Skip to main content
x

नायकवडी, नागनाथ रामचंद्र

नागनाथ रामचंद्र नायकवडी यांचा जन्म वाळवा येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे सातवीपर्यंतचे शिक्षण वाळवा येथे झाले; तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण सांगली व कोल्हापूरमध्ये झाले. त्यांनी 1940 पासून स्थानिक पातळीवर सामाजिक कार्याला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी वसतिगृह उभारणी, प्राथमिक शाळांची सुरुवात करणे, कामेरी युवक विद्यार्थी परिषद संघटित करणे, या प्रकारची कामे केली. त्यावेळेस त्यांनी सेवादलातही भाग घेतला.

नायकवडी यांनी 1942 मध्ये शिक्षणाला रामराम ठोकून ‘चले जाव’ आंदोलनात भाग घेतला व त्यानंतर त्यांनी सशस्त्र क्रांतीची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यासाठी आवश्यक असणारे लष्करी शिक्षण त्यांनी स्वत: घेतले व इतरांनाही दिले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नायकवडी यांनी बहुजन समाजाच्या कार्याला वाहून घेतले. बहुजन समाजाला शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांनी सहकारी हुतात्मा किसन अहिर यांच्या नावाने शाळा काढली. त्यांनी शेतकरी कामगारांची संघटना उभारली. तसेच त्यांनी सहकारी साखर कारखान्यासाठी मंजुरी मिळवली आणि हुतात्मा किसनराव अहिर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. या साखर कारखान्याने देशात साखर उतारा व तांत्रिक कार्यक्षमतेत उच्चांक गाठून साखर कारखानदारीत आदर्श निर्माण केले. या कारखान्यामुळे सामाजिक चळवळीला गती मिळाली.

नायकवडी यांनी वारणा धरणग्रस्त संग्राम संघटना, कोयना धरणग्रस्त संग्राम संघटना स्थापन करून या धरणामुळे बाधित झालेल्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन करायला सरकारला भाग पाडले. तसेच त्यांनी साखर कामगारांचा प्रश्न सोडवला. त्यांनी कामगारांना वेतन आयोगाप्रमाणे लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. त्यांनी शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. त्यांनी आटपाडी पाणी परिषदेची स्थापना केली. दुष्काळग्रस्त 13 तालुक्यांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी पाणी संघर्ष चळवळ उभारली. त्यांनी भूकंपग्रस्त 100 मुलांची दत्तक-पालक योजना ही राबवली.

नायकवडी 1957 ते 1962 या काळात संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे आमदार म्हणून निवडून आले. तसेच गोवा-मुक्तीसंग्रामातही ते सहभागी होते. भूमिहीन शेतमजूर चळवळीत त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग होता. त्यांनी रस्त्यासाठी साराबंदीची उग्र चळवळ केली व नागठाणे बंधार्‍याची बांधणी करण्याचाही निर्णय घेतला.

नायकवडी 1985 मध्ये पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी ऐतवडे या गावी 25 हजार शेतमजुरांची परिषद घेतली. तसेच वाळवा या आपल्या जन्मगावी महिला परिषद भरवली. बेनापूर कुची या प्रदेशात दुष्काळी जनावरांविषयीची शिबिरे घेतली. त्यांनी दलित-आदिवासी व ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजनही केले. तसेच, वाळवा व निफाड येथील साखर कामगार परिषदांचे संघटन केले. त्यांनी ‘अमर हुतात्मा’ या साप्ताहिकाची सुरुवातही केली.

नायकवाडी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना राजर्षी शाहू महाराज समाज विकास संस्थेतर्फे 1998 मध्ये राजर्षी शाहू महाराज समता पुरस्कार देण्यात आला. नायकवडी यांनी केलेल्या कामाचा गौरव करण्यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तो पुरस्कार त्यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. त्यांना 1999 मध्ये पुसेगाव येथील महात्मा फुले प्रतिष्ठानच्या वतीने फुले-आंबेडकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच नारायण मेघाजी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा पहिला समाजवैभव पुरस्कार देऊन 2001 मध्ये नायकवडी यांचा सन्मान केला.

- संपादित

नायकवडी, नागनाथ रामचंद्र