Skip to main content
x

काकोडकर, अनिल पुरुषोत्तम

भारताच्या अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणु उर्जा विभागाचे सचिव म्हणून परिचित असलेले डॉ.अनिल पुरुषोत्तम काकोडकर यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी आहे. मध्यप्रदेशातील बडवाणी इथे जन्मलेल्या काकोडकरांचे शालेय शिक्षण खरगोण इथल्या देवी श्री अहिल्याबाई हायस्कूलमध्ये व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील रूपारेल महाविद्यालयात झाले. १९६३ साली त्यांनी मुंबईच्या वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) मध्ये (ऑनर्स) पदवी संपादन केली. अणुऊर्जा विभागातर्फे  चालवण्यात येणाऱ्या भाभा अणू संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण केंद्रात एक वर्षाचा पदव्युत्तर विशेष शिक्षणक्रम पूर्ण केला. त्या वर्षीच्या उत्तीर्ण झालेल्या एकूण प्रशिक्षणार्थींच्या तुकडीमध्ये काकोडकर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

भाभा अणू संशोधन केंद्रात अणुभट्ट्यांच्या विविध बांधणी प्रकल्पांसाठी काम करण्याची उत्तम संधी काकोडकरांना लाभली. आपल्या पंचेचाळीस वर्षांच्या व्यावसायिक कारकिर्दीत, विशेष करून, जड पाण्यावर आधारित अणुभट्टीच्या (आण्विक रिअ‍ॅक्टर)च्या निरनिराळ्या यांत्रिक संरचना, त्यांची क्षमता उंचावण्यासाठीच्या सुधारणा व अनपेक्षित, अपघाती कारणांनी होऊ शकणाऱ्या किरणोत्सारामुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपायांची तरतूद या क्षेत्रांतील संशोधनात डॉ.काकोडकरांनी मोलाची भर घातली आहे. अणुऊर्जेशी संबंधित अभियांत्रिकी राबवताना, सुरक्षिततेकडे सदैव बारकाईने लक्ष ठेवावे लागते. त्या बाबतीतील आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (इंटरनॅशनल अ‍ॅटॉमिक एनर्जी एजन्सी - आय.ए.ई.ए.) निरनिराळ्या समित्यांच्या कामांत त्यांचा सातत्याने सहभाग असतो. आण्विक अभियांत्रिकी (न्यूक्लिअर इंजिनिअरिंग) मधील गुणवत्ता प्रमाणित करण्याकरिता लागणारा मसुदा आय.ए.ई.ए.तर्फे तयार करण्यातही काकोडकरांचा महत्त्वाचा वाटा आहे.

तुर्भे येथे कार्यरत झालेल्या अप्सरानावाच्या भारतातील पहिल्या अणुभट्टीत, साध्या पाण्याचे (नॅचरल वॉटरचे) आवरण वापरण्यात आले (म्हणूनच अशा प्रकारच्या अणुभट्ट्यांना स्विमिंग पूल रिअ‍ॅक्टरअशी संज्ञा आहे). त्यानंतर तुर्भे येथे कार्यान्वित झालेली दुसरी सी.आय.आर. (कॅनडा इंडिया रिअ‍ॅक्टर) ही अणुभट्टी, कॅनडातून आयात केलेल्या जड पाण्याच्या उपयोगावर आधारित (हेवी वॉटर मॉडरेटेड) आहे. आता तिचे सायरसअसे नाव प्रचलित आहे.

काकोडकरांनी १९६४ साली भाभा अणू संशोधन केंद्र उपयोजित अभियांत्रिकी स्वरूपाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, त्या वेळी भाभा अणू संशोधन केंद्राच्या (रिअ‍ॅक्टर इंजिनिअरिंग) अणुभट्टी अभियांत्रिकी प्रभागात नव्याने रुजू झालेल्या बहुतेक सर्व हुशार, होतकरू अभियंत्यांना, ‘हेवी वॉटर मॉडरेटेडप्रकारच्या अणुभट्ट्यांच्या संरचनांच्या प्रगत, प्रात्यक्षिक अनुभवासाठी कॅनडात पाठवण्याचे धोरण राबविण्यात येत होते. पण अणुभट्टी अभियांत्रिकीशी संबंधित सर्व मूलभूत तत्त्वांच्या पायाभूत ज्ञानाच्या आवश्यकतेची जाणीव सुरुवातीपासूनच वेळोवेळी त्यांना होऊ लागली होती व त्यासाठी पद्धतशीर क्रमिक अभ्यासाद्वारे, अणुभट्टी बांधणीसंबंधीच्या विशेष अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर शिक्षणाचा त्यांनी ध्यास घेतला. त्यामुळे कनेडियन सहकार्याच्या करारांतर्गत कॅनडात जाण्याऐवजी, अन्य परदेशी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासासाठी जाण्याचा त्यांनी आग्रह धरला व त्यासाठी संयमाने काही दिवस धीरही धरला. अखेरीस त्यांना अमेरिकेतील नॉटिंगहॅम विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली व तिथे प्रायोगिक ताण विश्‍लेषण (एक्सपरिमेंटल स्ट्रेस अ‍ॅनालिसिस)द्वारा वेगवेगळ्या परिस्थितीत पदार्थांवरील ताणमापनाच्या तंत्राचा सखोल अभ्यास करून १९६९ साली काकोडकरांनी एम.एस्सी. पदवी मिळवली.

