Skip to main content
x

निंबकर, चंदा बनबिहारी

        चंदा बनबिहारी निंबकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील फलटण येथे झाला. त्यांचे वडील बनबिहारी हे प्रथितयश कृषितज्ज्ञ होत . त्यांच्या आईचे नाव जाई असून त्या दर्जेदार लेखिका होत्या. चंदा निंबकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फलटण येथेच झाले. त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बी.कॉम. पदवी सुवर्णपदाकासह प्राप्त केली. अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेऊन एम.ए.ची पदवी संपादन केली. दरम्यानच्या काळात त्यांचे वडील शेळ्या व मेंढ्या यांच्या भारतातील उपलब्ध जातींची उत्पादन क्षमता वाढवण्याबाबत विचार करत होते. यासाठी त्यांनी ब्रिटिश काऊन्सिलच्या माध्यमातून स्कॉटलंड येथील सुप्रसिद्ध अनुवंशशास्त्रज्ञ डॉ. जेरॉल्ड विनर यांना भारतात बोलावले होते. डॉ. विनर यांनी येथील उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून शास्त्रीय दृष्टिकोनातून उत्पादकता वाढीचा आराखडा तयार करून दिला. चंदा निंबकर यांचा त्यांच्याशी परिचय झाला. डॉ. विनर यांनी तयार केलेल्या आरखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी चंदा निंबकर यांनाच स्कॉटलंड येथील एडिंबरा विद्यापीठात एम.एस्सी. (पशुपैदास) या एका वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी पाठवण्याचे ठरले आणि चंदा निंबकर यांनी १९८९-९० या काळात परिश्रमपूर्वक अभ्यास करून विशेष प्रावीण्यासह ती पदवी प्राप्त केली. चंदा निंबकर यांनी भारतात परतल्यावर १९९० पासून निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या पशु-संवर्धन विभागात कामाला सुरुवात केली. त्यांना मेंढीच्या जातीचा शोध घेत असता पश्‍चिम बंगालमधील सुंदरबन भागातील ‘गरोला’ ही मेंढीची जात सापडली. त्यांनी गरोल मेंढ्यांचा कळप फलटण येथे आणून त्यांची पैदास व संवर्धन सुरू केले. त्यांनी १९९८पासून १० वर्षे सातत्याने संशोधन करून जुळी कोकरे देणाऱ्या ‘नारी सुवर्णा’ या वाणाची निर्मिती केली. या प्रकल्पासाठी पुणे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, तसेच ऑस्ट्रेलियातील विद्यापीठाचे सहकार्य घेण्यात आले. या मूलभूत संशोधनाचे नेतृत्व डॉ. चंदा निंबकर यांच्याकडे होते. त्यांनी या प्रकल्पास ऑस्ट्रेलियाकडून आर्थिक सहकार्य मिळवले. ‘नारी सुवर्णा’ या जुळी कोकरे देणाऱ्या मेंढ्यांच्या वाणाची निपज केवळ संस्थेच्या प्रक्षेत्रावरच न होता परिसरातील मेषपालकांच्या अनेक कळपांमध्ये होऊ लागली. या संशोधन प्रकल्पाला केंद्र सरकारच्या वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद यांच्याकडून पुरस्कार देण्यात आला. या संशोधनाचे काम पुढेही चालू राहावे यासाठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या आर्थिक साहाय्यातून जनुकीय तपासणी करण्याच्या उद्देशाने अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी झाली आहे. जुळी कोकरे देणाऱ्या मेंढ्यांच्या वाणासंबंधात पुणे येथे २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदही भरवली. डॉ. चंदा यांनी ‘जेनेटिक इंप्रूव्हमेंट ऑफ लँब प्रॉडक्शन एफिशिएन्सी इन इंडियन डेक्कनी शीप’ या विषयावरील शोधनिबंध सादर करून न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी मिळवली. डॉ. चंदा निंबकर यांनी फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेळ्यांच्या उत्पादकतेत सुधारणा, फलटण येथे शेळ्या-मेंढ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रात्यक्षिक केंद्राची स्थापना, भारतात प्रथमच उच्च उत्पादन क्षमतेच्या बोअर जातीच्या शेळ्यांचे गोठित भ्रूण व रेतमात्रा आयात करून बोअर शेळ्यांचे प्रजनन व संवर्धन, शेतकऱ्यांकडील स्थानिक जातीच्या शेळ्यांचे बोअर जातीच्या नराबरोबर संकर करून सुधारित संकरित बोअर शेळ्यांचे उत्पादन वाढवले. उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांच्या मायभूमीत शेतकऱ्यांकडील उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांची निवड पद्धतीने पैदास व विकास हे प्रकल्पही उत्तम रीतीने राबवले. त्या कृषी संशोधन संस्थेच्या पशु-संवर्धन विभाग आणि महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थांच्या विश्‍वस्त व संचालिका आहेत. त्यांचे पशू अनुवंशशास्त्रातील सखोल ज्ञान, अनुभव आणि मूलभूत कार्य यांची नोंद महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाने घेतली आहे.

        चंदा निंबकर यांना शेळी मेंढी राज्याचे पैदास धोरण ठरवणे, पंचवार्षिक योजनांमध्ये राज्यातील शेळ्या-मेंढ्यांच्या विकासाची दिशा निश्‍चित करणे, या विषयाच्या सल्लागार समितीत सदस्य म्हणून बोलावले जाते.  देशातील शेळ्या, मेंढ्या व ससे यांचे पैदास धोरण ठरवण्याबाबतची केंद्र सरकार सल्लागार समिती, भारतीय योजना आयोगांतर्गत दहाव्या पंचवार्षिक योजनेत ‘रवंथ करणाऱ्या लहान जनावरांचा विकास’ या विषयाची उपसमितीच्या देशातील अन्न सुरक्षेबाबत धोरण ठरवण्यासाठी केंद्र शासनाने गठित केलेला राष्ट्रीय आयोगावर सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. डॉ. चंदा निंबकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदांमध्ये प्रबंध सादर केलेले आहेत. जागतिक स्तरावरील अन्न व कृषी संघटना, जागतिक अनुवंशशास्त्र परिषद इ. संस्थांनी त्यांना अनेक प्रकल्पांमध्ये सल्लागार सदस्य म्हणून आमंत्रित केलेले आहे.

- डॉ. वसंत नारायण जहागीरदार

निंबकर, चंदा बनबिहारी