Skip to main content
x

रानडे, अशोक दामोदर

प्रयोगनिष्ठ कला आणि शास्त्र परंपरा यांची योग्य सांगड घालून भारतीय संगीतातील विचारधारा पुढे नेणारे भारतीय संगीत क्षेत्रातील गाढे अभ्यासक, मार्मिक विश्लेषक, भारतीय संगीत-संस्कृतीच्या समृद्धतेचे दर्शन घडविणारे चिंतनशील भाष्यकार, सर्जनशील संगीतकार, प्रयोगशील गायक व साक्षेपी समीक्षक; संगीतशास्त्र, सौंदर्यशास्त्र, लोकसंगीतशास्त्र, आवाज जोपासनाशास्त्र, संस्कृतिसंगीतशास्त्र यांचे खास अभ्यासक असलेल्या अशोक रानडे यांनी संगीताच्या परिघात वावरणार्‍या इतर अन्य विद्याशाखांची संगती लावून संगीत विचारांना आधुनिक दृष्टिकोनातून एक नवे परिमाण व दिशा दिली, तसेच संगीताबरोबर रंगभूमी, साहित्य यांचा अभ्यास व लेखनही केले.
अशोक दामोदर रानडे यांचा जन्म पुणे येथे झाला. वडील दामोदर अनंत रानडे मॅट्रिक उत्तीर्ण असून बॉम्बे प्रोव्हिन्शिअल को-ऑपरेटिव्ह बँकेत काम करीत. साहित्य आणि संगीताची त्यांना आवड होती व ते कविताही करत. त्यांचे आजोबा कीर्तनकार आणि वैद्य होते. अशोक रानडे हे दीड वर्षांचे असतानाच त्यांच्या आई इंदिराबाईंचे निधन झाले. त्यानंतर सावत्र आई सुमती रानडे ऊर्फ माईंनीच त्यांचे संगोपन केले. त्या पूर्वाश्रमीच्या बोडस. पं. विष्णू दिगंबर पलुसकरांचे शिष्य पं. लक्ष्मणराव बोडस हे रानड्यांचे मामा होत.
अशोक रानड्यांचे शालेय शिक्षण गिरगावात, आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेमध्ये झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण विल्सन महाविद्यालयामधून झाले. त्यांनी १९६० साली मुंबई विद्यापीठाची कायद्याची पदवी घेतली, तसेच मराठी व इंग्रजी साहित्य घेऊन अनुक्रमे १९६२-६४ साली मुंबई विद्यापीठाची एम.ए.ची पदवी घेतली. 
वयाच्या दहाव्या वर्षापासून ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केलेले व व्हायोलिनवादनात स्वत:चा बाज निर्माण करणारे विख्यात गायक-वादक पं.गजाननबुवा जोशी यांच्याकडे रानड्यांचे संगीत शिक्षण सुरू झाले. तब्बल दहा वर्षे (१९४८-१९५८) त्यांना गजाननबुवांची तालीम व सहवास लाभला. त्यानंतर आग्रा घराण्याचे पं. प्रल्हाद गानू (१९५८-१९६२), ग्वाल्हेर घराण्याचे पं. लक्ष्मणराव बोडस (१९६२ ते १९६६) व पुढे १९७० ते १९७४ या काळात प्रा. बी.आर. देवधर यांच्याकडे त्यांचे शिक्षण झाले. बी.आर. देवधरांकडून त्यांनी आवाज जोपासना-शास्त्राचेही धडे घेतले. पुढे आवाज जोपासनाशास्त्राचा अभ्यास स्वतंत्रपणे वाढवून गायनाबरोबरच रानड्यांनी रंगभूमीवरील भाषणांमधील आवाजाच्या वापराच्या अनुषंगाने आवाज साधनेचा अभ्यास केला. त्यांनी  १९७६ साली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची ‘आचार्य’ ही पदवी प्राप्त केली. कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर १९६३ पासून जवळजवळ तीन वर्षे ते मुंबई आकाशवाणीवर कार्यरत होते. आकाशवाणीवर असतानाच त्यांच्या जीवनातील महत्त्वाची घटना घडली. आकाशवाणीवरच काम करणार्‍या हमीदा इब्राहिमशी त्यांचा परिचय झाला. पुढे या परिचयाचे विवाहात रूपांतर झाले. हमीदा इब्राहिमच्या हेमांगिनी रानडे झाल्या. श्रीमती हेमांगिनी रानडे या हिंदी साहित्यातील कथा-कादंबरी लेखिका आहेत.
