पाटील, वसंत बंडूजी
वसंतदादा पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील पद्माळे या गावातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आई-वडिलांचा 1918 मध्ये प्लेगच्या साथीत एकाच दिवशी मृत्यू झाला. त्या वेळी ते एक वर्षाचे होते. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा सांभाळ आजीने केला. त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही, परंतु सामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याला सुरुवात केली. त्यांनी गावचे रस्ते, पाणीपुरवठा योजना, शेतीचा कायापालट, शाळा व सांस्कृतिक विकास या गोष्टी आपल्या गावापासूनच विशिष्ट ध्येयवादाने सुरू केल्या.
ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी कृषी औद्योगिक क्रांतीची आवश्यकता आहे, हे पाटील यांनी ओळखले. त्यांनी सर्वसामान्य जनतेचे आर्थिक व सामाजिक प्रश्न समजावून घेतले. शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविण्याकरता त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रयत्न केले. त्यांनी सांगली जिल्ह्याचा आर्थिक विकास साधण्यासाठी प्रथमच विविध योजना आखून त्या प्रयत्नपूर्वक कार्यान्वित केल्या.
शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी जिराईत शेती ओलिताखाली आणण्यासाठी पाटील यांनी जलसिंचन योजना आखल्या व त्याचे शेतकर्यांना महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी ऊस, द्राक्षे यांसारखी नवीन पिके घेण्यासाठी शेतकर्यांना प्रवृत्त केले. शेतीला पूरक उद्योग म्हणून त्यांनी कुक्कुटपालन, शेळ्या-मेंढ्यापालन, दुग्ध व्यवसाय यांसारख्या योजनाही राबवण्याचा प्रयत्न केला. खत कारखाने, सूतगिरण्या, तेलगिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यामध्ये सहकारी तत्त्वावर निर्माण करण्यातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्या अनुषंगाने शेतकर्यांचा आर्थिक विकास होण्यास हातभार लागला.
पाटील यांनी 1956-1957 मध्ये शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. सहकारी साखर कारखान्यांनी ऊ साचे पीक घेऊन साखरेचे उत्पादन घ्यावे, असे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा यांचा विकास करण्यासाठी निधी उभारण्याची अभिनव संकल्पनाही त्यांनी रुजवली. त्यांनी डेक्कन साखर कारखान्याची स्थापना केली व संशोधनाला चालना दिली.
पाटील यांनी शेतीला विज्ञानाची जोड देऊन उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. या सर्व योजना त्यांनी सहकारी चळवळीच्या मार्फत राबविल्या जाव्यात म्हणून सांगली जिल्ह्यात व महाराष्ट्रात शेतकर्यांच्या सहकारी संस्थांचे जाळे विणले. सांगली जिल्ह्यात शेतकर्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा म्हणून शेतकरी तेलगिरणी निर्माण केली. औद्योगिक संस्थांच्या उभारणीतही त्यांचे मोठे योगदान आहे. तसेच बाजारपेठेची स्थापना करून ती संस्था महाराष्ट्रात एक आदर्श संस्था म्हणून चालवून दाखविण्यात ते यशस्वी झाले.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात निर्माण झालेले सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या व शेती मालावर प्रक्रिया करणार्या सहकारी संस्था, पतसंस्था, सहकारी बँका यांचे पाटील हेच आधारस्तंभ होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ, साखर निर्यात महामंडळ, राज्यातील अनेक सहकारी संस्थांचेही ते आधारस्तंभ होते. त्यांनी राष्ट्रीय मित्र मजदूर संघ यांसारख्या संस्थांच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली.
पाटील 1952 मध्ये पहिल्या विधानसभा निवडणुकीत सांगलीचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सुमारे 25 वर्षे त्यांनी विधानसभेत व लोकसभेत सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. ते 1972 मध्ये पहिल्यादांच मंत्री झाले. ते 1977 ते 1985 या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी 1983 मध्ये वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. सहकार क्षेत्रातील अद्वितीय कामगिरीमुळे वसंतदादा पाटील यांना 1967 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.