Skip to main content
x

साराभाई, विक्रम

      प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक. डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म गुजरात मधील अहमदाबाद येथील एका नामवंत उद्योजक घराण्यात झाला. त्यांनी आपले सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयातून घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील केंब्रिज येथील सेंट जॉन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला व तेथून नैसर्गिक विज्ञान (नॅचरल सायन्सेस) या शाखेतील ‘ट्रायपॉस’ हा मान प्राप्त केला. दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाल्याने ते इ.स. १९४० साली भारतात परतले आणि त्यांनी बंगलोर (बंगळुरू) येथील ‘भारतीय विज्ञान संस्थे’त नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ.चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संशोधनास सुरुवात केली. महायुद्ध संपल्यावर १९४५ साली साराभाई पुन: केंब्रिज येथे रवाना झाले आणि पीएच.डी. ही पदवी प्राप्त करून १९४७ साली ते भारतात परतले. डॉ. साराभाई यांचा पीएच.डी.चा प्रबंध हा विषुववृत्ताजवळील प्रदेशातून केल्या गेलेल्या वैश्विक किरणांच्या निरीक्षणांवर आधारित आहे.

     भारतात परतल्यावर त्याच वर्षी डॉ.साराभाई यांनी अहमदाबाद येथे ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ (पी.आर.एल.) स्थापना केली. या संस्थेच्या मुख्य इमारतीची पायाभरणी १९५२ साली डॉ.रमण यांच्या हस्ते झाली. सुरुवातीस वैश्विक किरण आणि वातावरणाच्या वरच्या थरांच्या गुणधर्मांशी संबंधित संशोधनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या प्रयोगशाळेत त्यानंतर सैद्धान्तिक भौतिकशास्त्र, रेडिओभौतिकशास्त्र, तसेच ग्रहविज्ञान, सौरखगोलशास्त्र अशा अनेक शाखांतील संशोधन केले जाऊ लागले. अहमदाबादमधील एका महाविद्यालयातील दोन खोल्यांत १९४७ साली स्थापन झालेली ही प्रयोगशाळा आता भौतिकशास्त्रातील आघाडीवरची प्रयोगशाळा म्हणून नावारूपास आली आहे. साराभाईंनी वैश्विक किरणांचा अभ्यास करण्यासाठी अहमदाबादबरोबरच त्रिवेंद्रम, कोडाईकनाल आणि गुलमर्ग येथेही विशेष वेधशाळा उभारल्या.

     वैश्विक किरण हे आंतरग्रहीय पोकळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे निर्देशक आहेत. भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत ‘विविध दिशांनी पृथ्वीवर आदळणाऱ्या वैश्विक किरणांत आढळणारा अल्पसा दिशानुरूप फरक हा या किरणांनी ज्या प्रदेशातून मार्गक्रमण केले, त्या प्रदेशातील विद्युत्चुंबकीय गुणधर्मांवर अवलंबून असतो, या तर्काला डॉ.साराभाईंनी केलेल्या संशोधनातून पुष्टी मिळाली. साराभाईंनी व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेल्या संशोधनाद्वारे वैश्विक किरणांच्या तीव्रतेत सौरचक्रानुसार व सूर्याच्या स्वत:भोवती फिरण्यानुसार होणाऱ्या बदलांचाही मागोवा घेतला गेला. सूर्य-पृथ्वी यांच्यातल्या संबंधांशी निगडित असे हे संशोधन होते.

     पृथ्वीभोवतालच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने पृथ्वीवरील चुंबकीय वैषुविकवृत्तावरून केलेली निरीक्षणे महत्त्वाची ठरतात. दक्षिण भारतातून हे चुंबकीय वैषुविकवृत्त जात असल्यामुळे डॉ.साराभाईंनी या प्रदेशातून अग्निबाण सोडून त्याद्वारे ही निरीक्षणे करण्याचे ठरवले. वैश्विक किरणांवरील या संशोधनाबरोबरच दळणवळण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध, शिक्षणाचा प्रसार यांसाठीही अंतराळशास्त्राचा उपयोग होणार असल्याने, दूरदृष्टीच्या डॉ.साराभाईंनी अग्निबाण प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज ओळखली. १९६२ साली अंतराळसंशोधनासाठी अणुशक्ती विभागाच्या अखत्यारीतली राष्ट्रीय समिती स्थापन झाली आणि भारतातील अंतराळकार्यक्रमाला डॉ.साराभाई यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. या कार्यक्रमाद्वारे डॉ.साराभाईंनी थिरुवअनंतपुरमजवळील थुंबा येथे वैषुविक अग्निबाण प्रक्षेपण स्थानक उभारले. या स्थानकावरून दि.२१ नोव्हेंबर, १९६३ साली पहिल्या अग्निबाणाचे प्रक्षेपण केले गेले. १९६९ साली अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत ‘भारतीय अंतराळ संशोधन संघटने’ची निर्मिती केली गेली. भविष्यात अतिशय यशस्वी ठरलेल्या ‘इन्सॅट’ या बहुउद्देशीय उपग्रह मालिकेचा प्राथमिक आराखडा डॉ. साराभाईंच्याच पुढाकारातून तयार झाला.

