Skip to main content
x

पटवर्धन, विनायक नारायण

विनायक नारायण पटवर्धन यांचा जन्म मिरजेला झाला. त्यांचे घराणे पुरोहितांचे होते. मिरज संस्थानाचे कुलपुरोहित म्हणून त्यांच्या वाडवडिलांपासून घरात वैदिक संस्कार होते. प्लेगच्या साथीत, १९०२ साली आई गंगाबाई व वडिलांचे निधन झाले. काका केशवराव पटवर्धन यांनी विनायकरावांचे संगोपन केले व संगीताचे प्रारंभिक धडेही दिले. त्या काळी संगीताचार्य पं.विष्णू दिगंबर पलुसकरांचा गायक म्हणून मोठा लौकिक होता आणि त्यांनी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केल्याचे सर्वविदित होते. मिरजेचे संस्थानिक श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांनी शिष्यवृत्ती देऊन विनायकरावांना विष्णूबुवांच्या स्वाधीन केले.
विनायकरावांचे १९०७ सालापासून पं. विष्णू दिगंबरांकडे संगीत शिक्षण झाले. त्यांचा आवाज मुळात ढाला होता, मात्र मेहनतीने त्यांनी तो सफेद तीन या उंच पट्टीत गाण्यास अनुकूल केला. त्यामुळे त्यांचे गाणे बुलंद, पहाडी झाले.
बुद्धी चांगली आणि स्वभाव मेहनती, त्यामुळे भरपूर सराव करून ते शिकवलेल्या विद्येचे चोख पाठांतर करीत. गुरूंबद्दल अतिशय श्रद्धा व निष्ठा असलेल्या विनायकरावांनी गायनाबरोबर कथक नृत्य, तबलावादन आणि सतार, जलतरंग, बीनसारख्या वाद्यांचे वादन अवगत करून घेतले होते. वाद्यदुरुस्तीच्या कामातही ते तरबेज  होते.
पंडितजींनी मुंबई व नागपूरच्या गांधर्व महाविद्यालयात त्यांना शिक्षणकार्य करावयास सांगितले. त्यांचे १९०७ ते १९१४ सालापर्यंत शिक्षण झाल्यावर पुढील काळात अध्यापन करीत असताना मैफली गायक म्हणून विनायकरावांना प्रसिद्धी मिळत होती. मे १९२२ पर्यंत त्यांचे नागपूरला अध्यापन चालू होते.                                                                                                            ऑगस्ट १९२२ मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळीत प्रवेश केला. तोपर्यंत नाटक कंपनीत १९३२ सूत्रधार, नारदादी भूमिकांपासून मुख्य गायक नटापर्यंत त्यांचा अभिनय प्रवास झाला. त्यांच्या ‘अश्विनशेट’ (संशयकल्लोळ), ‘धैर्यधर’ (मानापमान), ‘अर्जुन’ (सौभद्र) वगैरे भूमिका गाजल्या. त्यांच्या नायिकेच्या भूमिकेत  बालगंधर्व असत.
त्यांचे गुरू पं.विष्णू दिगंबर पलुसकर यांचे १९३१ साली, २१ ऑगस्टला मिरजेत देहावसान झाले. डिसेंबरमध्ये सर्व गुरुबंधूंनी एकत्र येऊन पलुसकर महाराजांचे कार्य पुढे चालविण्यासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळाची स्थापना केली. पुढे विनायकराव या मंडळाचे अध्यक्षही झाले. त्यांनी ५ मे १९३२ रोजी पुण्यात गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली आणि गंधर्व नाटक कंपनी सोडली.
सदाचरणी, अनुशासनप्रिय आणि उत्तम शिकवणारे असा त्यांचा लौकिक झाला. वर्ग वेळेवर सुरू करणे व वर्गात शिस्तीत अध्यापन करणारा शिक्षकवर्ग यांमुळे विद्यालयाची लोकप्रियता वाढू लागली.
पं.द.वि.पलुसकर, मुकुंदराव गोखले, त्रि.द. जानोरीकर, नागेश खळीकर, राजाभाऊ कोकजे, स.भ.देशपांडे, भीमशंकर राव, वि.दा. घाटे, कालिंदी केसकर, कमल केतकर, शरद गोखले, शकुंतला पळसोकर, गंगाधर पिंपळखरे, वि.रा.आठवले, द.कृ. जंगम, द.वि. काणे, विनयचंद्र मौद्गल्य, सुनंदा पटनायक, प्राणलाल शहा, मधुकर खाडिलकर (सारंगी), पुष्पलता कुलकर्णी(व्हायोलिन) अशी कितीतरी शिष्यमंडळी विनायकरावांनी तयार केली. त्यांचे चिरंजीव नारायणराव, रामचंद्र मधुसूदन, कन्या सौ. कमल केळकर यांनाही त्यांनी शिकवून तयार केले.
