Skip to main content
x

पुरम, नारायण इरण्णा

     चित्रकलेच्या शिक्षणासाठी मुंबई व पुणे येथे संस्था स्थापून शैक्षणिक व सामाजिक बांधीलकी जपणारे चित्रकलाचार्य नारायण इरण्णा पुरम हे व्यक्तिचित्रणासाठी प्रसिद्ध होते. इरण्णा उमाजी पुरम आणि कृष्णाबाई यांचे नारायण पुरम हे दुसरे अपत्य होय. नारायण पुरम यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे वडील रॉयल इंडियन आर्मीत नोकरीस होते. त्यांनी १८९९च्या दक्षिण आफ्रिकेतील दुसऱ्या बोअर युद्धात पराक्रम गाजविला. भारतात परतल्यावर ते पुण्याच्या शस्त्रनिर्मिती कारखान्यामध्ये नोकरी करू लागले. साहजिकच नारायण यांचे बालपण पुण्यात गेले. त्यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, नाना वाडा येथे झाले.

     पुरम यांनी १९१४मध्ये मुंबईच्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून ड्रॉइंग अ‍ॅण्ड पेन्टिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांना प्राचार्य सेसिल बर्न्स, रावबहादूर एम.व्ही.धुरंधर, एस.पी.आगासकर, त्रिंदाद आणि एल.एन.तासकर आदी मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यांच्या गुणवत्तेमुळे १९१७मध्ये त्यांना सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टचेे ‘फेलो’ होण्याचा मान मिळाला.

     चित्रकलेबरोबरच पुरम यांनी न्यूयॉर्क इन्स्टिट्यूटमधून छायाचित्रणाचे दूरस्थ अभ्यासक्रमाद्वारे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी सिंध प्रांतातील हैद्राबाद येथे ‘कुंदनमल गर्ल्स हायस्कूल’मध्ये चित्रकला शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे  महाभारतावर राबविण्यात आलेल्या प्रकल्पात पुरम १९२२ ते १९२९ या काळात सहभागी झाले होते. औंध संस्थानचे राजे बाळासाहेब पंत- प्रतिनिधी यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनाखाली त्यांनी महाभारतातील विविध प्रसंगांची चित्रे काढली. शिवाय जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यातील भारतीय कलाकृतींची प्रतिकृती करण्यासाठी अन्य कलाकारांबरोबरच पुरम यांची निवड बाळासाहेब पंत- प्रतिनिधींनी केली होती. त्यांची काही चित्रे आजही औंध येथील संग्रहालयात आहेत.

     त्यांनी १९२९ ते १९३३ या काळात आफ्रिकेत स्वत:चा स्टुडीओ चालविला. त्या काळात महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या चळवळीने भारतातच नव्हे, तर आफ्रिकेतील अनेक तरुणांना भारून टाकले होते. चित्रकार पुरमही त्याला अपवाद नव्हते. म्हणूनच त्यांनी आपला आफ्रिकेतील स्टुडीओ बंद केला व गांधीजींच्या साबरमती आश्रमात राहण्याच्या उद्देशाने ते भारतात परत आले. परंतु कार्याच्या व्यापामुळे गांधीजी सहसा साबरमतीस नसत. त्यामुळे पुरम यांनी पुण्याच्या टिळक राष्ट्रीय पाठशाळेत काम करणे पसंत केले.

     बडोद्याचे राजे प्रतापसिंग महाराज यांच्या राज्याभिषेक समारंभाची चित्रे काढण्यासाठी नारायण पुरमांना १९३९मध्ये आमंत्रित करण्यात आले. त्यांनी काढलेली चित्रे बडोद्याचा राजवाडा आणि पोलोग्राउंड येथे लावलेली आहेत. त्यांचे ‘महाराणा प्रताप व त्यांचा जखमी चेतक घोडा’ हे चित्र उदयपूरच्या राजवाड्यातील संग्रहालयात पाहावयास मिळते. कोल्हापूर विद्यापीठातील ‘शिवाजी महाराज’ आणि पुणे विद्यापीठातील ‘महात्मा जोतिराव फुले’ ही दोन्ही चित्रे त्यांनीच साकारली आहेत. पुरम यांनी १९३५  ते १९३९  अशी चार वर्षे अध्यापनाचे कार्य केले. या संस्थेस १९३७ मध्ये सरकारची मान्यता मिळाली. त्यांनी १९४० च्या दरम्यान  दूरदृष्टीने, विद्यार्थ्यांना पदविकेऐवजी पदवी मिळावी म्हणून या दोन्ही संस्था बनारस हिंदू विद्यापीठाशी संलग्न करण्याचे प्रयत्नही केले होते.

     ‘इन्स्टिट्यूट ऑफ फाइन आर्ट’ ही संस्था कालांतराने ‘अभिनव कला महाविद्यालय’ या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांनी संस्थेचे सचिव व महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य ही दोन्ही पदे भूषविली. या संस्थेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी ते आयुष्यभर प्रयत्नशील राहिले. त्यांच्या व्यक्तिगत चित्रनिर्मितीवर त्याचा परिणाम होऊन पुढील काळात त्यांनी फारच थोडी चित्रनिर्मिती केली. परंतु शिक्षक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.

     तैलरंगातील व्यक्तिचित्रणासाठी विद्यार्थ्यांना पुरम मोलाचे मार्गदर्शन करीत. कसून मेहनत आणि सहस्रावधी रेखाटने (स्केचेस) केल्याशिवाय चित्रकला साध्य होणार नाही ही शिकवण ते विद्यार्थ्यांना वारंवार देत. त्यांनी १९५२ -१९५३ पासून ‘चित्रपुष्प’ हे अभिनव कला महाविद्यालयाचे कलाविषयक प्रकाशन सुरू केले.

     नारायण पुरम प्राचार्यपदी काम करीत असताना अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी या संस्थेला भेट देऊन त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. पुरीचे जगद्गुरू शंकराचार्य यांनी चित्रकलेच्या योगदानाबद्दल त्यांना ‘चित्रकलाचार्य’ हा किताब बहाल केला. पुणे महानगरपालिकेने टिळक रोडवरील अभिनव कला महाविद्यालय या वास्तूसमोरील चौकाला ‘चित्रकलाचार्य ना.ई. पुरम चौक’ हे नाव दिले आहे.

- रंजना सुतार

पुरम, नारायण इरण्णा