सुरुवातीपासूनच विद्युत ऊर्जानिर्मिती हे भारतीय अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचे प्रमुख ध्येय आहे. त्या अंतर्गत आण्विक प्रक्रियांद्वारे, देशात विविध ठिकाणी विद्युत ऊर्जानिर्मिती केंद्राच्या उभारणीबरोबरच, त्यासाठी लागणाऱ्या इंधनाची आवश्यकता पूर्ण करण्याच्या दिशेनेही योजनाबद्ध कार्यक्रम भारतात राबविण्यात येत आहे. विशेषत: युरेनियम व झिरकोनियम धातूच्या निर्मिती उद्योगाची वाढ करण्याच्या कामाचे नेतृत्व काकोडकरांनी समर्थपणे केलेले आहे. जड पाणी वापरणाऱ्या प्रगत अणुभट्टी बांधणीच्या कामात गुंतलेल्या अभियंत्यांचे ते प्रमुख प्रेरणास्रोत आहेतच, त्याचबरोबर ऊर्जानिर्मितीसाठी थोरियमचा उपयोग वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये ते सक्रिय आहेत. भारतातील अणुऊर्जानिर्मितीच्या कार्यक्रमाचा तिसरा टप्पा, थोरियमच्या उपयोगातून समृद्ध करण्याच्या महत्त्वाच्या पर्यायाचे पथदर्शक म्हणून डॉ. काकोडकरांची भूमिका वादातीत ठरते. त्या दिशेने देशात व्यापारी तत्त्वावर फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ (एफ.बी.टी.आर.) चा वापर यशस्वी करण्याचे प्रमुख श्रेयही त्यांना आहेच. भारतात उपलब्ध असलेला थोरियमचा मुबलक साठा विचारात घेता, त्याच्या जोडीला देशातील युरेनियम साठा वापरून, एफ.बी.टी.आर.द्वारे साध्य होणाऱ्या विद्युत्पुरवठ्यात लक्षणीय वाढ होईल ती वेगळीच. परिणामी, डॉ.काकोडकरांच्या कुशल प्रयत्नांनी, प्रगत अणू तंत्रज्ञानाचा यशस्विरीत्या वापर करणारा देश म्हणून भारताला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मानाचे स्थान लाभले आहे. भारताने अमेरिकेबरोबर केलेल्या नागरी अणुऊर्जेसाठीच्या सहकार करारासाठी, तसेच हे करार कार्यान्वित करण्यास आय.ए.ई.ए.बरोबर असे करार करण्यासाठी, काकोडकरांनी मोलाचे साहाय्य केलेले आहे.

उपयोजित अणुविज्ञानाचे प्रगत शिक्षण घेतलेले असल्याने, आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरांसाठी, ठिकठिकाणच्या प्रयोगशाळा व संशोधन संस्थांमधील कार्यकुशल अनुभवाचा विधायक उपयोग कसा करून घेता येईल, याचा ते सतत वेध घेत असतात. ऊर्जा विभागांतर्गत, आण्विक प्रक्रियासंबंधीचे वैज्ञानिक उच्च संशोधन करणाऱ्या, देशातील ठिकठिकाणच्या केंद्रांतून, विशेष गरजांच्या पूर्ततेसाठी, वेळोवेळी तऱ्हेतऱ्हेचे तंत्रज्ञान विकसित केले जाते. कोलकातास्थित सायक्लोट्रॉनच्या निर्मितीत, शेकडो टन वजनाच्या इलेक्ट्रो-मॅग्नेटसाठी विकसित केलेले तंत्रज्ञान, तिरुचेरापल्ली येथील एम.एच.डी. ऊर्जा निर्मिती संयंत्राच्या उभारणीच्या वेळी, तसेच इंदूरच्या राजा रामण्णा सेंटर फॉर अ‍ॅडव्हॉन्स टेक्नॉलॉजी’ (आर. आर. कॅट) मधील इंडसनावाच्या प्रवेग यंत्रासाठी कामी आले.