रानडे १९६५ ते १९६८ या कालखंडात सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स या महाविद्यालयात मराठी आणि इंग्रजीचे प्राध्यापक होते. त्यांची १९६८ साली मुंबई विद्यापीठाच्या संगीत केन्द्राचे प्रथम संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १९६८ ते १९८३ पर्यंत हे संचालकपद सांभाळले. कार्यकुशल व्यवस्थापनाबरोबरच विविध प्रकारच्या संगीताचे ध्वनिमुद्रण, श्रवणसत्रे, संगीतसभा व प्रात्यक्षिकांचे आयोजन, हिंदुस्थानी संगीताबरोबरच पाश्चात्त्य संगीत व इतर संगीतविषयक पुस्तके, नियतकालिके आदींचा ग्रंथालयात समावेश अशा अनेक अभिनव योजना राबवून युनिव्हर्सिटी म्युझिक सेंटर हे सांस्कृतिक आदान-प्रदानाचे केंद्रच झाले होते. विशेष म्हणजे विद्यापीठात शिकविण्याकरिता त्यांनी चार प्रमुख घराण्यांच्या चार मातब्बर गायकांची गुरू म्हणून नेमणूक केली होती.
१९८३-८४ या काळात ते पुणे येथील अर्काइव्ह्ज अ‍ॅण्ड रिसर्च केंद्रात साहाय्यक संचालक (संशोधन) म्हणून होते. त्यानंतर १९८४ पासून १९९३ पर्यंत राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राच्या (एन.सी.पी.ए.) रंगभूमी विकास प्रकल्पाचे ‘प्रकल्प संचालक’ म्हणून त्यांनी काम पाहिले. ते १९९४ पासून अखेरपर्यंत स्वतंत्रपणे विविध कार्यशाळांचे आयोजन, पुस्तक-लेखन, संगीतविषयक व्याख्याने, गायनाची तालीम, संकल्पनाधिष्ठित मैफली अशा अनेक कार्यांत व्यग्र होते.
अशोक रानडे यांच्या संगीत लेखनाचा आवाका खूप मोठा आहे. त्यांनी संगीत विषयक विपुल लेखन केले. त्यांनी १९६०-६२ च्या दरम्यान आपल्या लेखनाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला वृत्तपत्रांतून, मासिकांतून, नियतकालिकांतून संगीतातील विविध विषय घेऊन त्यांनी लिखाण केले. रानड्यांचा संगीत-लिखाणाविषयीचा व विचारांचा दृष्टिकोन हा एकांगी नव्हता. भारतीय संगीत म्हणजे फक्त रागदारी संगीतच नव्हे, तर व्यापक अर्थाने भारतात रुजलेल्या आणि अखंड वाहत असलेल्या, आदीम, लोक, धर्म, कला, जनसंगीत व संगमसंगीत अशा सहा संगीत कोटींतील सांगीतिक मूलतत्त्वांचा व संकल्पनांचा अभ्यास करण्याचे आवाहन स्वीकारायला हवे असा त्यांचा आग्रह होता. यातूनच भारतीय संस्कृतीत अस्तित्वात असलेल्या एकूण संगीत व्यवहाराचे समग्र आकलन होणे शक्य आहे असे त्यांना वाटे.
अशोक रानडे यांनी संगीतांतर्गत व संगीतपर विषयांची संगती लावून, विद्वत् परंपरा व प्रयोग परंपरा यांची सांगड घालून संगीताचा विचार एका व्यापक सामाजिक, सांस्कृतिक चौकटीतून केला. त्यामुळेच भारतीय संस्कृतीतील साहित्यशास्त्र, काव्यशास्त्र, तत्त्वज्ञान, नाट्यशास्त्र, धर्मपरंपरा, आयुर्वेद, योगशास्त्र, ध्वनिशास्त्र, संगीताचा इतिहास आणि संगीतशास्त्र, लोकसंस्कृती, लोकसंगीत, सौंदर्यशास्त्र, ध्वनिशास्त्र, मौखिक परंपरा, प्रत्यक्ष प्रयोगकला इत्यादी सर्व भारतीय विद्याशाखांच्या अभ्यासातून व वैचारिक मंथनातून आलेली संगीतविषयक समग्र दृष्टी स्वीकारून त्यांनी आपले संगीत विषयक विचार आपल्या लेखनातून मांडलेले दिसतात. विशेषत: संस्कृति- संगीतशास्त्राविषयीचे त्यांचे लिखाण महत्त्वाचे ठरते.
