Skip to main content
x

काळे, प्रमोद पुरुषोत्तम

     प्रमोद पुरुषोत्तम काळे यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण बडोद्यात झाले. पहिली दोन वर्षे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते पुण्यात होते. फर्गसन महाविद्यालयातून इंटर सायन्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते पुन्हा शिक्षणासाठी बडोद्याला गेले. १९६० साली त्यांनी पदार्थविज्ञान या विषयात बी.एस्सी. ही पदवी महाराजा सयाजीराव विद्यापीठातून घेतली. त्यानंतर एम.एस्सी. करण्यासाठी ते अहमदाबाद येथे गेले. तेथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स या खास शाखेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.

     एम.एस्सी. करीत असतानाच, त्यांना अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीज (पी.आर.एल.) येथे काम करण्याची संधी मिळाली. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स तसेच अवकाश विज्ञानातील संशोधन त्यांना जवळून पाहता आले. या काळात मानवनिर्मित उपग्रह प्रदक्षिणा घालू लागले होते. त्यांचा मागोवा घेण्याचे शिक्षणही काळे यांना मिळाले. १९६२ साली त्यांना गुजरात विद्यापीठाची एम.एस्सी.ची पदवीही मिळाली.

     एम.एस्सी. झाल्यानंतर त्यांनी डॉ.विक्रम साराभाई यांच्या मार्गदर्शनाखाली अवकाश विज्ञानातील संशोधन सुरू केले. याच काळात भारतात थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनच्या (टर्ल्स) उभारणीची सुरूवात झाली होती. तिथे तरुण शास्रज्ञांची गरज होती. या शास्रज्ञांच्या चमूत प्रमोद काळे यांची निवड झाली. त्यामुळे ते त्रिवेंद्रमला गेले. थुंबा येथून पहिला अग्निबाण अवकाशगामी बनला, ते दृश्य पाहण्याचे भाग्य काळे यांना लाभले.

     ज्या तरुण भारतीय शास्त्रज्ञांना अवकाश संशोधनातील प्रगत शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यात आले, त्यात श्री.काळे यांचा समावेश होता. अमेरिकेत नासा (नॅशनल एअरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) या संस्थेच्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर येथे प्रगत शिक्षण घेऊन काळे भारतात परतले. गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर हे अमेरिकेच्या मेरिलँड राज्यात ग्रीन बेल्ट येथे काळे नंतर ‘इस्रो’ म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्थेमध्ये कार्यरत झाले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषविली.

     ते १९६७ ते १९६९ या काळात तिरुवअनंतपुरम येथील उपग्रह प्रणालीच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख होते, तर १९६९ - १९७२ या काळात गोडार्ड स्पेस फ्लाईट सेंटर येथे ते इस्रोचे स्थायी प्रतिनिधित्व करीत होते.  

     यानंतर १९७७ ते १९८७ या काळात ‘इन्सॅट-१’ या कार्यक्रमात अवकाशखंडाचे प्रकल्प संचालक म्हणून त्यांनी काम केले. १९८७ ते १९९४ दरम्यान ते अहमदाबाद येथील अवकाश उपयोजित केंद्र (स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर)चे संचालक म्हणून कार्यरत होते. यानंतर ते तिरुवअनंतपुरम इथल्या विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक बनले.

     दरम्यानच्या काळात विद्यापीठ अनुदान मंडळाच्या देशव्यापी दूरशिक्षण योजनेसाठी (कंट्रिवाईड क्लास रूम) त्यांनी विविध विषयांवर शैक्षणिक कार्यक्रम तयार केले. त्याचबरोबर, अवकाशातून संदेशवहन, दूर नियंत्रण, जलस्रोत संशोधन अशा विविध विषयांत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांना त्यांच्या संशोधनाची पावती म्हणून इ.स. १९८४ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विक्रम साराभाई पुरस्कार, आर.एल. वाधवा सुवर्णपदक इत्यादी सन्मानही त्यांना प्राप्त झाले.

     इ.स. २००१ साली निवृत्तीनंतर त्यांनी खाजगी क्षेत्रात प्रवेश केला; पण त्यांच्या ज्ञानाचा फायदा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना मिळावा म्हणून त्यांनी विद्यापीठात शिकवणेही सुरू केले. निवृत्तीनंतर पुणे विद्यापीठात त्यांनी अवकाश शास्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. याशिवाय त्यांनी अनेक मानद पदे भूषविली असून विद्यार्थ्यांना स्वत: प्रयोग करून विज्ञानात रस निर्माण व्हावा म्हणून चालविण्यात येणार्‍या ‘विज्ञान संशोधिका’ या पुण्यातील संस्थेतही ते मार्गदर्शन करतात.

- प्रा. निरंजन घाटे

काळे, प्रमोद पुरुषोत्तम