Skip to main content
x

पंत, आदिती

    भारताच्या दोन अंटार्क्टिक मोहिमांमध्ये सहभाग असलेल्या आणि आघाडीच्या सागरी विज्ञान संशोधक असलेल्या आदिती पंत यांचा जन्म नागपूरला झाला. साताऱ्याजवळील औंध संस्थानाचे अधिपती श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी हे त्यांचे आजोबा. आदिती पंत यांचे वडील बॅ. आप्पासाहेब पंत मुत्सद्दी होते. भारताचे राजदूत म्हणून अनेक देशांमध्ये त्यांनी कार्य आणि वास्तव्य केले होते. साहजिकच आदिती पंत यांना विविध ठिकाणी जाऊन शिक्षण पूर्ण करावे लागले. सुरुवातीला त्यांचे शालेय शिक्षण गोवन पब्लिक स्कूल, नैरोबी (केनिया) येथे झाले. त्यानंतर दिल्ली पब्लिक स्कूल आणि लोरेटो कॉन्व्हेंट स्कूल (दार्जिलिंग) येथे त्यांनी माध्यमिक शालेय शिक्षण पूर्ण केले. सीनियर केंब्रिज ही शालान्त परीक्षा त्यांनी १९५९ साली आंध्रप्रदेशमधील ऋषी व्हॅली स्कूलमधून दिली. नॉर्थ पॉइंट कॉलेज (कलकत्ता) मधून त्या इंटरसायन्स परीक्षा उत्तीर्ण झाल्या.

      बी.एस्सी. पदवीपरीक्षेसाठी त्या पुण्याच्या वाडिया महाविद्यालयामध्ये दाखल झाल्या. १९६३ साली रसायन, वनस्पती, प्राणिशास्त्र हे विषय घेऊन त्या प्रथम श्रेणीमध्ये बी.एस्सी. पदवीपरीक्षा उत्तीर्ण झाल्या. १९६३-१९६५ या वर्षामध्ये नॉर्वेमधील ऑस्लो विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांनी वरवर परस्परविरोधी गणले गेलेले गणित आणि जीवशास्त्र हे विषय निवडले होते. या ठिकाणी त्यांना नॉर्वेजियन भाषा थोडीफार अवगत झाली. त्याच सुमारास त्यांना युनिव्हर्सिटी ऑफ हवाई (यू.एस.ए.) येथे संशोधन करण्यासाठी ईस्ट-वेस्ट सेंटर येथे एक शिष्यवृत्ती मिळाली. तेथील डिपार्टमेंट ऑफ मरीन बायॉलॉजीमध्ये प्रो. मॅक्सवेल दोटी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १९६६-१९६९ दरम्यान कानेओहे या सागरी प्रदेशात संशोधन केले. ते अतिसूक्ष्म सागरी वनस्पतींशी संबंधित होते. या ठिकाणी त्यांना एम.एस. ही पदवी मिळाली. सागरी जीवांमधील प्रकाश संश्‍लेषणाच्या (फोटो सिंथेसिसच्या) प्रक्रियांविषयी त्यांनी सखोल अध्ययन केले.

      पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी त्यांना १९६९ साली इंग्लंडमध्ये ‘एस.ई.आर.सी.’ शिष्यवृत्ती मिळाली. युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये त्यांना प्रो. जी.ई. फॉग (एफ.आर.एस.) यांनी मार्गदर्शन केले. परदेशातील दोन्ही पदव्यांसाठी केलेले त्यांचे संशोधन सागरी सूक्ष्मजीव आणि सागरी वनस्पती यांच्यामधील प्रकाश संश्‍लेषणाच्या क्रिया-प्रक्रियांशी संबंधित होते. १९७२ साली पीएच.डी. मिळवल्यावर भारतात राहून संशोधन करण्याची त्यांची इच्छा होती. त्यानुसार, त्यांनी गोवा येथील राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्थेमध्ये (नॅशलन इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रफी, एन.आय.ओ.) ‘पूल ऑफिसर’ म्हणून कामाला सुरुवात केली. पृथ्वीवरील सर्वांत प्रचंड प्रमाणावर अव्याहतपणे चालू असलेल्या प्रकाश संश्‍लेषणाच्या मूलभूत क्रिया-प्रक्रियांबद्दल खूप कुतूहल असल्यामुळे, त्यांनी त्याच विषयावरील संशोधन चालू ठेवले. भारताच्या तिसऱ्या अंटार्क्टिक संशोधनाच्या मोहिमेत त्या विषयाचे संशोधन करायचे ठरले होते. साहजिकच त्यांची १९८३-१९८४च्या अंटार्क्टिक मोहिमेवर जाणाऱ्या संशोधकांच्या तुकडीमध्ये निवड झाली.