संगीत आणि संस्कृती यांचा एकमेकांशी आंतरिक संबंध असतो. संस्कृती बदलली तर संगीत बदलते आणि संगीत बदलले तर संस्कृती बदलाचे ते निदर्शक असते. संस्कृति-संगीतशास्त्राचा विचार पाश्चात्त्यांच्या सांगीत दृष्टिकोनातून आशियाई संगीतावर होत असे. रानड्यांनी भारतीय संस्कृति-संगीताचा विचार भारतीय दृष्टिकोेनातून केला. याबरोबर इराण, अफगाण, पोर्तुगाल, पर्शिया अशा भारताच्या आसपासच्या परदेशांतील संगीताचा तौलनिक अभ्यासही त्यांनी केला. हे भारतीय संगीत विचारातील रानड्यांचे महत्त्वाचे योगदान ठरावेे. त्यामुळे त्यांच्या संगीत- विचारांना एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले.

आजवर रानडे यांची इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांतून एकंदर २१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९७१ साली ‘संगीताचे सौंदर्यशास्त्र’ हे त्यांचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले. त्यानंतर लोकसंगीतशास्त्र, संगीतशास्त्र, आवाज जोपासनाशास्त्र, संस्कृतिसंगीतशास्त्र, संगीत आणि नाटक, महाराष्ट्रातील संगीत इतिहास, मराठी संगीत रंगभूमी, रागदारी संगीतात वापरल्या जाणार्‍या संज्ञांचा कोश, अशा विविध विषयांवर त्यांची पुस्तके प्रकाशित झाली. या सर्वच पुस्तकांचा परामर्ष घेणे वा परिचय देणे इथे शक्य नाही; पण पुस्तकांची जंत्री खाली दिलेली आहे, त्यावरून विषयाची व्यापकता लक्षात यावी.

त्यांची संगीतशास्त्र आणि संस्कृतिसंगीतशास्त्र या विषयाची  संगीताचे सौंदर्यशास्त्र (१९७१), लोकसंगीतशास्त्र (१९७५), स्ट्रॅव्हिन्स्कीचे सांगीतिक सौंदर्यशास्त्र (१९७५), कीवडर्ज अ‍ॅण्ड कॉन्सेप्ट्स (१९९०), इंडोलॉजी अ‍ॅण्ड एथ्नोम्युझिकॉलॉजी (१९९२), एसेज इन एथ्नोम्युझिकॉलॉजी (१९९८), रिफ्लेक्शन्स ऑन म्युझिकॉलॉजी अ‍ॅण्ड हिस्टरी (२०००), कन्साइज डिक्शनरी ऑफ म्युझिक (२००६), पर्स्पेक्टिव्ह ऑन म्युझिक (२००८), संगीत विचार (२००९). ही पुस्तके
महाराष्ट्रातील संगीत  यावरील स्टेज म्युझिक ऑफ महाराष्ट्र (१९८६), महाराष्ट्र आर्ट म्युझिक (१९८९).

उत्तर हिन्दुस्थानी रागसंगीतातील गायक-गायिकांच्या गायकीची समीक्षा व चिकित्सा  यावरील ऑन म्युझिक अ‍ॅण्ड म्युझिशिअन्स ऑफ हिन्दुस्थान (१९८४), मला भावलेले संगीतकार (२०१०),  दे लिट् द वे (२०१०). 

भारतीय संगीताच्या इतिहासाचे परिचयात्मक असणारे हिन्दुस्थानी म्युझिक (इंग्रजी आणि मराठी) (१९९७). 

