त्यांनी २००२ ते २००७ या कालावधीत पणजी,गोवा इथल्या भारतीय संगीत आणि नृत्य कला अकादमीचे डायरेक्टरपद भूषवले.