नायकबुवांनी १९४२ साली ‘भारतीय संगीत प्रसारक मंडळी’ व १९५२ साली ‘विष्णू दिगंबर संगीत विद्यालय’ या संस्थांची स्थापना केली. ‘संगीताचे मराठीकरण’ या संदर्भात त्यांनी आपली विशेष भूमिका मांडून मराठी भाषेत ख्यालगायन केले व अनेक व्याख्याने, लेख यांद्वारे याविषयी प्रसार केला.
पं. विनायकराव पटवर्धन यांच्या भारतभर मैफली होत असत. नेपाळ (१९३६) व रशियालाही (१९५४) त्यांनी गायनासाठी दौरे केले. लहान विद्यार्थ्यांना शास्त्रशुद्ध, पद्धतशीर संगीत शिक्षणासाठी ‘शालेय बालसंगीत’ अशी पुस्तके त्यांनी लिहून प्रकाशित केली. पुढील विद्यार्थ्यांसाठी ‘रागविज्ञान’ (१९३६ ते १९६४) ही सात भागांची मालिका लिहून प्रकाशित केली.
ही त्यांची पुस्तके पुढील काळात  विद्यापीठांमध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून मान्यता पावली. याखेरीज ‘नाट्य संगीत प्रकाश’(१९३० व १९३४), ‘तबला व मृदंग वादनपद्धती’ आणि आपल्या गुवर्यांविषयीचे, ‘माझे गुरुचरित्र’ (१९५६) अशी पुस्तके त्यांनी लिहून प्रकाशित केली.
उ. रहिमत खाँसाहेबांना तंबोर्‍यावर साथ करण्याची संधी विनायकरावांना १९१९ साली पुष्कळदा मिळाली. तसेच पं. बाळकृष्णबुवांच्या साथीला बसण्याचे भाग्यही पुष्कळ वेळा त्यांच्या वाट्यास आले. त्यांनी १९३२ साली पं. रामकृष्णबुवा वझे यांचेही मार्गदर्शन घेतले. त्यामुळे गुरुवर्य पलुसकरांखेरीज इतरांचेही गायनाचे ढंग त्यांना अभ्यासता आले. त्यांनी १९२० साली पं. बाळकृष्णबुवांकडून शंभर ते दीडशे बंदिशी शुद्ध, अचूक करून घेतल्या होत्या.
त्यांनी गायलेली ‘राग अडाना’ची पहिली ध्वनिमुद्रिका १९२५ साली प्रसिद्ध झाली.  पं.नारायणराव व्यास व विनायकरावांच्या जुगलबंदीचे कार्यक्रम बरेच झाले. या जुगलगायनाची ध्वनिमुद्रिकाही १९६६ साली प्रसिद्ध झाली.
संगीत शिक्षणाच्या प्रसारासाठी ‘म्यूझिक लेसन’च्या त्यांनी ध्वनिमुद्रिका दिल्या. ‘कोलंबिया’ या कंपनीने अशा दहा ध्वनिमुद्रिका काढल्या. ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ या कंपनीने त्यांच्या सत्तावीस ध्वनिमुद्रिका काढल्या, त्यांतील बव्हंशी रागसंगीताच्या आणि काही इतरही (मराठीपदांच्या) होत्या. ‘माधुरी’ या हिंदी चित्रपटात बुवांनी १९३२ साली कामही केले होते. त्यातील रागदारीवर आधारित चार गीतांच्या ध्वनिमुद्रिका ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ने काढल्या होत्या. वरील सर्व ध्वनिमुद्रिकांखेरीज त्यांच्या विलंबित व दीर्घकालीन (एक्स्टेण्डेड प्ले व लाँग प्ले) अशा ध्वनिमुद्रिकाही निघाल्या.
संगीत नाटक अकादमीची फेलोशिप (१९६५) आणि भारत सरकारची ‘पद्मभूषण’ (१९७२) पदवी यांबरोबरच तानसेन समारोह, ब्रिजनारायणांची संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ, ग्वाल्हेर नगरपालिका, पुणे महानगरपालिका यांच्याकडून विनायकबुवांचा पदवी, मानचिन्हे, सभासदत्व देणे इत्यादी प्रकारे गौरव केला गेला. कूर्तकोटी शंकराचार्यांनी त्यांना ‘संगीत चूडामणी’ पदवी देऊन अलंकृत केले. पं. विष्णू दिगंबरांच्या समस्त शिष्यपरिवारापैकी पं. विनायकरावांनी त्यांच्या कार्यानुकरणाचा जास्तीतजास्त प्रयत्न केला.
ध्येयवादी शिक्षक, यशस्वी गायक, भरपूर प्रमाणात शिष्यवर्ग तयार करणारे गुरू, रागविज्ञानासारख्या पुस्तकमालेचे लेखक असलेल्या विनायकराव पटवर्धन यांचे वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी, पुणे मुक्कामी निधन झाले.

- डॉ. सुधा पटवर्धन

संदर्भ
मौद्गल्य, विनयचंद्र; ‘वंदे विनायकम्’; १९८८;  पं.विनायकराव पटवर्धन स्मारक समिती, पुणे.
पटवर्धन, विनायक नारायण