रंगभूमीसंबंधी असणारे  म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा (१९९१), भाषणरंग (१९९५), भाषणविषयक नाट्यविचार (२००१).

हिंदी चित्रपटसंगीतासंबंधी  हिंदी फिल्म साँग (२००६), चित्रपट गीत परंपरा आणि आविष्कार (२०१०).
याखेरीज अनेक नियतकालिके, वृत्तपत्रे, मासिके, संशोधन पत्रिका इत्यादींतून विविध विषयांवर त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. विशेष उल्लेख करायचा झाला तर १९९५ साली ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रातून मराठी भावसंगीताचा वेध घेणारी ‘किरणांची सावली’ ही लेखमालिका व ‘लोकसत्ते’तील संगीतविषयक वैविध्यपूर्ण रंजक अशी ‘संगीत-संगती’ ही मालिका.
 इंग्रजी, मराठी या भाषांवर प्रभुत्व, या दोन्ही भाषांतील साहित्याचा व्यासंग व कायद्याच्या भाषेचा अभ्यास, त्यामुळे रानड्यांच्या लेखनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण ठसा निर्माण झाला आहे. डॉ. अशोक रानडे यांच्या लेखनाला वैचारिक आणि तात्त्विक बैठक असते. विषयाच्या मूळ गाभ्याशी जाऊन त्या विषयात कार्यान्वित होणार्‍या संकल्पना मांडून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, संकल्पना स्पष्ट करत तार्किक सुसंगती राखून ते विषय व आशयाचे रूप स्पष्ट करतात. विषयानुरूप योग्य संज्ञा आणि परिभाषांचा चपखल व नेमका अर्थ दर्शविणारा उपयोग त्यांच्या लिखाणातून दिसतो. रंजकता, गूढता, विशेषणांची खैरात व फापटपसारा न मांडता अतिशय आटोपशीर, नेमके, मुद्देसूद, विषयाची मर्यादा व गांभीर्य राखून केलेले त्यांचे लिखाण असते. मर्मग्राहक दृष्टी, अभ्यासपूर्ण व मार्मिक विश्लेषण ही त्यांच्या लेखनाची थोडक्यात वैशिष्ट्ये होत.
किराणा घराण्याच्या गंगूबाई हनगल यांच्या अल्बमचे संपादन (१९८८), तसेच संगीत नाटक अकादमीच्या ‘हिन्दी फिल्म म्युझिक’ या विशेषांकाचेही संपादन त्यांनी केले आहे. याबरोबर ‘हास्य विनोद आणि सुखात्मिका’ (१९९२), ‘कथाशताब्दी’ (१९९३) या दोन ग्रंथांचे त्यांनी विजया राजाध्यक्षांबरोबर संपादन केले असून, ‘संगीत कला विहार’च्या ‘जनसंगीत’ (२०००), ‘लोकसंगीत’ (१९९८) व ‘धर्मसंगीत’ (१९९९) या विशेषांकांचे अतिथी संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले.
अशोक रानडे यांनी विविध ‘थीम्स’ (विषय-संकल्पना) घेऊन अतिशय दर्जेदार असे रंगमंचीय कार्यक्रम सादर केले. खरे म्हटले तर हाही एक संगीत-संस्कृती दर्शनाचा सुंदर आविष्कारच होता. भारतीय जनव्यवहारात संगीताचा वापर व आविष्कार किती वैविध्यपूर्ण रितीने झाला आहे व त्याची नानाविध रूपे कशी होती हे रानड्यांनी या कार्यक्रमांतून आपल्या सहकार्‍यांसह मांडले होते. या कार्यक्रमाची संकल्पना, संगीत आणि निरूपण खास रानड्यांचे होते. असे १९ कार्यक्रम रानड्यांनी सादर केले. रागदारी संगीतातील धृपद, धमार, ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा आदी प्रकार, लोकसंगीतातील ओवी, भारूड, लावणी, वासुदेव गीत, वेगवेगळ्या संतकवींची पदे व रचना, मराठी नाट्यसंगीत, भावसंगीत इत्यादी संगीतप्रकारांचे सादरीकरण