जाड स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्सचे हाय व्हॅक्युम टाइट वेल्डिंगकरण्यास तुर्भे येथील भाभा अणू संशोधन केंद्रात सिद्ध झालेल्या प्लाझमा टॉर्चच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचा पुढे अनेक ऊर्जा प्रकल्पांत मोलाचा उपयोग झाला. ऑक्सिजन फ्री हाय कंडक्टिव्हिटी कॉपरया एका विशिष्ट प्रकारच्या तांब्याचे (ओ.एफ.एच.सी.) जाड विद्युत्वाहक रूळ न वापरता, एकमेकांना इंडक्शन वेल्डिंगने जोडण्याचे, कोलकात्याच्या सायक्लोटॉनसाठी आत्मसात केलेले स्वदेशी कौशल्य तर देशातील अनेक उद्योगांनादेखील वरदायी ठरले. या सर्व अनुभवांतून वेळोवेळी भारतात विकसित होत असलेल्या प्रगत तंत्रज्ञानाचे औद्योगिक महत्त्व चांगलेच अधोरेखित झालेले असल्याने, नवनवीन तंत्रज्ञानाला अनुरूप अशा बहुउद्देशीय प्रशिक्षणाचे एक नवे, अनोखे केंद्र भुवनेश्‍वर येथे काकोडकरांच्या प्रयत्नांनी साकार होत आहे.

तुर्भे येथील भाभा अणू संशोधन केंद्रातील ध्रुवया नावाच्या १०० मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीच्या उभारणीत काकोडकरांचा सिंहाचा वाटा होता. अगदी नवीन संकल्पनेवर आधारित या अणुभट्टीची रचना व बांधणीमध्ये त्यांनी सुरुवातीपासून महत्त्वाची भूमिका तर बजावलीच; परंतु त्याखेरीज त्याच्या उभारणीसाठी भिन्न गुणधर्मांच्या धातूंचे भाग जोडायला, भारतात प्रथमच विकसित केलेल्या, ‘इलेक्ट्रॉन बीम वेल्डिंगसारख्या आघाडीच्या अनेक आधुनिक तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर यशस्वी उपयोग केला. चेन्नईजवळील कल्पक्कम येथील अणुभट्टीच्या दोन्ही संयत्रांमधील अनपेक्षित बिघाडांमुळे, तो प्रकल्प जेव्हा मोडकळीच्या मार्गावर होता, त्या वेळी काकोडकरांनी जिद्दीने त्याचे पुनर्वसन करून दाखवले.

प्रगत अभियांत्रिकी मार्गांनी अवघड प्रश्‍नांची उकल करण्याचे काकोडकरांच्या अंगी असलेले कौशल्य, त्या संदर्भात उल्लेखनीय ठरले आहे. आण्विक विज्ञान व तंत्रज्ञानातील अनेकविध बारकाव्यांचा काकोडकरांनी केलेला सखोल अभ्यास व तत्संबंधीच्या त्यांच्या अभियांत्रिकीतील कौशल्याच्या गौरवार्थ, मैसूर, मंगळूर, गुरुनानक देव इत्यादी विद्यापीठे, तसेच विश्वेश्वरय्या तंत्रशास्त्र विद्यापीठ (टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था, आय.आय.टी. मुंबई, अशा अनेक शिक्षणसंस्थांनी, त्यांच्या सन्माननीय डॉक्टर ऑफ सायन्सपदव्या काकोडकरांना प्रदान केलेल्या आहेत. त्याशिवाय टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठ, गोवा विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ यांच्या डी.लिट. पदव्यांनीही ते सन्मानित आहेत. 

१९९८ साली पद्मश्री’, १९९९ साली पद्मभूषणव २००९ साली पद्मविभूषणअसे तिन्ही उच्च राष्ट्रीय नागरी सन्मान डॉ.काकोडकरांना लाभले. ते इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे आय.एन.ए.ई. १९९९- २००० सालांदरम्यानचे अध्यक्ष होते, इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्सेस, इत्यादी मान्यवर व्यावसायिक संस्थांचे ते फेलोआहेत. शिवाय इंडियन न्यूक्लिअर सोसायटी, इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स (आय.ई.टी.ई.) इंडिया या संस्थांनीही त्यांना मानद फेलोशिप प्रदान केलेली आहे. इंटरनॅशनल न्यूक्लिअर एनर्जी अकॅडमी, वर्ल्ड इनोव्हेशन फाउण्डेशन, कौन्सिल ऑफ अ‍ॅडव्हाइजर ऑफ वर्ल्ड न्यूक्लिअर युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल न्यूक्लिअर सेफ्टी ग्रूप (आय.एन.एस.जी.) इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सभासद आहेत.

