Skip to main content
x

साळुंखे, आण्णा हरी

     अण्णा हरी साळुंखे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील शिवाजीनगर (पूर्वीचे नाव खाडेवाडी), ता. तासगाव या छोट्याशा खेड्यात, शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव अंजूबाई, थोरला भाऊ पांडुरंग. घरी पंढरीची वारी असे. गावी चौथीपर्यंत शाळा असल्याने चौथीनंतर गावापासून आठ कि.मी. अंतरावरील तासगाव येथे इयत्ता पाचवी ते अकरावीपर्यंत शिक्षण झाले. तासगावी ते पायी चालत जात. वडील बंधू पांडुरंग यांनी त्यांना अभ्यासाची गोडी लावली व अभ्यासाची तयारी करून घेतली. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये झाले. त्यांनी बी.ए.ची पदवी संस्कृत हा विशेष आणि हिंदी व तत्त्वज्ञान हे ऐच्छिक विषय घेऊन संपादन केली. बी.ए. व एम.ए. (संस्कृत) या परीक्षांत ते शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यांना भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली होती. मराठी विषयातही त्यांनी एम.ए.ची पदवी मिळविली होती. डॉ. वि.बा. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएच.डी.ची पदवी संपादन केली.

     कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात त्यांनी ३२ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. काही वर्षे मराठीचेही अध्यापन केले. शिवाजी विद्यापीठात संस्कृत अभ्यास मंडळाचे सदस्य व अध्यक्ष, तसेच वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता (डीन) म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या काळात त्यांनी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी विविध पुस्तकांच्या संपादनांत सहभाग घेतला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या सातारा येथील अभ्यास केंद्राचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. साळुंखे यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांनी १९८१ मध्ये ‘किर्लोस्कर’ मासिकात मराठा समाजविषयक आत्मनिरीक्षणात्मक लेख लिहिला, तसेच त्यांनी त्याच दरम्यान ‘नवभारत’ (वाई) या मासिकात ‘लोकायत दर्शना’वर लेखमाला लिहिली. त्यांनी ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ हा पीएच.डी.चा प्रबंधही प्रसिद्ध केला आहे. याशिवाय त्यांनी केलेले लेखन पुढीलप्रमाणे :

     १. धर्म व तत्त्वज्ञानपर ग्रंथ : ‘धर्म की धर्मापलीकडे?’, ‘महात्मा फुले आणि धर्म’, ‘आस्तिक शिरोमणी चार्वाक’, ‘आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल’, ‘वैदिक धर्मसूत्रे आणि बहुजनांची गुलामगिरी’, ‘ऐतरेय ब्राह्मण ः एक चिकित्सा’, ‘गुलामांचा आणि गुलाम करणार्‍यांचा धर्म एक नसतो’, ‘मातृचेटकृत शतपंचाशत्क बुद्धस्तोत्र’.

     २. शिक्षणविषयक ग्रंथ : ‘चिंतन : बळीराजा ते रवींद्रनाथ’, ‘बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते’, ‘चांदण्यात भिजायचे राहून जाऊ नये, म्हणून’, ‘त्यांना सावलीत वाढवू नका!’, ‘शंभर कोटी मेंदू, दोनशे कोटी हात’, ‘मित्रांना शत्रू करू नका’, ‘मन निरभ्र व्हावे’, ‘परिवर्तन : शास्त्रही, कलाही’.

     ३. चरित्रात्मक ग्रंथ : ‘विद्रोही तुकाराम’, ‘तुकारामांचा शेतकरी’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध’, ‘शिवराय : संस्कार आणि शिक्षण’.

    ४. सांस्कृतिक इतिहासपर ग्रंथ : ‘बळीवंश’, ‘परशुराम ः जोडण्याचे प्रतीक की तोडण्याचे?’ ‘एकलव्य, शंबूक व झलकारीबाई’.