यांतून होत असे. ओघवत्या, स्पष्ट व प्रासादिक वाणीतील रानड्यांचे विद्वत्तापूर्ण संदर्भासहित विश्लेषणात्मक निरूपण हा या कार्यक्रमाचा विशेष भाग होता. कार्यक्रमांच्या विषयांतील वैविध्यता खालील कार्यक्रमांच्या शीर्षकांवरून यावी : १) नाट्यसंगीताची वाटचाल (१९८४), २) मानापमानातील गाणी (१९८६), ३) सावन (१९८८), ४) बैठकीची लावणी (१९८९), ५) देवगाणी (१९९१), ६) संगीत रंग (१९९२), ७) स्वरचक्र (१९९३), ८) रंगवसंत (१९९३), ९) नाट्यसंगीताचे मराठी वळण (१९९४), १०) राधा (१९९५), ११) त्रिभंग ते अभंग (१९९५), १२) रचना ते बंदिश (१९९७), १३) गायकीचे वळण (२०००), १४) संचित (२००४), १५) चंद्रभैरवी (२००५), १६) गीतिभान (२००७), १७) संतांची वाटचाल (२००७), १८) कला गणेश (२००८), १९) रामगाणे (२००९). समाज, धर्म, शास्त्र, परंपरा, उत्सव, देवदेवता, दिनचक्र-ऋतुचक्र, जीवन-मृत्यू, दैनंदिन जीवनातील लौकिक सुखदु:खादी भावना अशा कितीतरी विषयांशी-घटकांशी भारतात संगीताचे खोलवर नाते जडलेले आहे व त्याची अभिव्यक्ती किती तर्‍हांनी झाली आहे, हे या कार्यक्रमांतून कळत असे.
रानडे १९८४ ते १९९४ या काळात राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राच्या रंगभूमी विकास प्रकल्पाचे संचालक होते. या प्रकल्पांतर्गत डॉ. रानड्यांनी आपल्या सहकार्‍यांसह रंगभूमीशी संबंधित विविध प्रकारची माहिती जमवून दस्तऐवजीकरणाचे कार्य केले. मराठी, तसेच अमराठी रंगभूमीवरील नट, नाटककार, दिग्दर्शक, लेखक, संगीतकार, वेशभूषाकार, नेपथ्यकार, प्रकाशयोजक अशा विविध रंगकर्मींच्या मुलाखती, नाट्यसंस्थांची माहिती व इतर रंगभूमीविषयक तपशीलांच्या नोंदी केल्या. याशिवाय विविध विषयांच्या, आवाज जोपासनाशास्त्र, तत्कालस्फूर्ती, अशा अनेक कार्यशाळांचे, चर्चासत्रांचे, शिबिरांचे आयोजन व संचालनही केले. ‘रंग अंतरंग’ या एनसीपीएने काढलेल्या अंकांतून, तसेच ‘फॅक्ट्स अ‍ॅण्ड न्यूज’ या इंग्लिश पत्रिकेतून ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. रंगभूमीशी संबंधित रानड्यांनी लिहिलेली विविध विषयांवरील टिपणेही यांत आहेत.
रानड्यांनी अकरा नाटकांना, काही लघुपटांना व एका चित्रपटाला संगीत दिले असून आंतरराष्ट्रीय सुलेखन प्रदर्शन ‘आकार’ (१९८८), ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ (१९८९, नेहरू सेन्टर, मुंबई) आणि ‘वॉक थ्रू फतेहपूर सिक्री’ यासाठी संगीत आयोजित केले होते. त्यांनी ‘चव्हाटा’ (१९७१), ‘मिथ मेकर्स’ (१९७१), ‘सोनार बांगला’ (१९७२), ‘माता द्रौपदी’ (१९७२), ‘देवाजीने करुणा केली’ (१९७३), ‘संध्या छाया’ (१९७९), ‘एक झुंज वार्‍याशी’ (१९८८), ‘काळा वजीर पांढरा राजा’ (१९९३), ‘टेम्प्ट मी नॉट’ (१९९३), ‘राहिले दूर घर माझे’ (१९९७) या नाटकांना, ‘बाबा आमटे’ आणि ‘सिंगिंग लाइन’ इत्यादी लघुपटांना, तसेच ‘देवी अहिल्याबाई होळकर’ (२००३) या हिंदी चित्रपटाला संगीत दिले आहे. ‘एक झुंज वार्‍याशी’ या नाटकाला महाराष्ट्र राज्याच्या व्यावसायिक रंगभूमी स्पर्धेचे उत्तम संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक लाभले आहे.
