Skip to main content
x

ठकार, वामन नारायण

वामन नारायण ठकार यांचा जन्म कोल्हापुरात झाला. त्यांच्या घरात कोणालाही संगीताची आवड नव्हती. वामन यांना मात्र बालपणापासूनच संगीतात रस होता. आपले हातातले काम सोडून ते कीर्तन ऐकण्याकडे लक्ष देत. त्यांचा आवाजही भरदार आणि त्याचबरोबर गोड होता.  त्या वेळी गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर कोल्हापुरात आले होते. वामनरावांचे थोरले बंधू त्यांना पलुसकरांकडे घेऊन गेले आणि पलुसकरांनी वामनरावांना शिकवावे, अशी त्यांना विनंती केली. वामनरावांना १९१२ साली पं. पलुसकरांकडे पाठविण्यात आले.

पं. विष्णू दिगंबरांकडे, लाहोरच्या गांधर्व महाविद्यालयात वामनरावांचे शिक्षण सुरू झाले. गुरुजींबरोबर संगीताच्या दौर्‍यांच्या निमित्ताने वामनराव भारताच्या कानाकोपर्‍यांत गेले. त्यांचे नाशिक, नागपूर, कोलकाता, मुंबई, वाराणसी, अलाहाबादपासून ते जम्मू-काश्मीरपर्यंत भ्रमण झाले.

वामनराव १९२५ पर्यंत पं. पलुसकरांच्या सहवासात राहून घरी परतले आणि त्याच वर्षी त्यांचा विवाह झाला. मग भावनगरमध्ये ‘दक्षिणामूर्ती विद्यालया’त संगीत शिक्षक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. तिथेच त्यांनी ‘सौराष्ट्र संगीत विद्यालया’ची स्थापना केली. पण भावनगरमध्ये संगीताचे वातावरण नव्हते. त्याच वेळी गुरुबंधू विष्णू अण्णा कशाळकरांनी वामनरावांना प्रयागला येण्याचा आग्रह केला. म्हणून १५ जुलै १९२९ रोजी ते प्रयाग संगीत समितीत गेले. प्रयाग विद्यापीठात १९४६ पर्यंत ते प्राध्यापक म्हणून कार्यरत राहिले. त्या दरम्यान के.पी. इंटर कॉलेज, अलाहाबादमध्ये ते सहा वर्षे सेवारत राहिले.

त्यांचे पुत्र श्रीकांत ठकार हे संगीत शिक्षणाचे कार्य करीत आहेत. वामनरावांनी आपल्या शिष्यांवरही पुत्रवत प्रेम केले. त्यांचे अक्षर छान होते, त्यामुळे नाशिकच्या रामनाम आधार आश्रमात गायनाचार्य पलुसकरांसाठी जी ‘रामचरितमानसा’ची मोठ्या अक्षरातली प्रत शिष्यांनी लिहून तयार केली होती, त्या लिखाणात वामनरावांचाही सहभाग होता. वामनराव ठकार यांचे वाराणसी येथे निधन झाले.

डॉ. सुधा पटवर्धन

ठकार, वामन नारायण