Skip to main content
x

नवरे, मुकुंद लक्ष्मण

            दुग्ध व्यवसाय विकासासाठी कार्यरत राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळ, महाराष्ट्र दूध महासंघ आणि भारतीय कृषिउद्योग प्रतिष्ठान या सर्व संस्थांच्या कामकाजात डॉ. मुकुंद लक्ष्मण नवरे यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुधा असून त्या शालेय शिक्षिका होत्या आणि वडील नागपूर येथील कृषी महाविद्यालयात व्याख्याता होते.

            मुकुंद नवरे यांचे बी.व्ही.एस्सी. अ‍ॅण्ड ए.एच.चे शिक्षण नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात १९६९ मध्ये पार पडले. पशुवैद्यकीय पदवी प्राप्त करून त्यांनी उरळीकांचन  येथील भारतीय कृषिउद्योग प्रतिष्ठान या संस्थेत प्रवेश केला. प्रतिष्ठानने दुग्धोत्पादन वाढीसाठी संकरित गो-पैदास हा कार्यक्रम हाती घेतला होता. परदेशी सिद्ध वळूंच्या वीर्यमात्रा मिळवण्यासाठी तेथे अद्ययावत वळू संगोपन आणि वीर्यमात्रानिर्मिती केंद्र उभारण्यात आले होते. त्यांनी या केंद्रात वीर्यसंकलन, वीर्यमात्रा आणि कृत्रिम रेतन पद्धती याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले.

            राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाच्या वतीने ‘दुधाचा महापूर’ ही योजना प्रथम गुजरात राज्यात १९७१ साली राबवण्यास सुरुवात झाली होती. गाव पातळीवर सहकारी दूध सोसायटी, जिल्हा पातळीवर युनियन आणि राज्य पातळीवर महासंघ या त्रिस्तरीय संघटनात्मक ढाच्यावर ही योजना कार्यान्वित करण्यात येत होती. या योजनेचे यश पाहता महाराष्ट्रात ही योजना प्रथम १९७३मध्ये जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली. सर्वस्वी सहकारी तत्त्वावर ही योजना अवलंबून असल्याने खेडोपाडी सहकारी दूध संघ स्थापन करणे, स्थानिक दूध दलालांशी स्पर्धा करत दूध उत्पादकाला सहकारी सोसायटीलाच दूध विकण्यास उद्युक्त करणे, सोसायटीच्या सभासदांना पशु-वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे या बाबी कटाक्षाने पार पाडणार्‍या कार्यकर्त्यांवरच ‘दुधाचा महापूर’ या योजनेचे यश अवलंबून होते.  डॉ. नवरे यांनी राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाच्या जळगाव जिल्ह्यात कार्यरत चमूचे यशस्वी नेतृत्व केले. याअंतर्गत त्यांनी जिल्ह्यात २५० प्राथमिक दूध संस्थांचे संघटन केले. त्यांनी शेकडो सभा-बैठकी घेऊन दुग्ध व्यावसायिक सभासदांना दुग्ध व्यवसायातील सहकाराचे महत्त्व, डॉ. कुरियन यांच्या ‘आणंद पॅटर्न’ची संकल्पना, सहकारी दूध सोसायट्यांसाठी राष्ट्रीय दुग्धविकास बोर्डाकडून प्राप्त सेवासुविधा याविषयी सविस्तर प्रबोधन करून ‘दूध महापूर’ ही योजना जनमानसात खोलवर रुजवली. परिणामी योजनेच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच पाच वर्षांनंतर ज्या जळगाव संघाने रोज एक लाख लीटर दूध गोळा करून त्यावर प्रक्रिया करून ते वितरित करण्याचे योजले होते, तो संघ स्थापनेच्या तिसऱ्या वर्षातच रोज ९० हजार लीटर दूध संकलित करू लागला. पुढे काही काळातच जळगाव जिल्हा दूध संघ हा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाचा दूध संघ ठरला.