रानड्यांच्या जीवनात ‘संगीत’ केंद्रस्थानी असूनही व्यावसायिक गायक न होण्याचा निर्णय त्यांनी तरुण- वयातच घेतला होता. मात्र ते उत्तम सादरीकरण करीत. ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांची तालीम मिळालेल्या रानड्यांच्या संग्रही २५० राग आणि २५०० च्या आसपास बंदिशी होत्या. धृपद, ख्याल, टप्खयाल, ख्यालनुमा, अष्टपदी, चतुरंग, तराणे, ठुमरी, दादरे, पुराना गझल असे नाना प्रकार त्यांच्या संग्रही होते. याशिवाय त्यांनी ‘रसिकरंग’ या नावाने अनेक बंदिशी बांधल्या आहेत. तसेच काही जुन्या बंदिशींची पुनर्रचना व काही जुन्या (तानसेन, बैजू, सूरदास इत्यादी) संहितांची स्वरयोजनाही त्यांनी केली आहे. रानडे आपल्या गायनाच्या बैठकीतून नेहमीच काही नवीन, वेगळे, जे गायले जात नाहीत असे राग, बंदिशी, संगीत प्रकार मांडत. रचनाबंधाची (बंदिशींची) जाण ठेवून केलेले नेटके व पद्धतशीर आविष्करण हे त्यांचे वैशिष्ट्य होय. ते एक सर्जनशील गायक , उत्तम मार्गदर्शक तसेच गुरु होते.
रानड्यांच्या शिष्यवर्गात केदार बोडस, मिलिंद मालशे, कल्याणी साळुंके, सुरेश बापट, शुचिता आठल्येकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. याव्यतिरिक्त त्यांच्या कार्यक्रमांतील तालमींतून, तसेच खाजगीरीत्या अनेकांना त्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच रंगभूमीवरील अनेक अभिनेत्यांना व अभिनेत्रींनाही आवाज-जोपासनाबाबत त्यांचे मार्गदर्शन लाभले आहे डॉ. अशोक रानड्यांना देशाविदेशांतील   संगीतविषयक विविध चर्चासत्रांतून आमंत्रित करण्यात आले होते. रशिया, लंडन, मॉरिशस, चीन, पाकिस्तान, जपान, जर्मनी, अमेरिका, इटली अशा विविध देशांत त्यांनी संगीत विषयक व्याख्याने, चर्चासत्रे संगीताचा प्रचार, प्रसार या निमित्ताने भेटी दिल्या आहेत.
त्यांनी आवाज जोपासनाशास्त्र, संगीतशास्त्र, संगीताचे सौंदर्यशास्त्र, बंदिश, संगीत रसग्रहण, घराणे इत्यादी विषयांचा अभ्यासक्रम, तसेच कार्यशाळांचे आयोजनही केले आहे. यमन, बिहाग, भैरव या रागांच्या कार्यशाळाही त्यांनी घेतल्या आहेत.
अशोक रानडे यांनी रामकृष्णबुवा वझे, ओंकारनाथ ठाकूर, केसरबाई केरकर, मा. कृष्णराव यांबरोबरच हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील संगीत दिग्दर्शक एस.डी.बर्मन, मदन मोहन, गायक के.एल. सैगल इत्यादी गायक, गायिका, संगीतकार यांची ध्वनिमुद्रणे वाजवून त्यांच्या संगीताचे विश्लेषण व वैशिष्ट्ये सांगणारे कार्यक्रम केले.
त्यांनी १९७०-८० च्या दशकात दूरदर्शनवर होणार्‍या ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ कार्यक्रमांतून गायकांच्या मुलाखती घेतल्या, तसेच ‘पिंपळपान’ व ‘आकाशदीप’ या कार्यक्रमांतून विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतीही त्यांनी घेतल्या आहेत.