१९८८ साली त्यांना हरी ओम आश्रम प्रेरित, ‘विक्रम साराभाई पारितोषिकमिळाले. मटेरिअल रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया (एम.आर.एस.आय.) संस्थेच्या १९९७ सालच्या वार्षिक पारितोषिकाचे, तसेच रॉकवेल मेडल फॉर एक्सलन्स इन टेक्नॉलॉजी-१९९७चे ते मानकरी आहेत. त्याच वर्षी सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीतील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा फिरोदिया पुरस्कारव न्यूक्लिअर इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीतील अद्वितीय कामगिरीसाठीचा १९९७ - १९९८ सालचा एफ.आय.सी.सी.आय. पुरस्कार’, अशा दोन मानाच्या पारितोषिकांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. पाठोपाठ, १९९८ साली आण्विक शास्रातील कामगिरीबद्दलचा अ‍ॅनाकॉनचा आजीवन पुरस्कारव सर्वोत्कृष्ट संशोधकाला नाफेनतर्फे दिला जाणारा पुरस्कार काकोडकरांनाच मिळाला. इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा १९९९-२००० साठीचा होमी भाभा स्मृती पुरस्कार’, श्रीराम शास्रीय व औद्योगिक संशोधन प्रतिष्ठानच्या २००० सालच्या सुवर्णजयंतीनिमित्तचा पुरस्कार, ‘गोदावरी पुरस्कार’, २००१ सालचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय नागरिक पुरस्कार’, २००६ सालासाठीचा आय.एन.ए.ई.चा आजीवन अत्युत्कृष्ट अभियांत्रिकीचा पुरस्कार’, २००७ सालासाठीचे राममोहन मिशन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सिंघानिया यांचे पुरस्कार, अभियांत्रिकी व शैक्षणिक संशोधनासाठीचे २००९ सालचे महाराष्ट्र अकादमीचे भारत अस्मिता श्रेष्ठत्व पुरस्कार’, अशी काकोडकरांना मिळालेल्या विविध सन्मानांची मोठी यादी आहे.

आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अनेक प्रयत्नांमुळे सामान्य लोकांच्या राहणीमानात लक्षणीय सुधारणा होते, हा विकसित तसेच विकसनशील असा दोन्ही प्रकारच्या देशवासीयांचा अनुभव लक्षात घेऊन, ऊर्जानिर्मितीबरोबरच अणुशक्तीच्या वापराद्वारे होणाऱ्या इतर विधायक उपयोगांकडे डॉ.काकोडकरांनी विशेष लक्ष पुरविले आहे. आण्विक प्रक्रियांसाठी वापरण्यात येणाऱ्या अणुभट्टीचे तापमान नियंत्रित करण्यास क्षारविरहित पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी १९६० सालच्या दशकापासून भाभा अणू संशोधन केंद्रात डिसॅलिनेशन अ‍ॅन्ड एफ्लुएन्ट इंजिनिअरिंग डिव्हिजन’ (डी.ई.ई.डी.) नावाचा एक स्वतंत्र विभागच कार्यरत आहे. तेथे झालेल्या प्रदीर्घ संशोधनावर आधारित, ‘रिव्हर्स ओसमोसिस’ (आर.ओ.) तंत्रज्ञानाद्वारे खारे पाणी गोड करण्याची कार्यप्रणाली भाभा अणु संशोधन केंद्राने विकसित केली. त्या संशोधनावर आधारित नागरी व ग्रमीण वस्त्यांतील लोकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी आरओउपकरणे आता भारतभर ठिकठिकाणी वापरात दिसतात.

भारतातील अनेक विद्यापीठात विज्ञानाचे उच्चशिक्षण नीट देण्यात यावे यासाठी काकोडकरांनी प्रयत्न केले. किरणोत्साराचा उपयोग करून मिळणाऱ्या संकरित बियाणांचा पुरवठा, कांदे, बटाटे, फळफळावळ अशा नाशवंत पिकांची दीर्घकालीन साठवणूक, कॅन्सरसारख्या असाध्य रोगांशी परिणामकारक मुकाबला करणाऱ्या  आरोग्यकेंद्रांची ठिकठिकाणी स्थापना, अशा इतर अनेक आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे उत्तरदायित्वही ऊर्जा विभागाचेच आहे असे ठामपणे मानून, त्यासाठी झटणारी डॉ.काकोडकरांसारखी व्यक्तिमत्त्वे आपल्या देशाची खरी भूषणे आहेत.

- डॉ. अच्युत थत्ते

संदर्भ :
१.दै. महाराष्ट्र टाईम्स; १५ नोव्हेंबर २०००

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].