Skip to main content
x

शेकार, वासुदेव भीमराव

           वासुदेव भीमराव शेकार यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील शिरखेड या गावी शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व शालेय शिक्षण शिरखेड येथेच पूर्ण झाले. त्यांनी अमरावती येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळवून १९६३मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी व १९६५मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी मिळवली. नंतर अमरावती येथील कृषी महाविद्यालयात अल्पकाळ व्याख्यात्याची नोकरी केली. त्यांची १९६५मध्ये कृषि-अधिकारी म्हणून परभणीच्या ज्वारी संशोधन केंद्रात नियुक्ती झाली. शैक्षणिक गुणवत्ता आणि व्यावसायिक कौशल्य यांमुळे त्यांना नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.त पीएच.डी.साठी प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. त्यांनी १९७७मध्ये गुणवत्तेसह पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांच्या व्यावसायिक जीवनाला डॉ.पं.दे.कृ.वि.त ज्वारी-पैदासकार म्हणून सुरुवात झाली. त्यांनी ज्वारीचे संकरित वाण विकसित केले. सीएसएच १४, सीएसएच १९, सुधारित रामकेळ, या जाती राष्ट्रीय स्तरावर निवडण्याचे श्रेय त्यांनाच जाते. तसेच राज्य स्तरावर त्यांनी  एसपीएच ८८, एसपीएच ८४ व एसपीव्ही ६६९ हे ३ वाण विकसित केले. त्यांनी १९९४ ते १९९८ या कार्यकाळामध्ये विद्यापीठ स्तरावर वनस्पतिशास्त्राचे विभागप्रमुख म्हणून कार्य केले. त्यांनी १९९८मध्ये अकोला येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्यपदही भूषवले. त्यांची पदोन्नती होऊन १९९९मध्ये विद्यापीठाचे संशोधन संचालक म्हणून निवड झाली. ते सप्टेंबर २००१मध्ये निवृत्त झाले. डॉ. शेकार यांना १९८८मध्ये ज्वारीवरील उत्कृष्ट संशोधन केले म्हणून महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण पुरस्कार दिला. त्यानंतर १९९९मध्ये हरयाणा कृषी विद्यापीठातर्फे सर राम पुरस्कार देऊन त्यांना गौरवले. तसेच त्यांना राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर व वसंतराव नाईक प्रतिष्ठानच्या वतीने मानचिन्ह दिले.

- डॉ. शरद यादव कुलकर्णी

शेकार, वासुदेव भीमराव