    ५. स्त्रीविषयक ग्रंथ : ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’, ‘महाभारतातील स्त्रिया’, भाग १ व २, ‘तुळशीचे लग्न : एक समीक्षा’.

    ६. ललित ग्रंथ : ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’, ‘अशी भेटत रहा तू’, ‘जीवनाची लय वेदनेत’.

    ७. भाषणसंग्रह : ‘संवाद सहृदय श्रोत्यांशी’, ‘ना गुलाम ना उद्दाम’, ‘अंधाराचे बुरूज ढासळतील!’ ‘हृदयातून हृदयांकडे’.

   ८. आक्षेपांना उत्तरे : ‘वादांची वादळे’, ‘सर्वोत्तम

    भूमिपुत्र : आक्षेप - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि लेखकाची भूमिका’.

    ९. भाषांतरित ग्रंथ : इतर लेखकांच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठी भाषांतर : १) ‘स्वातंत्र्याचे भय’, २) ‘शीख धर्मातील धर्मनिरपेक्ष जाणिवा’, ३) ‘नागार्जुन’.

  • संस्कृत ग्रंथांचे मराठी भाषांतर : ‘शाहूचरितम्’- लाटकर शास्त्री.

   १०. लेख : ‘मराठी विश्वकोशात संस्कृत आणि तुलनात्मक धर्मशास्त्र’ या विषयावर सुमारे शंभर लेख.

साळुंखे यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर विविध विषयांवर शेकडो व्याख्याने दिलेली आहेत.

     संमेलन अध्यक्षपदे : ‘विचारवेध संमेलन’ (बेळगाव), ‘सत्यशोधक साहित्य संमेलन’ (लातूर), ‘विद्रोही साहित्य संमेलन’ (सोलापूर), ‘ग्रमीण साहित्य संमेलन’ (विटा, जि. सांगली), ‘सत्यशोधक समाज’ पस्तिसावे अधिवेशन’ (गेवराई, जि. बीड), ‘शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद’, तेरावे अधिवेशन (आटपाडी, जि. सांगली).

    साळुंखे यांना पंचाहत्तरहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांतील काही उल्लेखनीय पुरस्कार याप्रमाणे :

     ‘महाराष्ट्र फाउण्डेशन (अमेरिका) साहित्य’ पुरस्कार (१९९४-९५), ‘यशवंतराव चव्हाण ज्ञान-विज्ञान मंडळ’, वाई, जि. सातारा यांच्याकडून सन्मानपत्र (२०१०), ‘दलित मित्र’ (महाराष्ट्र शासन) पुरस्कार (२००६), ‘कविकुलगुरू कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार (महाराष्ट्र शासन), राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्ट, कोल्हापूर यांचा ‘राजर्षी शाहू’ पुरस्कार (२०१०), ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव’ पुरस्कार (२०११), ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती’, दिग्रस, जि. यवतमाळ यांच्याकडून सन्मानपत्र (२०११).

     विशेष : महाराष्ट्र शासनाने सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्याचे जे सांस्कृतिक धोरण जाहीर केले, त्या धोरणाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष.

     डॉ. साळुंखे यांनी ‘हिंदू धर्म’, ‘चार्वाक’, ‘मनुस्मृती’, ‘बळीराजा’, ‘गौतम बुद्ध’, ‘फुले’, ‘शाहू’, ‘आंबेडकर’ इत्यादी विषयांवर शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांचे व्याख्यान ही एक बौद्धिक मेजवानी असते. त्यांची लेखणी आणि वाणी बहुजन समाजाला नवी दिशा देण्याचे, त्यांची अस्मिता जागृत करण्याचे, धर्माकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देण्याचे बहुमोल कार्य करीत आहे. त्यांची व्याख्याने व ग्रंथसंपदा म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक घडामोडीचा आढावाच आहे.

प्रा. डॉ. शिवदास कुंडलिक जाधव

साळुंखे, आण्णा हरी