‘बैठकीची लावणी’ (१९८९) आणि ‘देवगाणी’ (१९९१) या रानड्यांच्या दोन कार्यक्रमांच्या ध्वनिफिती निघाल्या असून देवगाणीची ध्वनिचकतीही आता निघाली आहे. याबरोबरच गीतिभान (२००६), संतांची वाटचाल (२००७), कलागणेश (२००८) व रामगाणे (२००९) या कार्यक्रमांच्या ध्वनिचकत्या निघाल्या आहेत. अंडरस्कोअर रेकॉर्ड्स प्रा.लि. या कंपनीने ‘संचय’ हा यमन, बिहाग व भैरव या रागांतील बंदिशींच्या संग्रहांचा एक अल्बम डॉ. रानड्यांच्या आवाजात काढला आहे. यात एकंदर बत्तीस रचना आहेत. यांत विलंबित, द्रुत खयाल, टपखयाल, तराणा, ठुमरी, बंदिश की ठुमरी, दादरा, सावन, होरी अशा अनेक शास्त्रोक्त आणि उपशास्त्रीय संगीतातल्या रचना रानड्यांनी सादर केल्या आहेत. याशिवाय रागाची ऐतिहासिक माहिती, संगीतशास्त्रीय माहिती, बंदिशींचा अर्थ, वैशिष्ट्ये व आशय अशा अनेक तपशीलांनी भरलेले रानड्यांचे निरूपण हे ‘संचय’चे खास वैशिष्ट्य.
‘टागोर चेअर ह्युमॅनिटीज’ या सन्माननीय अध्यासनाकरिता १९९४ ते ९५ या काळात बडोद्याच्या एम.एस. युनिव्हर्सिटीने त्यांची नियुक्ती केली होती. दिल्लीच्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने १९९१-९२ या कालखंडात ‘नॅशनल लेक्चरर इन म्युझिक’ हे पद त्यांना दिले होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या ‘स्कूल फॉर अ‍ॅस्थेटिक्स अ‍ॅण्ड आटर्स’मध्ये त्यांना ‘फोर्ड व्हिजिटिंग फेलोशिप’ प्रदान करण्यात आली होती.
अशोक रानडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेतर्फे, ‘मा.कृष्णराव फुलंब्रीकर’ पुरस्कार (१९९८),  संगीत संशोधनाबद्दल ‘म्युझिक फोरम’चा ‘म्युझिक फोरम’ पुरस्कार (१९९८), ‘संगीत-विचार’ या पुस्तकासाठी पुरस्कार (२००९), महाराष्ट्र सरकारचा ‘कलादान’ पुरस्कार (२००७), महाराष्ट्र सरकारचा समीक्षात्मक लेखनाकरिता असलेला ‘कुरुंदकर’ पुरस्कार (२०१०), ‘चतुरंग प्रतिष्ठान’चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार (२०१०), संगीत नाटक अकादमी, दिल्लीचा पुरस्कार (२०११) आदी पुरस्कार मिळाले आहेत. याशिवाय कोलसन इंडोलॉजी फेलोशिप, वोल्फसन कॉलेज ऑक्स्फर्ड (यु.के.), संस्कृति- संगीतशास्त्राकरिता क्वीन्स युनिव्हर्सिटीमध्ये, अशा अनेक विदेशांतील विद्यापीठांतून प्राध्यापक म्हणून त्यांना सन्मानाने आमंत्रित केले होते.
संगीतात सतत शोध घेणार्‍या या व्रतस्थ व अखंड साधकाचे निधन मुंबईत अल्पशा आजाराने झाले. ‘मर्मज्ञ’ हा डॉ. रानडे यांच्या कार्याचा वेध घेणारा गौरवग्रंथ यांच्या पश्‍चात २०१२ साली प्रकाशित झाला. त्यांच्या नावे ‘डॉ. अशोक दा. रानडे मेमोरिअल ट्रस्ट’ स्थापन करण्यात आले असून त्याद्वारे विविध विद्वानांची व्याख्याने, कलावंताचे आविष्कार आयोजित करण्यात येतात. मुंबईतील ‘म्युझिक फोरम’तर्फे त्यांच्या नावे ‘डॉ. अशोक दा.रानडे स्मृति पुरस्कार’ हा कलाक्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तीस देण्यात येतो.

            माधव इमारते

रानडे, अशोक दामोदर