Skip to main content
x

जांभेकर, बाळशास्त्री गंगाधरशास्त्री

     बाळशास्त्री गंगाधरशास्री जांभेकर मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक होते. पहिल्या आंग्लविद्याविभूषित पिढीतील ते अग्रगण्य विद्वान होते.

     रत्नागिरी जिल्ह्यातील पोंबुर्ले गावी बाळशास्त्रींचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधरशास्त्री हे विद्वान संस्कृत पंडित होते. बाळशास्त्रींचे प्राथमिक शिक्षण आपल्या वडिलांकडे झाले. बाळशास्त्री लहानपणापासून अतिशय हुशार होते. वडिलांजवळ संस्कृत व मराठी भाषांचे अध्ययन करून त्यांनी त्यावर प्रभुत्व मिळविले. पुढील शिक्षणासाठी ते मुंबईस आले व सन १८२५ च्या सुमारास ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेत दाखल झाले. तेथे त्यांनी सदाशिव काशीनाथ ऊर्फ बापू छत्रे व बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत विषयाचा अभ्यास केला. या दोन विषयांखेरीज गणित, शास्त्र, इतिहास, भूगोल या विषयांतही त्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केले.

     थोड्याच काळात, अल्पवयातच त्यांना त्याच संस्थेत गणिताच्या अध्यापकाची जागा मिळाली. त्यांची बुद्धिमत्ता पाहून इ.स. १८३० मध्ये नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी नेटिव्ह सेक्रेटरीच्या जागेवर त्यांची नेमणूक करण्यात आली व दोन वर्षांतच त्यांना ‘नेटिव्ह सेक्रेटरी’पदावर बढती मिळाली. तोपर्यंत केवळ युरोपियन लोकांनाच हा मान मिळत असे. सेक्रेटरी पदावर काम करत असताना त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरेही केली. त्यानंतरच्या काळात त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करून अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.

     एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले साहाय्यक प्राध्यापक, शाळातपासनीस, अध्यापक, शाळेचे संचालक इत्यादी प्रतिष्ठेच्या पदांवर त्यांनी काम केले व गणित आणि इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक म्हणून लौकिक संपादन केला. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या मुंबई शाखेचे सचिव म्हणून त्यांची निवड झाली हा त्यांच्या कर्तृत्वाचा बहुमानच होता.

     आपल्या सर्व जबाबदाऱ्या उत्तम रितीने पार पाडत असतानाच बाळशास्त्री जांभेकरांनी आपला व्यासंग वाढविला आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य विद्वान म्हणून मान मिळविला. गणित, भूगोल, व्याकरण इत्यादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली, तसेच ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून त्यांनी काही पाठभेदही सुचविले. रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकामध्ये भारतीय शिलालेख व ताम्रपट यांविषयी त्यांचे संशोधनात्मक निबंध प्रकाशित होत असत.

     ज्या विद्येपासून वंचित राहिल्यामुळे आपल्या देशाची अवनती झाली व ज्या विद्येमुळे पाश्चात्त्य देशांची आश्चर्यकारक प्रगती झाली, त्या विद्येचा प्रसार करणे हे बाळशास्त्रींनी आपले जीवितध्येय ठरविले. त्यासाठी त्यांनी इ.स. १८३२ मध्ये मुंबईत ‘दर्पण’ हे पहिले मराठी-इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. एकाच वेळी शेकडो लोकांपर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे उत्कृष्ट साधन म्हणजे वृत्तपत्र! वृत्तपत्राची ही शक्ती ओळखून त्याच्याद्वारे त्यांनी ज्ञानाची क्षितिजे समाजापुढे खुली केली. त्याचबरोबर समाजाचे प्रबोधन करून आपले विचार खुलेपणाने व्यक्त करण्याचे साधन लोकांना उपलब्ध करून दिले. आपल्या वृत्तपत्राला ‘दर्पण’ हे नाव देऊन ते समाजाचे यथातथ्य प्रतिबिंब दाखविते हे सूचित केले. वृत्तपत्राबरोबरच इ.स. १८४० मध्ये त्यांनी ‘दिग्दर्शन’ हे मासिकही सुरू केले. आपल्या नियतकालिकांद्वारे त्यांनी सामाजिक सुधारणांचाही पुरस्कार केला आणि पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण, स्त्री-पुरुष समान हक्क इ. विषयांना वाचा फोडली.

     अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कोणतीही पूर्वपरंपरा नसताना त्यांनी वृत्तपत्राची मांडणी, विषय, भाषा, अग्रलेख, स्फुटे यांविषयी निकषही ठरविले आणि वृत्तपत्राचा आदर्श समाजापुढे ठेवला. प्रकांडपंडित असूनही आपल्या लेखनात त्यांनी सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेचाच उपयोग केला.

- र. म. भागवत

जांभेकर, बाळशास्त्री गंगाधरशास्त्री