            दूध संघाची उभारणी आणि त्याची यशस्विता या बाबी लक्षात घेऊन राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाने १९७७ मध्ये ‘दूध महापूर-१’ योजना आंध्र प्रदेशातील गुंटूर आणि पंजाबमधील भटिंडा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यासाठी डॉ. नवरे यांच्याच नेतृत्वाखाली आपला अभ्यासगट पाठवला. दुग्ध व्यवसायवाढीसाठी यापुढेही जाऊन १९७८-१९८६ या दरम्यान राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाच्या विभागीय कार्यालयाने ‘दूध महापूर-२’ ही योजना कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि पाँडेचेरी राज्यांतील ४५ जिल्ह्यांत कार्यान्वित करण्याचे ठरवले, तेव्हाही डॉ. मुकुंद नवरे यांचेच नेतृत्व मंडळाच्या कामी आले. यापूर्वी या सर्व राज्यांत शासकीय दूध योजना सुरू होत्या. या योजनांचे ‘आणंद पॅटर्न’खाली सहकारीकरण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा आणि समन्वय करण्यासाठी डॉ.नवरे यांच्या अनुभवाचा लाभ मंडळाने  घेऊन ‘दूध महापूर २’ ही योजना यशस्वीपणे या राज्यात सुरू करून राज्यस्तरीय महासंघांची स्थापना केली. आज गुजरातनंतर दुग्धोत्पादनात कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांचाच क्रमांक लागतो हे लक्षात घेता डॉ. नवरे यांच्या सुरुवातीच्या श्रमाचे महत्त्व ध्यानात येते. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय स्तरावरील दुग्ध व्यवसायास चालना देण्यासाठी मंडळाने डॉ. नवरे यांची निवड करावी यातच त्यांच्या कर्तृत्वाची पावती मिळते. वास्तविक राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळ पुरस्कृत ‘आणंद पॅटर्न’ आणि ‘दूध महापूर’ या योजना कार्यान्वित होऊन (१९७१-७२) ‘दुग्ध व्यवसायात सहकार’ ही संकल्पना साकार होण्याच्या कितीतरी अगोदर म्हणजे जून १९६७ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाची स्थापना झाली होती. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अखिल भारतीय स्तरावर सहकाराची कल्पना अशा तर्‍हेने महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाने प्रथम प्रत्यक्षात आणली. ‘आणंद पॅटर्न’ खऱ्या अर्थाने या महासंघाने स्वीकारला नसल्याने १ मे १९८१ पर्यंत राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाच्या दूध महापूर-१ च्या योजना दुर्दैवाने महाराष्ट्रात कार्यान्वित झाल्या नाहीत. मात्र यानंतर दूध महासंघाने दुग्ध व्यवसाय विकास मंडळाबरोबर करार करून ‘दूध महापूर-२’च्या योजना स्वीकारून अमलात आणल्या.

            डॉ.नवरे यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या या पुनरुज्जीवनाच्या काळात व्यवस्थापक (कृषक संघटन आणि पशु-संवर्धन) म्हणून १९८६ मध्ये महासंघात प्रवेश केला. मधल्या काळात आलेल्या मरगळीतून महासंघाला बाहेर काढण्याचे प्रचंड मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. दूध संकलनवाढीबरोबरच सभासद संस्थांची संख्या वाढवणे, वैयक्तिक दुग्ध व्यावसायिकांच्या गोठ्यातील जनावरांची उत्पादकता वाढवणे, उत्पादकता वाढीसाठी आवश्यक वैरण विकास, खाद्यमिश्रणे, कृत्रिम रेतन आणि पशुवैद्यकीय सेवा यांच्या पुरवठ्यात सातत्य राखणे, महासंघाच्या दुग्धप्रक्रिया केंद्राचा परिपूर्ण वापर करणे, ऊर्जा वापरावर योग्य नियंत्रण ठेवणे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या सर्व बाबी सांभाळत दूध खरेदी-विक्री दरात योग्य समतोल राखणे या सर्व आघाड्यांवर लढणे आवश्यक होते. आपल्या १६-१७ वर्षांच्या या क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर डॉ.नवरे या सर्व आघाड्यांवर यशस्वी ठरले. जिल्हास्तरीय दूध उत्पादक सहकारी संघांना दूध महापूर २ आणि ३ योजनेबाबत मार्गदर्शन, संघांच्या पशु-संवर्धनविषयक योजनांना चालना आणि बळकटी देण्यासाठी महासंघ पातळीवरून मदत, कृत्रिम रेतन कार्यक्रमास उत्तेजन, चारावाढीसाठी मका बीजगुणनद्वारा डॉ. मुकुंद नवरे यांनी उत्पादनवाढीसाठी चालना दिली.