     डॉ.साराभाई यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनेक महत्त्वाची पदे सांभाळली होती. डॉ. होमी भाभा यांच्या १९६६ साली झालेल्या अपघाती मृत्यूनंतर डॉ.साराभाई यांच्याकडे अणुशक्ती आयोगाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. डॉ.साराभाई हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचेही सदस्य होते, तसेच १९६८ साली संयुक्त राष्ट्रसंघाने विएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आयोजित केलेल्या पहिल्या अंतराळविषयक परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. १९७० सालच्या विएन्ना येथीलच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद आणि १९७१ साली जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आयोजित केल्या गेलेल्या अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांसंबंधीच्या चैाथ्या परिषदेचे उपाध्यक्षपदही साराभाईंनी भूषवले होते. डॉ. साराभाईंनी केलेल्या वैश्विक किरणांशी संबंधित अशा संशोधनामुळे त्यांना आंंतरराष्ट्रीय ‘शुद्ध आणि उपयोजित भौतिकशास्त्र संघटने’चे सदस्यपद तर मिळालेच; पण याच संघटनेने स्थापन केलेल्या वैश्विक किरणांच्या स्वरूपांत विविध कारणांनी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेल्या उपआयोगाच्या सचिवपदीही त्यांची नियुक्ती केली गेली. डॉ. साराभाई हे १९६२ सालच्या भटनागर पारितोषिकाचे मानकरी होते. १९६६ साली त्यांना ‘पद्मभूषण’ हा सन्मान बहाल करण्यात आला.

     सरकारी संस्थांबरोबरच खाजगी संस्था व उद्योगांच्या उभारणीतही डॉ.साराभाईंचा सहभाग होता. यात कापड उद्योगात संशोधन करणाऱ्या ‘अ‍ॅटिरा’ आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या ‘भारतीय व्यवस्थापन संस्था’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) या अहमदाबाद येथील संस्थांचा समावेश आहे. रसायनांच्या व औषधांच्या दर्जाचे महत्त्व जाणणारे साराभाई हे या क्षेत्रांतील उद्योगांशीही संबंधित होते. विज्ञानाचा फायदा हा समाजातील सर्व स्तरांना मिळावा यासाठी डॉ. विक्रम साराभाईंचा कटाक्ष होता. मुलांंच्यात आणि इतर जनसामान्यांत विज्ञानाची रुची निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी अहमदाबाद येथे विज्ञान केंद्रही (विक्रम ए. साराभाई  कम्युनिटी  सायन्स सेंटर) स्थापन केले.

     विज्ञानाबरोबरच इतर अनेक अभिजात कलांत रस घेणाऱ्या डॉ. साराभाई यांनी नृत्यकलेत निपुण असणाऱ्या आपल्या पत्नी मृणालिनी यांच्या सहकार्याने अहमदाबाद येथे ‘दर्पण’ ही कलाविषयांना वाहिलेली अकादमी स्थापन केली. वैज्ञानिक संशोधन, उद्योग आणि कला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ.साराभाईंना वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी मृत्यू आला. भारतीय अंतराळ कार्यक्रमातील साराभाईंच्या अतुलनीय योगदानाबद्दल इ.स. १९७२ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ या सन्मानाने मृत्युपश्चात गौरवण्यात आले. थुंबा येथील अंतराळ संशोधन केंद्रालाही त्यांच्या स्मरणार्थ ‘विक्रम साराभाई अंतराळ केंद्र’ हे नाव दिले गेले आहे.

डॉ. राजीव चिटणीस

साराभाई, विक्रम