Skip to main content
x

नाडकर्णी, ज्ञानेश्वर गणपत

तुकाराम शेंगदाणे

    ला क्षेत्रातील मौलिक समीक्षेबद्दलचा सन्मान म्हणून फ्रेंच सरकारतर्फे ‘कला-साहित्य क्षेत्राचा शिलेदार’ ही पदवी मिळवणारे ज्ञानेश्वर नाडकर्णी साहित्याचे आणि कलांचे जाणकार समीक्षक म्हणून मराठी साहित्यात प्रसिद्ध आहेत.

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचा जन्म जोगेश्वरी, मुंबई येथे झाला. प्राथमिक शिक्षण सर नारायण चंदावरकर शाळा, माध्यमिक शिक्षण राम मनोहर व चिकित्सक समूह या शाळांतून झाले. एलफिन्स्टन आणि विल्सन महाविद्यालयात एम.ए.पर्यंतचे (इंग्रजी) शिक्षण. लेखनाची आवड शाळेपासून. १९४९ पासून ‘मौज’ साप्ताहिक आणि ‘सत्यकथा’ यांतून स्फुटलेखन, ‘तुकाराम शेंगदाणे’ या टोपण नावाने.

१९५१ ते १९५३ या काळात भारतीय हाय कमिशनरच्या परराष्ट्र खात्यात नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये वास्तव्य. काही वर्षे शिल्पी या जाहिरात संस्थेत आणि फ्री प्रेस जर्नल, फिनान्शिअल एक्सप्रेस यांमध्ये सहसंपादक म्हणून काम पाहिले.

ज्ञानेश्वर नाडकर्णींचे नाव मराठी साहित्यात प्रामुख्याने घेतले जाते, ते त्यांच्या चोखंदळ आणि मार्मिक अशा साहित्य आणि नाट्य, चित्रपट आणि चित्रकला या क्षेत्रांतल्या समीक्षेसाठी. ‘मराठी नाटक आणि रंगभूमी’ (१९६३), ‘भारतीय चित्रपट सृष्टीतले नवे प्रवाह’ (१९७४), ‘पिकासो’ (१९८६), ‘हिचकॉक’ (१९९०), ‘अश्वत्थाची सळसळ’ (१९८८), ‘प्रतिभेच्या पाऊलवाटा’ (२००३) अशा पुस्तकांतून त्यांनी भारतीय आणि पाश्‍चात्त्य साहित्य, रंगभूमी, चित्रपट आणि चित्रकला ह्या क्षेत्रांतल्या नामवंतांचा आणि त्यांच्या कलांचा समर्पक परिचय देऊन त्यांच्या कलेची सखोल समीक्षा करून समीक्षा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.

त्याचबरोबर ‘Balgandharva and the Marathi Theater’ आणि  ‘Gaitonde’ ही दोन समीक्षात्मक पुस्तके  इंग्लिशमध्ये लिहिली आहेत.

‘दोन बहिणी’ (१९५६), ‘कोंडी’ (१९५८), ‘चरित्र’ (१९८९), ‘नजरबंद’ (१९९१), ‘वलयांकित’ (१९९६) या त्यांच्या कादंबर्‍या आणि ‘चिद्घोष’ (१९६६), ‘प्रस्थान’ (१९८८) हे काही कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. 

परदेश वास्तव्यातील वेगळे आणि समृद्ध अनुभव, तिथल्या कलाक्षेत्रातली सूक्ष्म निरीक्षणे, पारशी, ख्रिस्ती अशा वेगळ्या समाजांतील उच्चभ्रू वर्गाच्या बहुरंगी जीवनाची जवळून ओळख, त्या जगातल्या अनुभवांवर आधारित कथा व कादंबरी लेखन हे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे, वाचकांचे कुतूहल वाढवणारे आहे. ललित लेखन करण्याची क्षमता असूनही नाडकर्णींचा ओढा समीक्षेकडे अधिक असल्याचे जाणवते.

फ्रेंच सरकारच्या पदवी व्यतिरिक्त नाडकर्णींना संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती, मराठी नाट्यपरिषदेचे वि.स.खांडेकर पारितोषिक, ‘चिद्घोष’- (कथा) ललित पारितोषिक, ‘प्रस्थान’- (कथा) केशवराव कोठावळे पारितोषिक, ललितकला अकादमी आणि फिल्म सेन्सार बोर्डाचे सदस्यत्व; असे बरेच सन्मान आणि पुरस्कार लाभले आहेत.

ज्ञानेश्वर नाडकर्णी हा कलासमीक्षेच्या क्षेत्रातला परवलीचा शब्द ठरला आहे.

- मंदाकिनी भारद्वाज

नाडकर्णी, ज्ञानेश्वर गणपत