            याहीपेक्षा सर्वांत महत्त्वाचे म्हणजे दुग्ध व्यावसायिकांच्या प्रबोधनाचे काम त्यांनी हाती घेतले. कोणत्याही व्यवसायात यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते हे लक्षात घेऊन जिल्हा दूध संघांना दुग्ध व्यावसायिकांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्यास उद्युक्त केले आणि या प्रशिक्षणाची आर्थिक बाजू राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळ सांभाळेल अशी व्यवस्था केली. दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील नवी नवी तंत्रज्ञाने दूध उत्पादकांकडे पोहोचवण्यासाठी त्यांनी महासंघातर्फे ‘गोकुळ विकास पंढरी’ या नावाचे परिपत्र सुरू केले. नामवंतांचे लेख आणि दुग्ध व्यवसायासंबंधी अद्ययावत माहिती देणारे हे परिपत्र म्हणजे केवळ दुग्ध व्यवसायवाढीसाठी प्रसिद्ध होणारे पहिलेच नियतकालिक ठरले. डॉ. नवरे यांनी ७५ मासिक अंक प्रसिद्ध होईपर्यंत या नियतकालिकाच्या संपादकत्वाची धुरा सांभाळली. त्यांच्या प्रयत्नातून दूध महासंघाचे पुनरुज्जीवन होण्यास मदत तर झालीच, शिवाय १९८६-८७, १९९२-९३, १९९३-९४, १९९४-९५ या कार्यकालात राष्ट्रीय स्तरावर दूध महासंघाला ‘बेस्ट प्रॉडक्टिव्हीटी’, ‘बेस्ट एनर्जी प्रॉडक्टिव्हिटी,’ ‘सर्टिफिकेट ऑफ मेरिट’ इत्यादी पारितोषिकांनी गौरवण्यात आले. आज प्रगतिपथावर वाटचाल करत आर्थिक नफ्याकडे आगेकूच करणारा महासंघ (वार्षिक रु. २० कोटी) हे डॉ.नवरे यांच्या कष्टाचे फळ आहे. जागतिकीकरण आणि खुल्या व्यापार धोरणानंतर केवळ शासकीय आणि सहकार क्षेत्राच्या अखत्यारीत असलेला दुग्ध व्यवसाय काही प्रमाणात खासगी उद्योजक , सहकारी दुग्ध व्यवसाय कंपन्या यांच्याकडे जाणे अपरिहार्य होते. त्यातूनच पुणे जिल्ह्यातील बारामती विभागात ‘डायनामिक्स दूध कंपनी’ची नव्वदीच्या सुरुवातीस स्थापना झाली. केवळ निर्यातक्षम दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या या सहकारी कंपनीने डॉ.नवरे यांची महाव्यवस्थापक (दूध संकलन आणि विस्तार सेवा) या पदावर १९९४-९७ या काळात नेमणूक करून आपल्या यशस्वितेचा पाया घातला. निर्यातक्षम विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘स्वच्छ दूधनिर्मिती’ आवश्यक होती. शासकीय वा सहकारी दुग्ध व्यवसायात तोवर ‘स्वच्छ दूध’ ही संकल्पनाच नव्हती.

            पारंपरिक दुग्ध व्यावसायिकांच्या गळी ही संकल्पना उतरवणे ‘डायनामिक्स’च्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होते. डॉ.नवरे यांनी चीज आणि दूध उत्पादन करण्याचे धडे प्रात्यक्षिकासह दुग्धोत्पादक पुरुष व महिला, इतकेच नव्हे तर शालेय विद्यार्थ्यांमार्फत खेडोपाडी पोहोचवले. ‘स्वच्छ दूधनिर्मिती’ ही संकल्पना आता सर्वमान्य झाली असून आपल्या विस्तार सेवेमार्फत तिचा प्रसार आणि प्रचार करणारे डॉ.नवरे हे पहिले पशुवैद्य ठरले आहेत. डॉ.नवरे हे मराठी भाषेतील उत्तम कथाकारही आहेत. कथालेखन स्पर्धांतून पारितोषिके मिळवणाऱ्या नवरे यांचा ‘अकल्पित कथा’ हा कथासंग्रह प्रकाशित आहे.

            - डॉ. रामनाथ सडेकर

नवरे, मुकुंद लक्ष्मण