      अंटार्क्टिकावर जाऊन संशोधन करण्यासाठी भारतीय संशोधकांमध्ये प्रथमच दोन महिलांचा समावेश करण्यात आला होता. दुसरी महिला संशोधक होती डॉ. सुदीप्ता सेनगुप्ता. डॉ. हर्ष गुप्ता यांच्याकडे मोहिमेचे नेतृत्व होते. त्या वर्षी ‘दक्षिण गंगोत्री’ हे उन्हाळी सागरी विज्ञान संशोधन केंद्र उभारले गेले होते. त्यामुळे त्यांना भरपूर अनुभव मिळाला. भारताच्या पाचव्या अंटार्क्टिक मोहिमेत त्यांना पुन्हा एकदा (१९८५-१९८६) सहभागी होण्याची संधी मिळाली. गोव्याच्या प्रयोगशाळेत त्यांनी पुढील चार ते पाच वर्षात त्यांचे काही जीवशास्त्रीय प्रकल्प पूर्ण केले.

      १९९० साली पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एन.सी.एल.) त्यांनी पुढील संशोधन करायचे ठरविले. क्षारयुक्त सागरी पाण्यातील काही सूक्ष्मजीव औद्योगिक दृष्टीने उपयुक्त जैविक पदार्थांची निर्मिती करतात. काही जीवाणूंच्या गुणधर्मांचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. पंत यांनी हायड्रोकार्बनचे विघटन करू शकणाऱ्या नोकार्डिओपसिस वर्गीय सूक्ष्मजीवांवरील संशोधन केले. सागरी पाण्यात तेलवाहू जहाजांमुळे तेलाचे तवंग साचतात. तेलाचे हे जलप्रदूषण जर हायड्रोकार्बनचे विघटन करणाऱ्या जंतूंमार्फत कमी करता आले, तर सागरी जीवांची हानी कमी होऊ शकते आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी कमी प्रमाणात होईल. अशा संशोधनामुळे बरीच मूलभूत माहिती मिळाली. एका अस्पर्जिलसवर्गीय बुरशीकडून पेक्टिन नामक कर्बोदकाचे विघटन होते; कारण ती बुरशी पॉलिगॅलॅक्टोयुरोनेस नावाचे विकर (एन्झाइम) जास्त प्रमाणात बनवते. यारोविया लिपोलिटिका नावाचा एक यीस्टचा प्रकार आहे. द्रवपदार्थाच्या पृष्ठभागाचे गुणधर्म बदलू शकणारी रसायने बनवण्याची क्षमता त्या यीस्टमध्ये आहे. बरेचसे सूक्ष्मजीव सागरी पाण्यातून विलग करण्यात आले आहेत. पंत यांनी प्रयोगशाळेत अशा उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या गुणधर्मांचे संशोधन केलेले आहे.

      १९९० ते २००३ या काळात राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधन करीत असताना, त्यांनी सागरी पर्यावरणाशी संबंधित असलेल्या एका जागतिक प्रकल्पात सक्रिय भाग घेतलेला होता. सागरी सूक्ष्मजीवसृष्टी कार्बन-डाय-ऑक्साइडचा कसा, किती आणि केव्हा उपयोग करून जैवपदार्थाची निर्मिती करतात, यासंबंधीचे संशोधन त्यांनी केले. त्यासाठी त्यांना मुख्यत्वे अरबी सागरात प्रत्यक्ष जहाजावर जाऊन प्रयोग करावे लागले. प्रकाश संश्‍लेषण ही जीवसृष्टीतील एक खूप व्यापक जैवरासायनिक प्रक्रिया असल्यामुळे, निवडक जीवशास्त्रीय प्रयोग त्यांनी हिंदी महासागरात आणि बंगालच्या उपसागरात दीर्घकाळ (१९९३-१९९८) केले होते. काही सागरी एकपेशीय सूक्ष्मवनस्पती आणि विशिष्ट जीवाणू यांचा जीवनक्रम परस्परावलंबी असतो. पंत यांनी जीवसृष्टीतील अशा काही वनस्पती आणि जीवाणूंचे संशोधन केले होते. त्यांचे एकूण कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांना मानाचे ‘अंटार्क्टिक पारितोषिक’ प्रदान केले आहे.

      पंत यांनी अनेक विद्याशाखांतर्गत विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवीसाठी मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या काही वैज्ञानिक निष्कर्षांवर आधारलेली एकस्वे (पेटंटस्) त्यांनी घेतली आहेत. तसेच, आघाडीवरील शास्त्रीय नियतकालिकांमध्ये त्यांनी सुमारे ५० शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत जीवरसायनशास्त्र विभागातून २००० साली सेवानिवृत्त झाल्यावर, पुणे विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागात मानद शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी संशोधन आणि अध्यापनाचे कार्य चालू ठेवले. संगीताचे सूर ऐकता ऐकता नानाविध विषयांवरील पुस्तकांचे सतत वाचन करणे, हा त्यांचा एक छंद आहे. अनेक क्षेत्रांत कार्य करणारे स्नेहांकित गोळा करून त्यांच्याशी संवाद साधणे, योगसाधना करणे त्यांना खूप आवडते. निसर्गाचा यथेच्छ आस्वाद घेण्यासाठी भटकंती करण्याची हौस त्यांनी दीर्घकाळ जोपासलेली आहे.

- डॉ. अनिल लचके

पंत, आदिती